हरिश्चंद्र माधव बिराजदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरिश्चंद्र माधव बिराजदार (५ जून, इ.स. १९५०; रामलिंग मुदगड, लातूर जिल्हा, महाराष्ट्र - १४ सप्टेंबर, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे पहिलवानी कुस्ती खेळणारे मराठी कुस्तीगीर व कुस्ती-प्रशिक्षक होते. स्कॉटलंड येथे झालेल्या इ.स. १९७० सालातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर इ.स. १९७२ साली त्यांनी भारतातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद जिंकून रुस्तम-ए-हिंद किताब मिळवला होता. खेळाडू म्हणून कारकिर्द संपल्यावर ते कुस्ती-प्रशिक्षक म्हणून काम करत होते. पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत ते कुस्ती शिकवत असत.

जीवन[संपादन]

५ जून, इ.स. १९५० रोजी महाराष्ट्राच्या वर्तमान लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात रामलिंग मुदगड या गावी ह‍रिश्चंद्र बिराजदारांचा जन्म झाला. त्यांचे वडील पहिलवान होते. हरिश्चंद्रांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची आई निवर्तली[१]. वडिलांनी कुस्ती खेळण्यातले हरिश्चंद्रांच्या अंगचे गुण हेरून त्यांना इ.स. १९६५च्या सुमारास तालीम करण्यासाठी कोल्हापुरास गंगावेस तालमीत धाडले. इ.स. १९६९मध्ये दादू चौगुले याला हरवत त्यांनी महाराष्ट्रकेसरी किताब पटकावला. त्याच वर्षी कानपूर येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी हिंदकेसरी किताबही जिंकला. स्कॉटलंडातील एडिंबरा येथे झालेल्या इ.स. १९७० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी कुस्तीतले सुवर्णपदक जिंकले. इ.स. १९७२ साली वाराणसी येथे झालेल्या भारतातल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी नेत्रपाल नावाच्या दिल्लीच्या कुस्तीगिराला हरवत रुस्तम-ए-हिंद किताब पटकावला. इ.स. १९७७ साली बेळगाव येथे झालेल्या मैदानी कुस्तीच्या मुकाबल्यात त्यांनी दिल्लीच्या बिर्ला आखाड्याच्या सत्पाल मल्लास हरवण्याचे आव्हान जिंकले[१].

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ राजेंद्र जोशी (१८ सप्टेंबर, इ.स. २०११). 'रुस्तम-ए-आखाडा'[मृत दुवा]. लोकसत्ता. २१ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.