सहगायन (लोककथा)
विद्या विनयेन शोभते ही सुप्रसिद्ध म्हण आहे. त्याचे जणू मूर्त रूपच अशी ही लोककथा आहे.
कथेचा आशय
[संपादन]खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एक महान गायिका, तिच्या अद्भुत आवाजामुळे आणि उत्कृष्ट प्रतिभेमुळे ती जगद्विख्यात झाली होती. ती जिथे जात असे तिथे तिच्या मागे तिच्या चाहत्यांची गर्दी होत असे.
अशीच एकदा ती एका पार्टीला गेली होती. तिथे एका लहान मुलीला गाणे गायला सांगण्यात आले होते. तिचा आवाज सुमधुर होता. ती ज्या गाण्याची तयारी करत होती ते एक युगलगीत होते. ती छोटी मुलगी गाण्याचे मुख्य बोल गाणार होती. पण तिला दुसरे बोल गाण्यासाठी कोणा गायकाची आवश्यकता होती.पण कोणीही साथीचे गाणे गाण्यास तयार नव्हते.
तिने बऱ्याच जणांना विनंती केली. पण प्रत्येकाने काही न काही कारण सांगून नकार दिला. लहान मुलीसोबत गाणे कमीपणाचे आहे असे सर्व प्रौढ गायकांना वाटत होते. क्षणभर स्तब्धता पसरली. त्या मुलीला साथ देण्यास कोणीही तयार झाले नाही. ती मुलगी हिरमुसली झाली. एवढ्यात सगळ्यांचे लक्ष पुढे येणाऱ्या त्या प्रसिद्ध गायिकेकडे वळले. ती गायिका त्या छोट्या मुलीच्या जवळ गेली. आणि तिला म्हणाली, '' मी तुझ्यासोबत गाणे गायलेले तुला चालणार असेल तर मी गाणे गाईन.'' मुलीला काय बोलावे तेच कळेना. ती हरखून गेली. दोघींनी मिळून ते युगलगीत गायले. छोट्या मुलीचा स्वर मुख्य होता आणि ती प्रसिद्ध गायिका तिच्या सुरात सूर मिसळत होती. एक सुंदर सुसंवाद निर्माण झाला होता.
तात्पर्य
[संपादन]एका छोट्या मुलीला आपली सेवा देण्यास तयार असलेल्या त्या गायिकेचे हृदय किती उदात्त होते, हेच या कथेतून लक्षात येते.[१] मोठ्यांचे असामान्यपण हे त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टीमधून कसे अभिव्यक्त होत असते ते येथे दिसून येते.
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.