Jump to content

सोनिया जब्बार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनिया जब्बार
नागरिकत्व भारतीय
पेशा व्यावसायिक
प्रसिद्ध कामे हत्तींच्या स्थलांतरासाठी सुरळीत मार्ग निर्माण करणे
धर्म मुस्लिम
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार (२०१९)

सोनिया जब्बार ह्या एक भारतीय वृक्षारोपण प्रेमी आणि वन्यजीव संरक्षक आहेत. २०१२ पासून, त्यांनी नेपाळ आणि आसाममधील स्थलांतर करणाऱ्या हत्तींना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी दार्जीलिंग मधील आपल्या स्वतःच्या चहाच्या मळ्याचे विशिष्ट रूपांतरण केले. वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाने या वृक्षारोपणाला उत्तर बंगालचा ग्रीन कॉरिडॉर चॅम्पियन म्हणून संबोधले. तर अमेरिकेतील मोंटाना विद्यापीठाने याला हत्ती अनुकूल असे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर सोनिया यांनी हत्तींच्या संवर्धनासाठी अतिरिक्त प्रकल्प सुरू केले, ज्यात १०० एकर जंगल तयार करण्यासाठी पुनर्वसन प्रकल्प आणि शेजारच्या शेतांसाठी पायलट पीक विमा प्रकल्प यांचा समावेश होता. २०१९ मध्ये, सोनिया जब्बार यांना महिलांसाठीच्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जीवन

[संपादन]

२०११ मध्ये कुटुंबाच्या मोठ्या चहाच्या मळ्याचा कारभार जब्बार यांच्या कडे आला. तत्पूर्वी जब्बार कोलकाता[] येथे पत्रकार म्हणून काम करत होत्या.[] पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात १२०० एकर मध्ये हा मळा आहे. १८८४ पासून या जमीनीची मालकी जब्बारच्या कुटुंबाकडे असून जब्बारची ही पाचवी पिढी आहे.[] विशेष म्हणजे या कुटुंबातील त्या सलग तिसरी महिला आहेत. यापूर्वी सोनियांची आई डॉली आणि आजी सईदा बद्रुनिसा यांच्याकडे या मळ्याची मालकी होती.[]

चहा उद्योगातील काम हे बहुतेक महिला मजूर करत असतात, पण हे त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते. कारण चहा कामगार महिलांचा संपूर्ण पगार हा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यात तसेच त्यांच्या पतीच्या दारू किंवा इतर व्यसनावर खर्च करण्यात संपून जातो. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील चहा कामगार संघटना महिलांच्या या समस्येवर दुर्लक्ष करत आल्या. या गोष्टीची दखल घेत जब्बार यांनी आपल्या महिला कामगारांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी एका एनजीओ सोबत काम करून यात बदलकरण्याचा प्रयत्न सुरू केला.[]

२०१२ मध्ये जब्बार यांच्या समोर आलेला गंभीर प्रसंग म्हणजे त्यांच्या चहाच्या मळ्यातील नव्याने लावलेल्या ३५ एकर जमिनीवर हत्तीनी वाटचाल सुरू केली. यावरील उपाय म्हणून पारंपरिक पद्धती नुसार पेटत्या मशाली आणि फटाक्यांनी हत्तींना घाबरवून पळवून लावावे लागत असे. परंतु जब्बारने यापैकी काहीही न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या कामगारांची मेहनत आणि स्वतःची गुंतवणूक हत्तींसाठी बलिदान करण्याचे ठरवले. यावरील चिंतेतून त्यांनी एक रात्र जागी राहून घालवली. सकाळी मात्र त्यांना असे दिसले की हत्तींच्या कळपाने फारसे नुकसान केले नाही. या गोष्टीचा त्यांना आनंद तर झालाच पण यापुढील नियोजन विचारपूर्वक करून अजून नुकसान कमी कण्याचे त्यांनी ठरवले.[]

