हिमोग्लोबिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेमोग्लोबीन या पानावरून पुनर्निर्देशित)
हिमोग्लोबिनची रचना

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.

रचना[संपादन]

फुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बनडायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करत असते. रक्तातील तांबड्या रक्तकणिकांमध्ये असणारे हे प्रथिन चार ग्लोब्युलीन प्रथिन-शृंखलाचे बनलेले असते. प्रत्येक शृंखलेत हिम नावाचे पोरफायरीन हे लोह-युक्त संयुग असते. या संयुगामुळेच रक्त लाल दिसते. हिम संयुगामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड वहन शक्य होते. हिमोग्लोबिनमुळेच तांबड्या रक्तकणिका त्यांचा आकार टिकवून ठेवतात.

मापन[संपादन]

हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम/डेसिलीटर मध्ये मापले जाते. एक डेसिलीटर म्हणजे १०० मिलीलीटर. प्रत्येक १०० मिलीलीटर मध्ये किती ग्रॅम हिमोग्लोबिन आहे यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना करण्यात येते. हिमोग्लोबिन मापनासाठी हिमोग्लोबिनोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. आधुनिक प्रकारची उपकरणे डीजीटल स्वरूपातील असतात. सहज कोठेही घेऊन जाण्यासारखी असल्याने ती सोयीस्कर ठरतात.पूर्वी ‘साहिली’चे उपकरण वापरले जात असे. यात हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर तपासणीचा रक्त नमुना मिसळला जाई. रक्तातील हिमोग्लोबिन आम्लाच्या सान्निध्यात आम्लधर्मीय हिमॅटीन या संयुगात परावर्तीत होते. या मिश्रणात पाणी घालून त्याच्या किरमिजी रंगाची तुलना हिमॅमीटरच्या रंगीत काचांबरोबर जुळवली जाई. या रंगीत काचांच्या बाजूलाच हिमोग्लोबिनचे प्रमाण दर्शवणारी पट्टिका असे. त्यातून हिमोग्लोबिनचे नेमके प्रमाण समजले जात असे.

प्रमाण व त्याचे परिणाम[संपादन]

हिमोग्लोबिनचे प्रमाण वयाप्रमाणे, लिंगाप्रमाणे आणि आहाराच्या सवयीनुसार बदलते. नुकत्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरात १७ ते २२, बालकांच्या शरीरात ११ ते १३, प्रौढ पुरुषांत १४ ते १८ तर प्रौढ स्त्रियांत १२ ते १६ ग्रॅम/डेसिलीटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. मध्यमवयीन आणि वृद्धावस्थेत हे प्रमाण थोडे फार उतरते. विशेषतः भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते. कुपोषण, गरोदरपण, प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते.

हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडूरोगाचे निदान केले जाते. अशा व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीदेखील कमी असतात. अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्त्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो. सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते.

गरोदर मातांनी हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते. जर हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल तर मृत अर्भक निपजायची शक्यता असते.

हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडूरोगाचे निदान केले जाते. अशा व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीदेखील कमी असतात. अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्त्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो. सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते.

पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उंचावरती हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण विरळ असल्याने शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी या मंडळीत नैसर्गिकरित्याच हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. सतत धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. ज्यावेळी रोग्याला काही कारणाने निर्जलीकरण होते, तेव्हाही शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अर्थातच असे वाढीव प्रमाण फसवे असते; कारण धुम्रपान किंवा निर्जलीकरण या दोन्ही बाबी आरोग्यास केव्हाही हानीकारकच आहेत. फुप्फुसांच्या काही रोगात तसेच काही प्रकारच्या अर्बुदांमुळे हिमोग्लोबिन वाढलेले दिसते. खेळाडूंनी जर उत्तेजक द्रव्ये प्राशन केली, तर त्यामुळेही अशा प्रकारचे बदल हिमिग्लोबिनच्या प्रमाणात होतांना दिसतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे.