Jump to content

सुहास जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सुहास जोशी
जन्म सुहासिनी सुभाष जोशी
१२ जुलै, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके गोष्ट जन्मांतरीची, बॅरिस्टर
प्रमुख चित्रपट आघात, तू तिथं मी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अग्निहोत्र, कुंकू
पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे "जीवनगौरव पुरस्कार"

सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी, (१२ जुलै, इ.स. १९४७ - हयात) या मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत. मराठी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये देखील कामे केली आहेत.

जीवन

[संपादन]

सुहास जोशी यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. बी.ए.ला त्यांचे तत्त्वज्ञान, मानशशास्त्र आणि संस्कृत हे विषय होते. कॉलेजात असताना सुहास जोशी यांनी चार-पाच नाटकांतून कामे केली होती. त्यांतले एक संस्कृत मालविकाग्निमित्र होते. हे नाटक घेऊन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा एक गट मुंबईला राज्य नाट्यस्पर्धेसाठी गेला होता. मात्र, सुहास जोशींनी काम केलेल्या या नाटकाला कुठलेही पारितोषिक मिळाले नव्हते. पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय संगीताची मध्यमा ही परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत. याशिवाय त्यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय(नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)येथे इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयशिक्षणाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पुरा केला आहे.

कारकीर्द

[संपादन]

सुहास जोशी यांची व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित बॅरिस्टरमध्ये इ.स. १९७२ मध्ये सुरू झाली. सख्खे शेजारी, बॅरिस्टर आणि गोष्ट जन्मांतरीची ही त्यांची गाजलेली नाटके. काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत आनंदी गोपाळमध्ये त्या होत्या. त्यांनी गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. बॅरिस्टरमधील त्यांची राधा, सई परांजपेंच्या सख्खे शेजारीमधील मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत. पुढे ऐंशीच्या दशकात आलेल्या तेंडुलकरांच्या कन्यादान या नाटकातील त्यांची व्यक्तिरेखा होती. या नाटकात डॉ. श्रीराम लागू प्रमुख भूमिकेत होते. सुहास जोशींनी श्रीराम लागू यांच्याबरोबर केलेली अग्निपंख, नटसम्राट, एकच प्याला ही नाटके गाजली. त्या येऊर येथील आपल्या घरी हौशी-प्रायोगिक नाट्यप्रयोगाचे दर महिन्याला आयोजन करीत असत. मराठी चित्रपटांमधल्या तू तिथे मीने सुहास जोशींना चार पुरस्कार मिळवून दिले.

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेचे त्यांनी एकपात्री प्रयोग केले.

वैयक्तिक

[संपादन]

त्यांचे पती सुभाष जोशी हेही नाटकवेडे आणि प्रायोगिक नाट्यचळवळीतील कलावंत होते. सध्या सुहास जोशी ठाणे येथे रहात असून त्या गडकरी रंगायतन येथे प्रशिक्षार्थींना नाट्याभिनय शिकवतात. याशिवाय, विनंतीवरून त्या शाळांमध्ये जाऊन मुलांनाही अभिनयाचे धडे देतात. हल्लीहल्ली त्या ठाणे शहरातल्या एन्व्हायरो व्हिजन नावाच्या पर्यावरणानुकूल प्रकल्पात सहभागी झालेल्या आहेत.

सामाजिक कार्य

[संपादन]

ठाण्याचे आयुक्त चंद्रशेखर यांच्या बदलीविरोधात ठाणे शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.

नाटके

[संपादन]

चित्रपट

[संपादन]

दूरचित्रवाणी मालिका

[संपादन]
  • अग्निहोत्र (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • एक धागा सुखाचा (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • ऋणानुबंध (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • किमयागार (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • कुंकू (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • धड़कन (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
  • सांजसावल्या (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणीपट)
  • ललित २०५ (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • तू तेव्हा तशी (मराठी दूरचित्रवाणी मालिका)

पुरस्कार

[संपादन]
  • सह्यादी या दूरचित्रवाणीवाहिनीचा इ.स.२०१०चा नवरत्‍न पुरस्कार
  • पी. सावळारामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा इ.स.२०११चा गंगाजमुना पुरस्कार
  • 'तू तिथे मी’तल्या अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी असलेला फिल्म फेअरचा, स्क्रीनचा, व्हिडिऑकॉनचा आणि महाराष्ट्र सरकारचा, असे चार पुरस्कार
  • रंगभूमीच्या सेवेसाठी नाट्यपरिषदेचा शाहू महाराज पुरस्कार
  • उत्तम नाट्याभिनयासाठी इ.स. १९७५चा, इ.स. १९७७चा आणि इ.स. १९८३चा, असे नाट्यदर्पणचे तीन पुरस्कार
  • 'इंद्रधनू ' या संस्थेतर्फे ' युवोन्मेष ' पुरस्कार
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे "जीवनगौरव पुरस्कार"
  • २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (जुलै २०१९)

बाह्य दुवे

[संपादन]