हरिश्चंद्र लचके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिश्चंद्र लचके
जन्म १९१९
भूम-कुर्डुवाडी, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जुलै २४, २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रकला
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट
शैली व्यंगचित्रे

हरिश्चंद्र लचके (जन्म : भूम-कुर्डुवाडी, इ.स. १९१९; - पुणे, २४ जुलै २००७) हे मराठी नियतकालिकांमधून व्यंगचित्रे रेखाटणारे चित्रकार होते.

लचके यांचा जन्म भूम-कुर्डुवाडी झाला. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती. रद्दीच्या दुकानातील पुस्तकांमधील चित्रांवरून ते स्वतः चित्रे काढून बघत. पुढे स्वतःच्या कल्पनेने काढलेले एक चित्र त्यांनी 'किर्लोस्कर' मासिकात पाठवून दिले आणि ते प्रसिद्धही झाले. त्यावेळी परिचय झालेल्या शंकरराव किर्लोस्करांनी त्यांना त्यापुढील काळातही प्रोत्साहन दिले.

त्यानंतर लचके यांनी चित्रकलेचे पद्धतशीरपणे प्रशिक्षण घेतले. १९४३ साली जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी 'जी.डी. आर्ट'चा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. १९४० ते १९४४ या कालावधीत त्यांनी 'स्वप्नतरंग', 'चंद्रग्रहण', 'लंकादहन' या कार्टून फिल्म तयार केल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लचक्यांनी जपान युद्धावर रेखाटलेले व्यंगचित्र टाइम्स ऑफ इंडियाच्या १७ ऑगस्ट १९४५ च्या अंकात पहिल्या पानावर छापून आले. पुढच्या काळात किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, हंस, नवल, मोहिनी, उद्यम, आवाज, साप्ताहिक सकाळ अशा मासिका-साप्ताहिकांतून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत राहिली.

व्यंगचित्रांखेरीज लचक्यांनी व्यंगचित्रकला या विषयाशी निगडित लिखाणदेखील केले. 'हसा आणि हसवा', 'हसा मुलांनो हसा', 'हसा आणि लठ्ठ व्हा', 'गुदगुल्या' ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

२४ जुलै २००७ रोजी पुणे येथे लचके यांचे निधन झाले.