स्फुटनिक-१ हा पृथ्वीचा पहिला कृत्रिम उपग्रह होता. ४ ऑक्टोबर १९५७ ला रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्फुटनिक-१ अवकाशात सोडला होता. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास ८३.६ किलोग्रॅम वजनाचा होता. या उपग्रहास पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ९८ मिनिट लागत. या उपग्रहात चार अँटिना व दोन रेडीओ ट्रान्समीटर होते.
या उपग्रहाचे यश अमेरिकेला अनपेक्षित होते. यामुळे अंतराळ शर्यतीला सुरुवात झाली. हे प्रक्षेपण राजकीय, लष्करी, तांत्रिक आणि वैज्ञानिक विकासाच्या एका नवीन युगाची सुरुवात होती.[२] खगोलशास्त्रीय संदर्भात अर्थ लावला तर स्फुटनिक हा शब्द रशियन भाषेत "उपग्रह" म्हणून वापरला जातो; त्याचे इतर अर्थ "जोडीदार" किंवा "प्रवासी साथीदार" असे आहेत.[३][४]
पृथ्वीवरून स्फुटनिक-१ चा मागोवा घेतल्याने व अभ्यास केल्याने शास्त्रज्ञांना मौल्यवान माहिती मिळाली. वरच्या वातावरणाची घनता त्याच्या कक्षेवरील ओढावरून काढता आली आणि त्याच्या रेडिओ सिग्नलच्या प्रसारामुळे आयनमंडलबद्दल माहिती मिळाली.[५] २६ ऑक्टोबर १९५७ रोजी ट्रान्समीटर बॅटरी संपेपर्यंत उपग्रह सिग्नल २२ दिवस चालू राहिले. ४ जानेवारी १९५८ रोजी, कक्षेत तीन महिने राहिल्यानंतर, स्फुटनिक-१ पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत असताना जळून खाक झाला. त्याने पृथ्वीच्या १,४४० फेऱ्या पूर्ण केल्या, आणि अंदाजे ७,००,००,००० किलोमीटर (४,३०,००,०००मैल) अंतर प्रवास केला होता.[६]