Jump to content

सु.ल. गद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधाकर लक्ष्मण गद्रे हे मुंबईतील मुलुंड उपनगरातील बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक होते. त्यांनी मुलुंड आणि आसपासच्या भागात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले.

कौटुंबिक माहिती[संपादन]

गद्रे यांचे कुटुंब मूळचे सांगली होते. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. सु.ल. गद्रे यांनी वालचंद कॉलेज मधून १९५४मध्ये बी. ई. (सिव्हिल)ची पदवी घेतली. त्यानंतर ते महाराष्ट्र राज्य सरकारच्या रस्ते विभागात आणि नंतर मुंबई महापालिकेच्या नोकरीत दाखल झाले. काही वर्षांनी ती नोकरी सोडून त्यांनी मुलुंडमध्ये स्वतंत्र व्यवसायास प्रारंभ केला. त्यांनी आकिर्टेक्ट, इंजिनिअर आणि बांधकाम व्यावसायिक या नात्याने मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर घरबांधणी केली.

सामाजिक कार्य[संपादन]

गद्रे यांनी मुलुंडमधील विद्या झंकार, मुलुंड जिमखाना, रावसाहेब बाळाराम ज्ञानदेव ठाकूर शिक्षणसंस्था, महाराष्ट्र सेवा संघ अशा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये काम केले. या संस्थांना त्यांनी नियमितपणे आर्थिक मदतही केली. महाराष्ट्र सेवा संघाद्वारे मुलुंडच्या सांस्कृतिक जीवनात त्यांनी भर घातली.

महाराष्ट्र सेवा संघाची वीस हजार चौरस फुटांची वास्तू बांधण्यासाठी गद्रे यांनी अपना बाजार, युनायटेड वेस्टर्न बँक यांसारखे अनामत ठेवी आगाऊ देणारे भाडेकरू गद्रे यांनी मिळवून दिले.

पुरस्कारांची योजना[संपादन]

इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार देऊ केले. २००८ साली त्यांनी पुढील दहा वर्षांसाठीची पुरस्काराची नवीन योजना जाहीर केली होती.

विनोदी कथालेखक मुकुंद टाकसाळे यांना जानेवारी २०१८ मध्ये मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांना मार्च २०१५ मध्ये, २०१२ साली शेषराव मोरे यांना, २०११ साली गायिका वीणा सहस्रबुद्धे यांना व २०१० साली दिलीप प्रभावळकर यांना मिळाला होता. शांता शेळके, डॉ.मोहन आगाशे, चित्रकार शि.द. फडणीस, प्रतिमा इंगोले, शं.ना. नवरे, ना.धों. महानोर, डॉ.प्रभा अत्रे, विक्रम गोखले, ना.घ. देशपांडे ही मंडळींनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.

निधन[संपादन]

आयुष्याच्या शेवटी गद्रे यांचे पुण्यात वास्तव्य होते. तेथेही ते साहित्य आणि कलाविश्वाला आर्थिक मदतीचा हात देत राहिले. वयाच्या ७६व्या वर्षी, नोव्हेंबर २००८ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीमधून साली कोकणातील दाभोळ येथे बांधिलकी सु.ल. गद्रे प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापण्यात आली आहे.