सॉलोमनची विनम्रता (लोककथा)
विनम्रतेच्या सहाय्याने गंभीर प्रश्न देखील कसे चुटकीसरशी सुटू शकतात हे सांगणारी ही लोककथा.
कथेचा आशय
[संपादन]
फार फार वर्षांपूर्वी इस्रायलमध्ये एक महान राजा होऊन गेला. त्याचे नाव होते सॉलोमन.
तो खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे एक भव्य सिंहासन होते, सुवर्णाच्या ताटात तो भोजन करत असे. त्याच्या राजवाड्यात मुबलक सोनं-चांदी, जडजवाहिर होते. व्यापारी सतत त्याच्यासाठी सोने, चांदी, हस्तिदंत, मोर, माकडे, सुंदर कपडे, चिलखत, मसाले, घोडे, खेचर आणि इतर अनेक प्रकारची संपत्ती आणत असत.
राजा सॉलोमनने त्याच्या पूर्वजांच्या आणि त्याच्या राष्ट्राच्या सन्मानार्थ एक भव्य मंदिर बांधले. मंदिर बांधण्यापूर्वी त्याला एक स्वप्न पडले. त्याच्या स्वप्नामध्ये देव प्रकट झाला आणि त्याला म्हणाला की, ''हे राजा, मी तुझ्या सत्शील वागण्यामुळे प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर तू माग. मी तुझे मनोरथ पूर्ण करेन."
राजा सॉलोमनने उत्तर दिलेः "माझे वडील डेव्हिड हे न्यायनिष्ठ आणि सत्यनिष्ठ होते आणि आता मी त्यांच्या सिंहासनावर बसलो आहे. माझ्यासमोर असलेले काम महान आहे. पण मी त्या जबाबदारीच्या तुलनेत अगदी एखाद्या लहान मुलासारखा आहे, असे मला वाटते. मला राज्यकारभाराचा काही अनुभव नाही. राज्य कसे करावे हे मला माहीत नाही. म्हणून माझी इच्छा आहे की मला ज्ञान मिळावे, जेणेकरून मला चांगले आणि वाईट यातील फरक कळेल.''
देवाने उत्तर दिले: "तू दीर्घायुष्य किंवा संपत्ती मागितली नाही, तर न्याय व अन्याय यातील फरक ओळखणारे ज्ञान मागितले आहेस, म्हणून मी तुला अशी बुद्धी प्रदान करत आहे की जेणेकरून तूच सर्वांपेक्षा वरिष्ठ ठरशील. तू जे वरदान मागितलेस त्यामुळे मी अधिकच प्रसन्न झालो आहे आणि म्हणून मी तुला बुद्धीबरोबरच दीर्घायुष्य आणि संपत्तीही प्रदान करत आहे."
तात्पर्य
[संपादन]खऱ्या महान लोकांमध्ये आपल्या मर्यादांची जाणीव असणे, विनम्रता हे गुण असतात. त्यामुळे सत्ता, वैभव प्राप्त झाले तरी ते उन्मत्त होत नाहीत. त्यामुळे ते प्रजाजानाचे कल्याण करू शकतात. [१]

अधिक माहितीसाठी वाचा
[संपादन]राजा सॉलोमन (इंग्रजी)
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.