कालांतराने जब्बार यांनी आपल्या मळ्यातून वृक्षलागवड करून ४०० मीटर रुंद रस्ते तयार केले. जेणेकरून हत्ती त्यांचे पारंपारिक स्थलांतर पूर्ण करू शकतील. यापूर्वी हत्तींचा मार्ग १७ किमी लांबीच्या कुंपणाने अडवण्यात आला होता. आसाम आणि महानंदा नदीच्या खोऱ्यातून नेपाळकडे जाण्याचा त्यांचा हा नेहमीचा मार्ग होता. मात्र जब्बार यांच्या वृक्षारोपणाच्या धोरणामुळे कळपांना सोप्या मार्गाने नेहमी प्रमाणे जाणे शक्य झाले.[] याव्यतिरिक्त, जब्बार यांच्या मळ्यात हत्तींसाठी इतर अडथळे निर्माण करणे टाळले जाते. ड्रेनेजच्या खड्ड्यात हत्ती पडणार किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे अडथळे येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाते. जब्बार मळ्यातील रसायने सुरक्षितपणे साठवली जातील याची खात्री देखील करतात.[] याच सोबत हत्तींना आवडणाऱ्या इतर वनस्पतींचा वृक्ष लागवडीत समावेश करण्यात आला.[]

जब्बार यांना २०१९ मध्ये नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. साल २०१८ साठीचा हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावेळी उपस्थित होते.[] त्या कामात रस असलेल्या स्थानिकांसाठी एक क्लब चालवत होत्या आणि हत्ती आणि इतर वन्यजीवांच्या वापरासाठी त्यांनी १०० एकर जमीन स्थानिक जंगल म्हणून वापरा पासून बाजूला ठेवली होती.[]

२०१८ मध्ये तिच्या कामामुळे नक्सलबारीला पहिले मोठे हत्ती-अनुकूल वृक्षारोपण म्हणून मान्यता मिळाली.[] हा पुरस्कार वाइल्डलाइफ फ्रेंडली एंटरप्राइज नेटवर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ मोंटाना यांनी दिला आहे.[] वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाने जब्बार यांच्या या भूमीला उत्तर बंगालचा ग्रीन कॉरिडॉर चॅम्पियन म्हणून संबोधले.[] २०२० मध्ये हवामान संकटादरम्यान बदल घडवून आणणाऱ्या बारा महिलांमध्ये व्होग इंडियाने जब्बार यांची नोंद घेतली.[]

भारतातील हत्तींना अनुकूल असलेल्या चहाच्या बागेतील जंगली हत्तींचा कळप.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "The need to bring both voices to the table". Tea & Coffee Trade Journal (इंग्रजी भाषेत). 2020-05-26 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 4 Datta, Romita (December 23, 2018). "Mammoth Project | The Social Warriors". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-04-26 रोजी पाहिले.
  3. 1 2 3 "Nuxulbari Tea Estate Becomes 2nd Globally to Earn Elephant Friendly™ Certification". PRLog. 2020-04-26 रोजी पाहिले.
  4. Anantharaman, Aravinda (2020-03-07). "Women-led estates chart new terroir". Livemint (इंग्रजी भाषेत). 2020-05-26 रोजी पाहिले.
  5. "These 12 women are crusaders of change in the midst of on-going climate crisis". Vogue India (इंग्रजी भाषेत). 2020-01-16. 2020-05-12 रोजी पाहिले.
  6. "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2020-04-11 रोजी पाहिले.
  7. 1 2 Singh, Kriti (2018-09-18). "Indian tea estate gets world's first 'elephant-friendly' tag". Asia Times (इंग्रजी भाषेत). 2020-05-17 रोजी पाहिले.
  8. "These 12 women are crusaders of change in the midst of on-going climate crisis". Vogue India (इंग्रजी भाषेत). 2020-01-16. 2020-05-12 रोजी पाहिले.