सुरेंद्र साए
सुरेंद्र साए या क्रांतीकारकांचा जन्म ओरिसा राज्यातील संबलपूर जिल्ह्यातील बोरगावचे रहिवासी असलेल्या धर्मसिंहजी यांच्या घरी २३ जानेवारी १८०९ रोजी झाला.
तरुणपण
[संपादन]सुरेंद्र साए तरुणपणातच नेमबाजी, अश्वरोहण, तलवारबाजी या युद्धकलांमध्ये निपुण होते. युवकांचे संघटन करून इंग्रजांविरोधात कार्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना संबलपूरमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. इंग्रज अधिकाऱ्यांचे सुरेंद्रवर लक्ष होते. इंग्रज सरकार त्यांना पकडण्याची संधी शोधत होते. इ. स. १८४० मध्ये इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला करून मारण्याच्या आरोप ठेवून सुरेंद्रजींना अटक करण्यात आली. आजीवन कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी हजारीबाग तुरुंगात त्यांची रवानगी झाली. इ. स. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी सुरेंद्रजींनी तुरुंग फोडून स्वतःची सुटका करून घेतली.
इंग्रजांविरूद्ध लढा
[संपादन]संबलपूर जिल्ह्यात इंग्रजाविरोधात सशस्त्र लढा उभारण्याच्या कार्याला सुरेंद्रजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःला वाहून घेतले. गनिमी काव्याने युद्ध करून इंग्रजांना जेरीस आणले. त्रस्त झालेल्या इंग्रज सरकारने त्यांना तह करण्यास तयार असल्याचे कळविले. त्यांच्या एका नातलगाला लालूच दाखवून सुरेंद्र साए यांना गद्दारीने फसविण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांना २३ जानेवारी १८६४ रोजी पकडून खांडव्याच्या असीरगढ किल्यात जेरबंद करण्यात आले. चवताळलेल्या इंग्रजांनी सुरेंद्रजींचा अतोनात छळ केला. त्यांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये तापलेल्या सळ्या टाकून त्यांना अंध करण्यात आले. अत्याचारामुळे सुरेंद्रजींची तब्येत खालावली आणि गंभीर अवस्थेतच २८ फेब्रुवारी १८८४ रोजा त्यांचा मृत्यु झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |