Jump to content

संवत्सर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साठ संवत्सरें या पानावरून पुनर्निर्देशित)

'संवत्सर (संवत) हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास 'चांद्र वर्ष' असेही म्हणतात. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते.[]

संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र असेही एक कालमापन आहे.

शालिवाहन शकाखेरीज अन्य बरीच संवत्सरे आहेत. त्यांची यादी या लेखाच्या शेवटी दिली आहे.

६० वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या ५ आणि शनीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा १/१२ काळ म्हणजे एक संवत्सर होय. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ११.८६२६ (सुमारे १२) वर्षे लागतात. म्हणजे १ संवत्सर म्हणजे ०.९८८५५ वर्ष होय. या फरकामुळे ८६ संवत्सरांमध्ये ८५ वर्षे पूर्ण होतात. जर संवत्सर आणि वर्षामध्ये एकास एक संबंध जोडायचा असेल तर ८५ वर्षांत एका संवत्सराचा लोप करावा लागतो.

संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. सम्यक् वसन्ति मासादया:अस्मिन् (ज्यात मास आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असे म्हणतात).[]

शालिवाहन शकाच्या संवत्सरांची नावे

[संपादन]

ही नावे काही विशिष्ट घटनांची त्या त्या वर्षातील नोंद घेऊन केली असावीत. (भृगू संहिता - जातक खंड). हा काल दोन ते अडीच हजार वर्षांचा असावा. खाली देण्यात आलेली नावे 'चांद्र संवत्सरांची' आहेत. ही एकूण ६० संवत्सरे आहेत. ही साठ वर्षे संपली की (म्हणजे शेवटचे 'क्षय संवत्सर' झाल्यानंतर) पुन्हा प्रभव या नावाचे नवे संवत्सर सुरू होते. कंसात इसवी सनाचा क्रमांक दिला आहे.

संवत्सर
क्रमांक नाव चालू कालचक्र

(ग्रेगोरियन)

चालू कालचक्र -

विक्रम संवत

पूर्वीचे कालचक्र १ (ग्रेगोरियन) पूर्वीचे कालचक्र २ (ग्रेगोरियन)
१. प्रभव १९८७-८८ २०४४ १९२७-२८ १८६७-६८
२. विभव १९८८-८९ २०४५ १९२८-२९ १८६८-६९
३. शुक्ल १९८९-९० २०४६ १९२९-३० १८६९-७०
४. प्रमोद १९९०-९१ २०४७ १९३०-३१ १८७०-७१
५. प्रजापति १९९१-९२ २०४८ १९३१-३२ १८७१-७२
६. अंगिरस १९९२-९३ २०४९ १९३२-३३ १८७२-७३
७. श्रीमुख १९९३-९४ २०५० १९३३-३४ १८७३-७४
८. भाव १९९४-९५ २०५१ १९३४-३५ १८७४-७५
९. युव १९९५-९६ २०५२ १९३५-३६ १८७५-७६
१०. धाता १९९६-९७ २०५३ १९३६-३७ १८७६-७७
११. ईश्वर १९९७-९८ २०५४ १९३७-३८ १८७७-७८
१२. बहुधान्य १९९८-९९ २०५५ १९३८-३९ १८७८-७९
१३. प्रमाथी १९९९-२००० २०५६ १९३९-१९४० १८७९-१८८०
१४. विक्रम २०००-०१ २०५७ १९४०-४१ १८८०-८१
१५. वृषप्रजा २००१-०२ २०५८ १९४१-४२ १८८१-८२
१६. चित्रभानु २००२-०३ २०५९ १९४२-४३ १८८२-८३
१७. सुभानु २००३-०४ २०६० १९४३-४४ १८८३-८४
१८. तारण २००४-०५ २०६१ १९४४-४५ १८८४-८५
१९. पार्थिव २००५-०६ २०६२ १९४५-४६ १८८५-८६
२०. अव्यय २००६-०७ २०६३ १९४६-४७ १८८६-८७
२१. सर्वजीत २००७-०८ २०६४ १९४७-४८ १८८७-८८
२२. सर्वधारी २००८-०९ २०६५ १९४८-४९ १८८८-८९
२३. विरोधी २००९-१० २०६६ १९४९-५० १८८९-९०
२४. विकृति २०१०-११ २०६७ १९५०-५१ १८९०-९१
२५. खर २०११-१२ २०६८ १९५१-५२ १८९१-९२
२६. नंदन २०१२-१३ २०६९ १९५२-५३ १८९२-९३
२७. विजय २०१३-१४ २०७० १९५३-५४ १८९३-९४
२८. जय २०१४-१५ २०७१ १९५४-५५ १८९४-९५
२९. मन्मथ २०१५-१६ २०७२ १९५५-५६ १८९५-९६
३१. दुर्मुख २०१६-१७ २०७३ १९५६-५७ १८९६-९७
३१. हेमलंबि २०१७-१८ २०७४ १९५७-५८ १८९७-९८
३२. विलंबि २०१८-१९ २०७५ १९५८-५९ १८९८-९९
३३. विकारी २०१९-२० २०७६ १९५९-६० १८९९-१९००
३४. शार्वरी २०२०-२१ २०७७ १९६०-६१ १९००-०१
३५. प्लव २०२१-२२ २०७८ १९६१-६२ १९०१-०२
३६. शुभकृत २०२२-२३ २०७९ १९६२-६३ १९०२-०३
३७. शोभन २०२३-२४ २०८० १९६३-६४ १९०३-०४
३८. क्रोधी २०२४-२५ २०८१ १९६४-६५ १९०४-०५
३९. विश्वावसु २०२५-२६ २०८२ १९६५-६६ १९०५-०६
४०. पराभव २०२६-२७ २०८३ १९६६-६७ १९०६-०७
४१. प्लवंग २०२७-२८ २०८४ १९६७-६८ १९०७-०८
४२. कीलक २०२८-२९ २०८५ १९६८-६९ १९०८-०९
४३. सौम्य २०२९-३० २०८६ १९६९-७० १९०९-१०
४४. साधारण २०३०-३१ २०८७ १९७०-७१ १९१०-११
४५. विरोधकृत २०३१-३२ २०८८ १९७१-७२ १९११-१२
४६. परिधावी २०३२-३३ २०८९ १९७२-७३ १९१२-१३
४७. प्रमादी २०३३-३४ २०९० १९७३-७४ १९१३-१४
४८. आनंद २०३४-३५ २०९१ १९७४-७५ १९१४-१५
४९. राक्षस २०३५-३६ २०९२ १९७५-७६ १९१५-१६
५०. आनल २०३६-३७ २०९३ १९७६-७७ १९१६-१७
५१. पिंगल २०३७-३८ २०९४ १९७७-७८ १९१७-१८
५२. कालयुक्त २०३८-३९ २०९५ १९७८-७९ १९१८-१९
५३. सिद्धार्थी २०३९-४० २०९६ १९७९-८० १९१९-२०
५४. रौद्र २०४०-४१ २०९७ १९८०-८१ १९२०-२१
५५. दुर्मति २०४१-४२ २०९८ १९८१-८२ १९२१-२२
५६. दुन्दुभी २०४२-४३ २०९९ १९८२-८३ १९२२-२३
५७. रूधिरोद्गारी २०४३-४४ २१०० १९८३-८४ १९२३-२४
५८. रक्ताक्षी २०४४-४५ २१०१ १९८४-८५ १९२४-२५
५९. क्रोधन २०४५-४६ २१०२ १९८५-८६ १९२५-२६
६०. अक्षय २०४६-४७ २१०३ १९८६-८७ १९२६-२७

