सर्वंकषवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्वंकषवाद ( टोटॅलिटॅरियनिझम ).जनजीवनाच्या सर्व क्षेत्रांवर नियंत्रण ठेवू इच्छिणारी एक विचारप्रणाली. ही विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विकसित झालेली एक सैद्धांतिक हुकूमशाहीप्रेरित राजकीय तत्त्वप्रणाली होय. तिची उत्पत्ती मुख्यत्वे पहिल्या महायुद्धानंतर यूरोपीय देशांत, विशेषतः जर्मनीत उद्‌भवलेल्या राजकीय, आर्थिक व सामाजिक अस्थिर परिस्थितीत आढळते.

सर्वंकषवाद हा ‘ टोटॅलिटॅरियनिझम ’ या इंग्रजी संज्ञेचा मराठी पर्यायी शब्द होय. ही इंग्रजी संज्ञा ‘ टोटलिटॅरिओ ’ या इटालियन शब्दावरून प्रथम इटलीत रूढ झाली. ती बेनीतो मुसोलिनी ( कार. १९२२-४३) याने १९२० नंतरच्या दशकात प्रथमत: तयार केली. तत्संबंधीच्या स्पष्टीकरणात मुसोलिनी म्हणतो, ‘ सर्व काही राज्यसंस्थेच्या मर्यादेच्या आत ( अंतर्भागात) असले पाहिजे काहीही राज्याच्या कक्षेबाहेर असता कामा नये आणि राज्यसंस्थेला प्रतिकूल असे काहीही घडता कामा नये ’. दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात सर्वंकषवाद ही संज्ञा दुःसह ( जुलमी ) व अनिर्बंध एकपक्षीय शासनपद्धतीची समानार्थदर्शक किंवा पर्यायवाचक संज्ञा म्हणून प्रसृत झाली.

सर्वंकषवादाच्या पुरस्कर्त्यांनी देशहितार्थ एक विशिष्ट तत्त्वज्ञान व सैद्धांतिक तत्त्वप्रणाली विकसित केली. तिला देशपरत्वे नाझीवाद ( जर्मनी), फॅसिझम ( इटली ), कम्युनिझम वा साम्यवाद ( रशिया-चीन ) इ. भिन्न नामांतरे प्राप्त झाली. हे सर्व एकपक्षपद्धतीचा ध्येयवाद मान्य करतात. रशियन राज्यक्रांतीनंतर लेनिनने सोव्हिएट युनियनमध्ये आणि चिनी कांतीनंतर माओ त्से-तुंगने चीनमध्ये अशा प्रकारची एकपक्षपद्धती प्रस्थापित केली. जर्मनीत ॲडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नॅशनल सोशॉलिस्ट पक्ष ( नाझी ) किंवा इटलीतील बेनीतो मुसोलिनीच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट पक्ष यांनी सत्तेवर आल्यानंतर एकपक्षपद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या जागी पक्षाचे सभासद नेमून शासनयंत्रणा ताब्यात घेतली. या शासनयंत्रणेत पक्ष, कर्मचारी, प्रशासन आणि लष्कर विशेषतः गुप्तहेरखाते यांत निकटचे सहकार्य निर्माण केलेले असते. सभासदांना किंवा पक्ष-कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रशिक्षण देण्यात येते आणि जनतेच्या पाठिंब्याचा आभास निर्माण करण्यासाठी निवडणुकांची बतावणी ( फार्स ) करावी लागते. या शासनयंत्रणेत देशातील सर्व जनता, संस्था, आर्थिक व्यवहार, लष्कर इ. सर्व पक्षाच्या वा पक्षनेत्याच्या नियंत्रणाखाली असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांना किंमत नसते. या यंत्रणेला विरोध करणारे शत्रू समजण्यात येतात.

सर्वंकषवादात नेता, सत्ताधारी पक्ष आणि त्यांनी राष्ट्रहितार्थ स्वीकारलेली मतप्रणाली किंवा तत्त्वज्ञान यांचाच सर्वत्र उदोउदो होतो. सामान्यत: सर्वंकषवादी नेत्याभोवती निसर्गातील अलौकिक-अद्‌भुत विभूतितत्त्वाचे वलय निर्माण करण्यात येते. त्यामुळे नेत्याची तुलना सर्वशक्तिमान देवतेबरोबर केली जाते.

संदर्भ[संपादन]

1. Arendf, Hannah, The Origins of Totalitarianism, London, 1966.

2. Friedrich, Carl J. Zbigniew, K. Brzezinski, Totalitarian Dictatorship and Autocracy, New York, 1965.