हिंदुकुश पर्वतरांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांग

हिंदुकुश (फारसी: هِندوکُش ;), ही मध्य अफगाणिस्तान व उत्तर पाकिस्तान यांदरम्यान पसरलेली पर्वतरांग आहे. 'तिरिक मिर' हे ७,७०८ मीटर (२५,२८९ फूट) उंचीचे शिखर हिंदुकुश पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर होय. त्यालाच 'जगाचे छप्पर' अशीही संज्ञा वापरली जाते. हे शिखर पाकिस्तानातल्या खैबर-पख्तूनख्वा भागातील चित्रल परिसरात आहे.

ही पर्वतरांग म्हणजे पामिराची पर्वतरांग, काराकोरम रांग यांचा सर्वांत पश्चिमेकडील विस्तार होय. तसेच ही हिमालयाची उप-पर्वतरांग आहे. तसेच ही पर्वतरांग, जागतिक लोकसंख्येचा भौगोलिक मध्य समजली जाते.

पर्वतरांग[संपादन]

हिंदुकुशाचे उपग्रहाद्वारे घेतलेले चित्र

सोबत दिलेल्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या चित्रातील डावीकडचा खालचा भाग हिंदुकुश पर्वतरांगेने व्यापला आहे. ही पर्वतरांग पश्चिमेकडे उंचीने कमी होत जाते. काबुलाजवळ या रांगेतील पर्वतांची उंची ४,५०० ते ६,००० मीटर (१४,७०० फूट ते १९,१०० फूट) इतकी आहे तर पश्चिमेकडील बाजूला त्यांची उंची ३,५०० ते ४,००० मीटर (११,५०० फूट ते १३,००० फूट) इतकी आहे. हिंदुकुश पर्वतरांगेची सरासरी उंची ४,५०० मीटर (१४,७०० फूट) आहे. संपूर्ण हिंदुकुशाची लांबी सुमारे ९६६ कि.मी.(६०० मैल) असून रुंदी सुमारे २४० कि.मी.(१५० मैल) आहे. संपूर्ण हिंदुकुशापैकी केवळ ६०० कि.मी.चा पट्टा हा हिंदुकुश पर्वतरांग म्हणून ओळखला जातो. उरलेल्या भागांमध्ये कोह-इ-बाबा, सलांग, कोह-इ-पगमान, स्पिन गर(पूर्वेकडील सफेद कोह), सुलेमान पर्वतरांग, सियाह कोह, कोह-इ-ख्वाजा मुहम्मद आणि सिलसिले-इ बंद-इ तुर्कस्तान या लहान पर्वतरांगांचा समावेश होतो.

या पर्वतरांगेत उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये हिलमांद, हारी आणि काबुल नदीचा समावेश आहे. ह्या तीन नद्या सिस्तान पात्रात पाणी पुरवणारे स्रोत आहेत.

या पर्वतांमध्ये तांड्यांना ये-जा करण्यासाठी अनेक उंच खिंडींचे जाळे आहे. सलांग खिंड ही ३,८७८ मीटर उंचीवरची, सगळ्यांत महत्त्वाची खिंड होय. ही खिंड काबूल व त्याच्या दक्षिणेकडील काही भागाला उत्तर अफगाणिस्तानाशी जोडते. या खिंडीचे इ.स. १९६४ साली बांधकाम पू‍र्ण झाल्यावर काबूल आणि उत्तरेकडले प्रदेश यांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. याआधीचा प्रवास शिबर खिंडीतून (३,२६० मीटर) होत असे व त्याला तीन दिवस लागत असत. ३,३६३ मीटर उंचीवरचा सलांग बोगदा व तिथे येणाऱ्या रस्त्यांवरचे गॅलऱ्यांचे जाळे हे सोव्हिएत आर्थिक व तांत्रिक पाठबळावर उभारले गेले.

सलांग रस्ता तयार होण्याआधी, अफगाणिस्तान व भारताला जोडणाऱ्या खिंडी जास्त परिचित होत्या. यांमध्ये पाकिस्तानातील खैबरखिंड (१,०२७ मीटर), काबुलाच्या पूर्वेकडील लाटबंद खिड (२,४९९ मीटर) यांचा समावेश होता. इ.स. १९६० साली तांग-इ-घारू या काबूल नदीतल्या सुप्रसिद्ध घळईमध्ये बांधलेल्या रस्त्याने लाटबंद खिंडीला मागे टाकले. या रस्त्यामुळे काबूल ते पाकिस्तानी सीमेपर्यंतचा प्रवास दोन दिवसांवरून काही तासांवर आला.

बाह्य दुवे[संपादन]