हीच नावे विक्रम संवत्सरांची आहेत, पण त्यांचा सन वेगळा असतो.

शालिवान संवत्सराचे नाव निश्‍चितीचे गणित

[संपादन]

१). शालिवाहन शकाच्या संख्येत १२ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे जी बाकी राहील त्या अंकाइतक्या क्रमांकाचा संवत्सर, म्हणजे प्रभव संवत्सरापासून मोजल्यावर त्या क्रमांकावर जे नाव येईल ते त्या शकाचे नाव समजावे. बाकी शून्य राहिली तर क्षय संवत्सर.

इ.स. २०१३सालच्या गुढीपाडव्याला शके १९३५ सुरू झाला.

१९३५ + १२ = १९४७

१९४७ला ६० ने भागितल्यास भागाकार ३२ आणि बाकी २७ राहील.

या बाकी २७ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास २७ वे विजय संवत्सर येते. हे शके १९३५ या शकाचे नाव. इ.स. २०१४ च्या शकाचे नाव जय; आणि २०१५साली मन्मथ या नावाचा शक-संवत्सर होता.

विक्रम संवत्सराचे नाव निश्‍चितीचे गणित

[संपादन]

विक्रम संवत्सराच्या आकड्यात ९ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे. उरलेल्या बाकी एवढे अंक प्रभव संवत्सरापासून मोजावे म्हणजे विक्रम संवत्सराचे नाव मिळेल. शून्य बाकी उरल्यास क्षय संवत्सर.

२०१३साली दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत २०७० सुरू झाला.

२०७० + ९ = २०७९

२०७९ला ६० ने भागल्यास भागाकार ३४ व बाकी ३९ उरते.

३९वे संवत्सर ‘विश्‍वावसु’ आहे.

म्हणून इ.स. २०१३साली दिवाळीच्या पाडव्यानंतर चालू झालेल्या विक्रम संवत्सराचे नाव विश्‍वावसु संवत्सर होते. इ.स. २०१४ला पराभव नावाचा विक्रम संवत होता, तर २०१५ सालच्या विक्रम संवत्सराचे नाव प्लवंग.

शालिवाहन आणि विक्रम संवत यांसह अन्य संवत्सरे (अन्य शक)

[संपादन]

खाली दिलेल्यापेक्षा काही वेगळी नावे वर्षारंभ या पानावर आहेत.

