Jump to content

स्वर्णलता भिशीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वर्णलता भिशीकर - (जन्म - १ मे १९५१, नागपूर; मृत्यू - ३ मार्च २०२५, सोलापूर) ज्ञान प्रबोधिनी सोलापूर संस्थेच्या विश्वस्त, कवियित्री, लेखिका, श्रीअरविंद साहित्याच्या अभ्यासक.

जीवन व कार्य

[संपादन]

स्वर्णलता भिशीकर या चंद्रशेखर भिशीकर (संपादक तरुण भारत पुणे, विचारवंत, लेखक, पत्रकार) यांच्या कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबात क्रांती (धाकटी बहीण) आणि देवदत्त भिशीकर (भाऊ) हे सदस्य आहेत.

शिक्षणविषयक कार्य

[संपादन]

मानसशास्त्र या विषयातील एम.ए ही पदवी त्यांनी संपादन केली होती. 'वाचन कौशल्यांचा विकास' हा त्यांच्या पीएच.डी. साठी प्रबंधाचा विषय होता. ज्ञान प्रबोधिनीच्या 'प्रज्ञा मानस संशोधिका' मध्ये दहा वर्षे वाचन कौशल्ये व आनुषंगिक मानसशास्त्रीय संशोधन व प्रशिक्षणात महत्त्वाचे योगदान केले. अमेरिकेतील 'इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया' येथे दोन महिने त्यांनी अतिथी व्याख्याता म्हणूनही काम केले. []

त्या ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाशी संबंधित होत्या. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून युवतींचे खेळ, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य, नेतृत्व, वाचन, अभ्यास, साहित्य रसग्रहण यांमधील विकसन; मानसिक प्रश्न सोडवून व्यक्तिमत्त्वाचे विकसन; शहरी व ग्रामीण शिबिरे यांच्याद्वारे सामाजिक व राष्ट्रीय जाणिवेची जागृती; स्त्रियांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलने; पंजाब सद्भाव यात्रेतील युवती गटाचे प्रभावी नेतृत्व अशा अनेकविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असे.

सामाजिक कार्य

[संपादन]

त्या १९८९ पासून सोलापूर व हराळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाखांमधील विविध उपक्रमांचे संचालन करू लागल्या. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात साक्षरता व बालकामगार प्रकल्पांवर विशेष काम केले होते. त्या ज्ञान प्रबोधिनी सोलापूर या संस्थेच्या विश्वस्त होत्या. सोलापूर येथे १९९१ साली शिशू अध्यापिका विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात, सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांमधली १८०० साक्षरता केंद्रे, तसेच जिल्ह्यातील १८ बाल कामगार पुनर्वसन केंद्रे उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कुमठे येथे साखरशाळा चालू करण्यातही तसेच हराळी येथे ग्रामीण निवासी शाळा सुरू करण्यात त्यांनी योगदान दिले. [] सोलापूर जिल्ह्यातील हरळी प्रकल्पात फळबाग विज्ञान, कृषी शिक्षण आणि ग्रामीण विकासाशी संबंधित प्रयोग करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.[]

साहित्य विषयक कार्य

[संपादन]

कवियित्री, लेखिका आणि श्रीअरविंद साहित्याच्या अभ्यासक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. स्वर्णलता यांनी अध्यात्म आणि मानसशास्त्र या विषयांवर १९९१ मध्ये अमेरिका व कॅनडा येथील ११ प्रमुख शहरांत अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. त्यांच्या कार्यात आध्यात्मिक आणि साहित्यिक विचारांचा समावेश होता. [] पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे स्वर्णलता यांची उपनिषदांवरची व्याख्यानमाला सलगपणे काही वर्षे चालू होती. त्या दासबोध, ज्ञानेश्वरीपतंजली योगसूत्रे यावर अनेक ठिकाणी नियमितपणे व्याख्याने, प्रवचने करत असत. []

