स्वाध्याय चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वाध्याय परिवार : स्वाध्याय परिवार हा भारतीय तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास, अंगीकार आणि त्यानुसार कृती करीत जीवनपालन करीत असलेला वैश्वीक परिवार आहे. या परिवाराला स्वाध्याय परिवार म्हणतात. प्रत्येक कार्यकर्ता "स्वाध्यायी" म्हणून ओळखला जातो. सध्या ह्या चळवळीची गरज आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी , घडण्यासाठी, माणूसकीचा मार्ग देणारा स्वाध्याय परिवार.

तत्त्वज्ञानाचे स्वरूप[संपादन]

स्वाध्याय याचा एक अर्थ स्वतः केलेले अभ्यास असा आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी स्वाध्याय हा एक दैवी गुण असल्याचे (अध्याय १६ श्लोक १), चार यज्ञांपैकी एक असल्याचे (अध्याय ४, श्लोक २८) आणि वाणीचे एक तप असल्याचे (अध्याय १७ श्लोक १५) सांगितले आहे. पतंजलि लिखित योगसूत्रांमध्येही स्वाध्याय हा योगसाधनेतील आठ टप्प्यांपैकी एक सांगितला आहे. स्वाध्याय चळवळीच्या तत्त्वज्ञानात स्वाध्याय या शब्दाचे हे अर्थ अभिप्रेत मानले जातात.

'''दशावतार''' ह्या पुस्तकातून स्वाध्याय (पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या दशावतार ह्या ग्रंथातील समन्वय विचार) :- . शास्त्रीनी आध्यात्मिक ग्रंथाची उकल करताना उत्क्रांतिवाद, सांख्यवाद, नास्तिकवादाची उदाहरणे देत, हिंदू दशावताराचे स्वरूप बदलून ते विज्ञानवादी बनविले.

[दर एकादशीच्या दिवशी निष्क्रिय लोक एकत्र होतात व ओरडून सांगतात. प्रभो ह्या जगात फार घाण साचली आहे. तू ये आणि ती सगळी काढून टाक. पण अशा ओरडण्याने भगवंत येणार नाही. प्रभुकार्यासाठी आतडे तुटत असणाऱ्या, त्यासाठी बलिदान करण्याची तयारी असलेल्या लोकांनी हाक मारली तर भगवान अवतार घेतो .पवनशक्तीने पवनचक्की चालते ही गोष्ट खरी आहे .त्यात शंका नाही .पण ती पवनचक्की माणसाने उभी करावी लागते. पवन तिला चालवतो, उभी करीत नाही. गीतेच्या भाषेत सांगायचे झाले तर परित्राणाय साधुनाम् म्हणजे, सज्जन ईश्वरकार्य करीत असतील तर त्याच्या रक्षणासाठी भगवान येतो .चोरांनी लुटलेल्या मालाची वाटणी करीत असताना होणारी भांडणे मिटविण्यासाठी तो येत नाही.

भारतीय सांख्य मत आणि पाश्चात्त्य लामार्क ह्यांच्या दृष्टीने हे विश्व उत्क्रांत झालेले आहे; सृष्टीतूनविकास पावले आहे.उत्क्रांतिवादाच्या दृष्टीने हे जग आरंभी जलाकर होते, म्हणजे सृष्टीच्या आरंभी सर्व जलमय होते.डार्विनच्या विकासवादाच्या सिद्धान्तानुसार सृष्टीची उत्पत्ती पाण्यातून झाली आहे. त्यावेळच्या जलचरांतील श्रेष्ठ जीव असलेल्या मासळीने उपयुक्त शरीर धारण करून जलचर मत्स्यरुपात चित् शक्ती अवतीर्ण झाली. भूगर्भशास्त्रज्ञ आदियुगाला मत्स्ययुग म्हणतात. ही विकास वादाची पहिली पायरी वाटते. ग्रीसचा पहिला तत्त्वज्ञानी थेल्स सुद्धा पाण्याचे तत्वज्ञान समाजवताना म्हणतो की, सृष्टीचा प्रारंभ पाण्यापासून झाला आहे. उत्क्रांतिवादानुसार मत्स्य हा पहिला प्राणी आहे. म्हणून त्या योनीत चित् शक्तीने अवतार घेतला असे मानणे चुकीचे किंवा खोटे नाही.....पांडुरंगशास्त्री आठवले

परिवाराचे स्वरूप[संपादन]

पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले (१९२०-२००३) यांच्या विचारांतून स्वाध्याय चळवळ उभी राहिली. आठवले हेच या चळवळीचे प्रणेते मानले जातात. कृतिशील तत्त्वज्ञ अशी पांडुरंगशास्त्रींची ओळख होती. त्यांना सामाजिक नेतृत्वाबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पद्मविभूषण हा भारतातील दोन क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी उपाधीने त्यांचा गौरव केला गेला होता.