  • कलचुरी (चेदी)संवत : यालाच चेदी संवत किंवा त्रैकूटक संवत म्हणतात. गुजरातमधील, कोकणातील आणि मध्य प्रदेशातील शिलालेखांत हा संवत वापरलेला असतो. कलचुरी संवताच्या आकड्यामध्ये २४९ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो.
  • कलियुग संवत : ग्रंथांत आणि शिलालेखांत कलियुग संवत्सराचा उल्लेख आढळतो. याची सुरुवात इसवी सन पूर्व ३१०१ या वर्षी झाली. इसवी सनाच्या आकड्यात ३१०१, विक्रम संवताच्या आकड्यात ३०४३/४४ आणि शक संवताच्या आकड्यात ३१७९/८० मिळवले की कलियुग संवताचे साल मिळते.
  • गांगेय संवत : होयनाडूमधील कलिंगनगरच्या कोणा राजाने सुरू केलेला हा संवत आहे. दक्षिणी भारतातील अनेक ठिकाणी हा वापरलेला आढळतो. गांगेय संवताच्या आकड्यामध्ये ५७९ मिळवले की इसवी सनाचा अंक येतो.
  • गुप्त संवत : यालाच गुप्त काल किंवा गुप्त वर्ष किंवा वलभी संवत म्हणतात. गुप्तवंशातील एखाद्या राजाने हा संवत सुरू केला असावा. नेपाळपासून ते गुजराथपर्यंत ह्याचा वापर होत असे. गुप्त संवताच्या सालामध्ये ३२० मिळवले की इसवी सनाचे वर्ष येते.
  • चालुक्य विक्रम संवत : आंध्र प्रदेशातील कल्याणपूरचा चालुक्य सोळंकी राजा ६वा विक्रमादित्य, ह्याने हा संवत सुरू केला. या संवताला चालुक्य विक्रमकाल, चालुक्य विक्रम वर्ष किंवा वीर विक्रम काल अशीही नावे आहेत. या संवताच्या अंकात १०७६ मिळवले की इसवी सन येतो.
  • तामिळी वर्ष : हे १४ एप्रिलला किंवा त्याच्या आजूबाजूच्या दिवशी सुरू होते.
  • पारशी सन : पारसी नवीन वर्ष जगभरात २१ मार्चला सुरू होते, भारतात आणि पाकिस्तानात ते बहुधा १७ ऑगस्टला सुरू होते. इसवी सन २०२३ च्या अनुसार पारशी सन १३९३ चालू आहे.
  • बार्हस्पत्य संवत : गुरू ग्रहाच्या आकाशातील उदयास्ताप्रमाणे हा चालतो.
  • बुद्धनिर्वाण संवत : हे संवत गौतम बुद्धांच्या महानिर्वाण पासून म्हणजे ई.स.पू ४८३ पासून चालू आहे. २०२३ च्या नुसार बुद्धनिर्वाण संवत २५०६ चालू आहे.
  • भारतीय (सरकारी) राष्ट्रीय वर्ष : हे २१/२२ मार्चला सुरू होते.
  • युधिष्ठिर शक : अन्य मतानुसार, कलियुगाच्या प्रारंभाआधी ३६ वर्षांपूर्वी युधिष्ठिर शकाची सुरुवात झाली.).
  • राज्याभिषेक संवत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सुरू झालेला शक. इसवी सन १६७४ च्या जून महिन्यात ०६ तारखेला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ला याचा प्रारंभ झाला.
  • विक्रम संवत : विक्रम संवत्सरा चे नवीन वर्ष दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी (कार्तिक शुक्ल प्रतिपदा-बलि प्रतिपदा)ला सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यात ५६ किंवा ५७ मिळविले की विक्रम संवताचा आकडा येतो. विक्रम वजा १३५ = शक संवत.
  • वीरनिर्वाण संवत : ह्याच्या सनाचा आकडा विक्रम संवताच्या आकड्यापेक्षा ६९-७० ने मोठा असतो.
  • शालिवाहन शक : इसवी सनाच्या आकड्यामधून ७८ किंवा ७७ वजा केले की शालिवाहन शकाचा आकडा मिळतो.
  • शाहूर (शुहूर/सुहूर) सन : सुहूर सनात साधारणतः ५९९ ते ६०० वर्षे मिळवल्यावर इसवी सन मिळतो. पेशवे काळातील पत्रात सुहूर कालगणनेनुसार तारखा दिलेल्या असतात.
  • सप्तर्षी संवत : प्रारंभ इ.स.पू. ३०७६ साली.
  • हिजरी सन : इसवी सन २०२३ च्या अनुसार हिजरी सन १४४५ चालू आहे. दर मोहरम च्या पहिल्या दिवशी हिजरी सन बदलते.

(अपूर्ण)

हे सुद्धा पहा : वर्षारंभ

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. ^ Bhardwaj, Krishan Kant (2016-08-06). Jyotish Nibandhmala (हिंदी भाषेत). Educreation Publishing.
  2. ^ झा, पं० भवनाथ. धर्मायण, 2079 वि.सं. भाग-3, अंक 125-128 (हिंदी भाषेत). Mahavir Mandir Patna.