सेसिल फ्रँक पॉवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सेसिल फ्रँक पॉवेल
Cecil Powell.jpg
सेसिल फ्रँक पॉवेल
पूर्ण नावसेसिल फ्रँक पॉवेल
जन्म ५ डिसेंबर १९०३
मृत्यू ९ ऑगस्ट १९६९
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

सेसिल फ्रँक पॉवेल हे शास्त्रज्ञ आहेत. पॉवेल, सेसिल फ्रँक : (५ डिसेंबर १९०३-९ ऑगस्ट १९६९). ब्रिटीश भौतिकीविज्ञ. १९५० सालाच्या भौतीकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. अणुकेंद्रीय प्रक्रियांच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या छायाचित्रण तंत्राच्या विकासाकरिता व मेसॉन मूलकणांसंबंधीच्या [⟶ मूलकण] शोधाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म टनब्रिज (केंट) येथे झाला. केंब्रिज येथील सिडनी सक्सेस कॉलेजातून १९२५ मध्ये पदवीधर झाल्यावर त्यांनी कॅव्हेडिश लॅबोरेटरीमध्ये सी. टी. आर्. विल्सन आणि ई. रदरफर्ड या विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्नाखाली संशोधन करून १९२७ मध्ये पीएच्. डी. पदवी मिळविली. त्याच वर्षी ते ब्रिस्टल विद्यापिठात ए. एम्. टिंड्ल यांचे संशोधन साहाय्यक म्हणून रूजू झाले. त्याच विद्यापिठात अध्यापक, प्रपाठक व त्यनंतर १९४८ पासून भौतिकीचे एच्. ओ. विल्स प्रध्यापक व एच्. एच्. विल्स फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या पदावरून मृत्यूपूर्वी काही काळ अगोदर ते निवृत्त झाले.

सुरुवातीला त्यांनी टिंड्ल यांच्याबरोबर धन आयनांच्या (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगटांच्या) गतिशिलतेचे अचूक मापन करण्याच्या तंत्राचा विकास करून बहुतेक सामान्य वायूंतील आयनांचे स्वरूप प्रस्थापित केले. १९३९-४५ या काळात त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मूलकणांची वस्तुमाने, विद्युत भार व ऊर्जा मोजण्यासाठी त्यांचे मार्ग नोंदम्याकरिता छायाचित्रण पायसाचा [⟶ कण अभिज्ञातक] उपयोग करण्यासंबंधी अनेक प्रयोग केले. या पद्धतीचा उपयोग ⇨विश्वकिरणांच्या (बाह्य अवकाशातून येणाऱ्या भेदक किरणांच्या) अभ्यासासाठी यशस्वीपणे करण्यात आला. यासाठी त्यांनी उंच पर्वतांवरील ठिकाणी तसेच उंच वातावरणात खास पातळ प्लॅस्टिकच्या फुग्यांतून विशिष्ट सुक्ष्मग्राही छायाचित्रण पायसयुक्त पट्ट्या पाठवून त्यांवर प्रथमिक विश्वकिरणांचे अचूक मार्ग नोंदविले. प्रयोगांतूनच १९४७ मध्ये जी. पी. एस्. ओखिअलिनी व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पॉवेल यांनी‌ π-मेसॉन (पायॉन,π+) या मूलकणाचा शोध लावला. इलेक्ट्रॉनाच्या २७० पट स्थिर स्थितीतील वस्तुमान असलेल्या या कणाचे १९३५ मध्ये हीडेकी यूकावा यानी सैधदांतीक रीत्या भाकीत होते. पॉवेल यांच्या प्रयोगांमुळे या कणाचे अस्तित्व तर सिद्ध झलेच शिवाय त्याच्या क्षय होण्याच्या प्रक्रियेने μ - मेसॉन व न्यूट्रिनो हे दोन कण तयार होतात हेही समजून आले. पॉवेल यांनी प्रतिपायॉन (π-) हा मूलकण तसेच K – मेसॉनांच्या क्षयाच्या रीती शोधून काढल्या. वातावरणातील विश्वकिरणांच्या प्रपातांच्या निर्मितीचे विस्तृत स्पष्टीकरणही त्यानी मांडले. अणुकेंद्रीय संशोधनात (विशेषतः मूलकणांच्या संशोधनात) व विश्वकिरणांच्या अभ्यासात पॉवेल यांच्या छायाचित्रण तंत्रामुळे नवीन कार्यक्षेत्र निर्माण झाले.

ते ते रॉयल सोसायटीचे व रशियाच्या अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. नोबेल पारितोषिकाखेरीज त्याना रॉयल सोसायटीचे ह्युज पदक (१९४९) व रॉयल पदक (१९६१), रशियाच्या अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लमनॉसॉव्ह सुवरेणपदक ९१९६७) इ. बहुमान मिळाले. पॉवेल यांनी जी. पी. एस्. ओखिअलिनी यंच्याबरोबर न्यक्लिअर फिजिक्स इन फोटोग्राफ्स (१९४७) आणि जी. एच्. फउलर व डी. एच्. पर्किन्स यांच्याबरोबर स्टडी ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स बाय द फोटोग्राफिक मेथड (१९५९) हे ग्रंथ लिहीले.

अणुकेंद्रीय संशोधनासाठी यूरोपात जिनीव्हा येथे स्थापन झालेल्या संघटनेच्या (CERN) प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक समितीचे ते तीन वर्ष अध्यक्ष होते. शास्त्रज्ञांच्या सामाजिक जबाबदारीची जाणिव झाल्यामुळे त्यांनी ⇨पगवॉश चळवळ सुरू करण्यात महत्त्वाचा भाग घेतला. तसेच ते वर्ल्ड फेडरेशन ऑफ सायंटिफिक वर्कर्स या संघटनेचे अध्यक्ष होते.

इटलितील कोमो सरोवरावरील बेलानॉ या गावाजवळ ते मृत्यू पावले.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.