सौगढ आणि नर्मदा प्रदेश
सौगढ आणि नर्मदा प्रदेश हा ब्रिटिश भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या थेट अंमलाखालील एक प्रदेश होता, सध्याच्या मध्यप्रदेश राज्याच्या मध्य भागातील या प्रदेशात सागर (सौगोर, सौगढ) दामोह, जबलपूर आणि नरसिंहपूर हे जिल्हे समाविष्ट होते.
हा प्रदेश नर्मदा नदीच्या (नेरबुद्दा) दोन्ही बाजूंना पसरलेला होता. याची राजधानी जबलपूर येथे होती. कंपनीची मोठी शिबंदी येथे तैनात होती. १९११मध्ये जेव्हा सरकारने देशाची राजधानी कलकत्त्याहून हलविण्याचा विचार केला, तेव्हा जबलपूर एक उमेदवार शहर होते.
इतिहास
[संपादन]१८१८ मध्ये तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्ध संपल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मराठ्यांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला. यातील उत्तरेकडील सौगढ हे पेशवाईच्या ताब्यात होत तर दक्षिणेकडील जबलपूर आणि नर्मदा खोरे नागपूरकर भोसल्यांच्या आधिपत्यात होता.
हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर लगेचच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बुंदेलखंड प्रांत स्थापन केला व सौगढ आणि नर्मदा प्रदेश त्यात समाविष्ट केला. १८२० मध्ये १२ जिल्ह्यांचा एक विभाग सौगोर आणि नेरबुद्दा प्रदेशांची एजन्सी म्हणून तयार केला गेला. जबलपूर येथील गव्हर्नर-जनरलच्या हस्तक या प्रदेशाचा प्रशासक असे. १८३५ मध्ये सौगढ आणि नर्मदा प्रदेश नव्याने स्थापन झालेल्या वायव्य प्रांतात समाविष्ट केला गेला. [१]
१८४२-१८४३ मध्ये, बुंदेला बंडादरम्यान दोन बुंदेला जमीनदार जवाहीर सिंग आणि मधुकर शाह यांनी सौगढ जिल्ह्यात ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. हे बंड मोडून काढल्यानंतर विल्यम हेन्री स्लीमन याने येथील प्रशासन हाती घेतले परंतु हे नीट न जमल्यामुळे १८५३मध्ये सौगढ आणि नर्मदा प्रदेशाला परत नॉर्थ-वेस्टर्न प्रॉव्हिन्सेसला जोडले गेले.
१८६१ मध्ये सौगढ आणि नर्मदा प्रदेशाला नागपूर प्रांतात विलीन केले गेले. [२]
संदर्भ
[संपादन]- ↑ History of Sagar Archived 2014-08-11 at the वेबॅक मशीन.
- ↑ Philip F. McEldowney (1980). Colonial Administration and Social Developments in middle India: The Central Provinces, 1861-1921 - Ph.D. Dissertation. University of Virginia. 2012-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-07-02 रोजी पाहिले.