स्वाध्याय कार्यसूत्रे[संपादन]

स्वाध्याय चळवळीची कार्यसूत्रे पुढीलप्रमाणे सांगण्यात येतात:

 • १)स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीत आत्मगौरव निर्माण करतो.
 • २) स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीला कृतीशील बनवतो.
 • ३) स्वाध्याय मानवा-मानवातील भेदभाव दूर करतो. जात, वर्ण, संप्रदाय किंवा पंथ यांना महत्त्व न देता, सर्व एकाच पित्याची लेकरे आहेत आणि आपल्या रक्ताच्या संबधापेक्षा उच्च असा रक्त बनवणराचा संबंध आहे याचा अनुभव आणून देतो जगात जन्मलेली कोणतीही व्यक्ती हीन नाही, अस्पृश्य नाही् हे समजावते.
 • ४) स्वाध्याय माणसामधे कार्यात्सोव वाढवितो. स्वाध्यायी माणूस एकांतात चित्त एकाग्र करून भक्तीद्वारे आंतरिक विकास साधतो आणि समूहात फिरुन कर्मयोग करून बहिर्भक्तिद्वारे स्वतःचा जीवन विकास साधतो.
 • ५) स्वाध्याय भक्तीचे खरे ज्ञान देते.भक्ती ही केवळ कृती नाही तर ती एक वृत्ती आहे. याची जाणीव स्वाध्यायाने येते.
 • ६) स्वाध्याय ऐक्य भावना दृढ करतो, सर्व स्वाध्यायी एकाच परिवारातील समजतो आमचे एक दैवी कुटुंब आहे.देवाची कुपा

वैचारिक फायदे[संपादन]

त्याचबरोबर स्वाध्यायाद्वारे येणारी गुण-संपत्ती कोणती.

 • १) कृतज्ञता: कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय केलेल्या कामाची प्रेमाची कदर करणे म्हणजे व त्यासाठी काही तरी करीत राहण्याची वृत्ती म्हणजे कृतज्ञता. भगवंताबद्दल, संस्कृतीबद्दल, गुरुबद्दल, आई-वडिलांबद्दल, कुटूंब, समाज आणि राष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मानवाचे कर्तव्य आहे.
 • २) अस्मिता : मी आहे याचे भान असले पाहिजे. मी करू शकतो,बनू शकतो, बनवू शकतो, बदलवू शकतो, उभे करू शकतो,प्राप्त करू शकतो, यावृत्तीचे भान म्हणजे अस्मिता. मी मोठा आहे, तसाच दुसराही लहान नाही. तुच्छ नाही याचे नाव अस्मिता.
 • ३)तेजिस्विता: जो बापुडा नाही, दीन बनत नाही, लाचारी करीत नाही आणि बिचारा राहात नाही तो खरा तेजस्वी.
 • ४)भावपूर्णता: मानवजीवनाचा दोन तृतीयांश भाग भावाने भरले आहे. एक तृतीयांश भाग भोगाचा आहे. 'भावपूर्णता' हे विकसित मानवाचे द्योतक आहे. आपले भावजीव समृद्ध करणे आणि दुसऱ्याचे भावजीवन पुष्ट करणे हे भगवंताचे कार्य आहे.
 • ५) समर्पण : सुगंधी बनलेले जीवन प्रभुचरणी समर्पण करणे.

स्वाध्याय फलित[संपादन]

स्वाध्यायाचे फलित म्हणजे स्वयंशासित, प्रभुप्रेमी, आत्मश्रद्धावान, पुरुषार्थप्रिय, शास्त्रविचार जाणणारा, संस्कृतीप्रेमी, जीवन लाभलेला समाज स्वाध्यायींना तयार करायचा आहे. जेथे कृतीपेक्षा वृत्तीला, वस्तूपेक्षा विचाराला, भोगापेक्षा भावाला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, व्यक्तीपेक्षा संघाला, सभ्यतेपेक्षा संस्कृतीला, परिणामापेक्षा प्रयत्नाला, शक्तीपेक्षा सत्त्वाला. तर्कापेक्षा तत्त्वाला, आणि धनापेक्षा धर्माला प्रतिष्ठा असेल असा समाज स्वाध्यायींना बनवायचा आहे. आयुष्यच बदलून गेले असे सांगणारे अगदी कोळी, माळी, अदिवासी, उच्चविद्याविभूषित, अशिक्षित, कितीतरी विविध जातीजमातींची माणसे बंधुभावाने या परिवारात दिसतील, ते या परिवाराचे मोठे यश मानले पाहिजे.

प्रयोग[संपादन]

स्वाध्यायी परिवाराचे विविध प्रयोग आहेत. तत्त्वज्ञान विद्यापीठातून (ठाणे) पारंपारिक शिक्षणाबरोबर संस्कृती, वेदांचा अभ्यास याचे शिक्षण इथे दिले जाते. मत्स्यगंधा प्रयोग, योगेश्वर कृषी, अमृतालयम, भक्तीफेरी, बालसंस्कार केंद्र, युवा केंद्र, भगिनी केंद्र, प्रवचन केंद्र, अशा विविध प्रयोगांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे कार्य चालते. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २००३ मधे वयाच्या ८४ वर्षी निधन झाल्यानंतर स्वाध्यायींचे कार्य त्यांची (मानस कन्या ) धनश्री तळवळकर (दीदी) यांनी स्वाध्यायींबरोबर पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचाराला, कार्याला वाहून घेतले आहे.

सामाजिक कार्य[संपादन]

 • गावागावातून चारा छावण्या चालवल्या जातात
 • शाळा
 • वैद्यकीय मदत
 • प्रबोधन व तंटामुक्त गाव बनवणे
 • स्वच्छतेचा पुरस्कार व गाव स्वच्छता मोहिमा

संदर्भ[संपादन]

 • एष: पन्था एतत्कर्म : पृ. क्र. ६ प्रकाशक : सद्विचार दर्शन निर्मल निकेतन, २ डॉ. भाजेकर लेन, मुंबई.
 • शासनपुरस्कृत मनुवादी पांडुरंगशास्त्री आठवले : पृ.क्र. ३.शेषराव मोरे, सुगावा प्रकाशन, ५६२ सदाशिव पेठ, चित्रशाळा बिल्डिंग पुणे.
 • पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित कादंबरी : देह झाला चंदनाचा : लेखक राजेंद्र खेर, विहंग प्रकाशन, पुणे.

बाह्य दुवे[संपादन]