स्त्रीधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्या मिळकतीवर कोणत्याही वेळी स्त्रीला कमी-अधिक प्रमाणात अनिर्बंध मालकी-हक्क सांगता येतो, त्यास स्त्री-धन म्हणतात. स्त्रीधन ही परंपरागत हिंदू कायद्यात मालकी आणि वारसा यांसंबंधातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना होय. स्त्रीधन म्हणजे स्त्रीचे धन. ज्यावेळी पुरुष हाच पूर्ण वारस ठरू शकत होता आणि पुरुषालाच जन्मतः वडिलांच्या किंवा कुटुंबाच्या संपत्तीत अधिकार मिळू शकत होता, त्यावेळी स्त्रीधनाला फार महत्त्व होते. प्राचीन काळी लग्नप्रसंगी वधूशुल्क घेण्याची प्रथा होती. विवाहानंतर काही वेळा पिता प्रेमापोटी ते तिला परत करीत असे किंवा काही भाग देत असे. ही तिची स्वतंत्र मिळकत मानली जाई. अशाप्रकारे स्त्रीधनाच्या कल्पनेचा उगम वधूशुल्कातून आला आहे. कालांतराने वैदिक काळात वधूशुल्काची पद्धत बंद पडली आणि वस्त्रालंकाराच्या रूपात देणगी देण्याची प्रथा रूढ झाली. या देणगीला ‘ पारीणाह्य ’ अशी संज्ञा असून त्यावर वधूची पूर्ण मालकी असे. याशिवाय विवाहप्रसंगी मुलीला तिच्या आई, बाबा, भाऊ, काका, मामा, मावशी अशा आप्तस्वकीयांकडून काही भेटी मिळत. त्यांतील जंगम मालमत्ता तर त्या स्त्रीची असेच परंतु जमीन किंवा घर यांसारखी स्थावर मालमत्ताही अशावेळी भेट म्हणून मिळाली असेल, तर तीसुद्धा त्या स्त्रीच्या पूर्ण मालकीची होई. या मालमत्तेचा पूर्ण उपभोग आणि तिचे हस्तांतरण करण्याचाही अधिकार त्या स्त्रीला मिळत असे.


स्मृतिकारांनी स्त्रीधनाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. सातव्या शतकापासून स्त्रीधनाची व्याप्ती वाढून आजीविका व आकस्मिक होणारा लाभ यांचा स्त्रीधनात अंतर्भाव झाला. ⇨ विज्ञानेश्वराने तर दायभाग(वारसा हक्क ), क्रीत ( विकत घेतलेल्या ) वस्तू , मिळकतीचा हिस्सा, आकस्मिक लाभ आदींचा समावेश स्त्रीधनात केला आहे. सारांश, तिने संपादन केलेली कोणतीही मिळकत म्हणजे स्त्रीधन होय. सौदायिक आणि असौदायिक असे स्त्रीधनाचे दोन प्रकार काहींनी केले आहेत. माहेरील नातेवाईकांकडून मिळालेले धन हे सौदायिक व पतीकडून मिळते ते असौदायिक. कात्यायन व इतर काही स्मृतिकारांनी वेगवेगळ्या प्रसंगांना अनुसरून स्त्रीला मिळालेले धन वेगवेगळ्या नावांनी निर्दिष्ट केले आहे. सप्तपदीच्या वेळी अग्निसमक्ष दिली जाणारी भेट ‘ अध्यग्नी ’, विवाहानंतर मंडपातून पित्याचा निरोप घेऊन सासरी जाताना पित्याकडून मिळालेली भेट ‘ आध्यवहनिका ’, लग्नसोहळ्यानंतर थोरामोठ्यांच्या पाया पडताना त्यांनी दिलेली भेट ‘ पादवंदनिक ’ होय. यांशिवाय ‘ प्रीतिदत्त ’ म्हणजे आईवडिलांनी दिलेले, ‘ बंधूदत्त ’ म्हणजे भावाकडून मिळालेले आणि ‘ भर्तृदाय ’ म्हणजे नवर्‍याकडून मिळालेले धन होय. ‘ अनावध्येय ’ म्हणजे लग्नानंतर केव्हाही माहेरच्या किंवा सासरच्या माणसांकडून मिळालेली संपत्ती असेही प्रकार सांगण्यात आलेले आहे. जीमूतवाहन हा बाराव्या शतकातील बंगाली कायदेतज्ज्ञ विधवेच्या स्त्रीधनविषयक हक्कांसंबंधी म्हणतो, ‘ नवर्‍याच्या मृत्यूनंतर तिच्या स्त्रीधनास कुणीही आडकाठी आणू शकत नाही ’.