प्रकाशित लेखन

[संपादन]
  • 'श्रीमाताजी श्रीअरविंद काय म्हणाले? (विचार संकलन) - कै. डॉ. पेंडसे यांच्याबरोबर सहलेखन , १९८१
  • देवचाफे (कविता संग्रह) - विश्वमोहिनी प्रकाशन, १९८२
  • ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक – डॉ वि. वि. पेंडसे चरित्र, प्रथम आवृत्ती – ऑगस्ट १९८४,द्वितीय आवृत्ती – ऑगस्ट २००९, पुनर्मुद्रण – जानेवारी  २०१८ []
  • यात्रा एका धुमसत्या मुलखाची - पंजाब यात्रेचा वृत्तांत, १९८४
  • ए न्यू एक्सपरिमेंट इन् एज्युकेशन (खंड १, २ व ३) ज्ञान प्रबोधिनीसंबंधीचे साहित्य - लेखन व संपादन
  • प्रेषित संदेश - खलील जिब्रान याच्या द प्रोफेट या ग्रंथाचा भावानुवाद []
  • शिक्षणविचार - लेखसंग्रह, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग
  • युगनायक - (स्वामी विवेकानंद चरित्र) विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग
  • मोकळिकच्या ऋचा, कथासंग्रह, सुविद्या प्रकाशन (सोलापूर)
  • द पाथ ऑफ सेल्फ-रियलायझेशन (स्वामी माधवनाथ यांच्या विचारांचे संकलन) - ले.डॉ. स्वर्णलता भिशीकर आणि सुषमा वाटवे []
  • हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात, (मूळ पुस्तक - लिव्हिंग विथ हिमालयन मास्टर्स) ले. स्वामी राम, अनुवादक - स्वर्णलता भिशीकर
  • 'गीतांजली' या रवींद्रनाथ ठाकुर यांच्या काव्यसंग्रहाचा भावानुवाद
  • 'हिंदुतेजा जाग रे' - स्वामी विवेकानंदांच्या इंग्रजी विचार संकलनाचा अनुवाद, विवेकानंद केंद्र प्रकाशन
  • 'उपनिषदांचे अंतरंग' - स्वामी रंगनाथानंदांच्या (रामकृष्ण मठाचे भूतपूर्व अध्यक्ष) इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद.रामकृष्ण मठ प्रकाशन. []
  • रिचर्ड बाक यांचे जोनाथन सीगल, अनुवादक - डॉ. स्वर्णलता भिशीकर
  • विमला ठकार यांचा आत्मोल्लास, अनुवादक - डॉ. स्वर्णलता भिशीकर []
  • वेद-रहस्य - मूळ लेखक श्रीअरविंद, अनुवादक - डॉ. स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम प्रकाशन विभाग, आय.एस.बी.एन:978-81-7058-912-9

पूरक

[संपादन]
  • युट्यूब चॅनेल
  • स्वर्णलता भिशीकर यांच्यावरील लेख - भूलोकीचा देवचाफा, पूर्वपुण्य (दिवाळी अंक)

पुरस्कार

[संपादन]
  • पद्मश्री अनुताई वाघ विशेष व्यक्ती पुरस्काराने सन्मानित (२०२२) []
  • वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार (१९९७) - पंजाबमध्ये दहशतवादी वातावरणामध्ये सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यात सहभागी झाल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e दै.लोकसत्ता, १३ ऑक्टोबर २०१८
  2. ^ a b "Awards Given By NBSS | Nutan Bal Shikshan Sangh" (इंग्रजी भाषेत). 2025-03-04 रोजी पाहिले.
  3. ^ www.jpprakashane.org
  4. ^ a b "Marathi Books Store - BookGanga - Publication, Distribution". www.bookganga.com (इंग्रजी भाषेत). 2025-03-04 रोजी पाहिले.
  5. ^ ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक – डॉ वि. वि. पेंडसे या पुस्तकातील लेखक-परिचय
  6. ^ कल्याणी विशेषांक २०१३