Jump to content

समाधान कशात आहे? (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाधान मोठ्या ऐशोआरामात नाहीत, तर योग्य वेळी आवश्यक ती गोष्ट मिळण्यात समाधान असते हे सांगणारी ही कथा.

कथेचा आशय

[संपादन]

रामशरण हा एक रामभक्त होता. त्याचे जीवन साधेसरळ होते आणि लोकांना स्वतःच्या उदाहरणाने व प्रवचनाद्वारे शिकवण देणे ह्यातच त्याचा सर्वोच्च आनंद सामावलेला होता. लोकांनी दिलेल्या भिक्षेवर त्याचा उदरनिर्वाह चालत असे.

एके दिवशी तो आणि त्याचा सहकारी हरिदास एका गावातून चालले होते; रस्त्याच्या एका बाजूने हरिदासाने भिक्षा मागायला सुरुवात केली तर रामशरण त्याच्या दुसऱ्या बाजूने भिक्षांदेही करत निघाला.

हरिदास उंचापुरा, देखणा होता तर रामशरण बुटका, दिसायला यथातथाच होता. लोकांनी हरिदासला उदारपणे भिक्षा वाढली पण रामशरणला थोडीच भिक्षा मिळाली. थोड्या वेळाने दोघे पुन्हा गावाच्या वेशीबाहेर भेटले. ते तेथूनच वाहणाऱ्या स्वच्छ झऱ्याच्या काठी एका शिळेवर बसले आणि दोघांना मिळालेली भिक्षा त्यांनी एकत्र केली.

“हरिदास,'' रामशरण हर्षभरित होऊन म्हणाला, “आज आपल्याला केवढी मोठी मेजवानी मिळाली आहे बघ.''

हरिदास उत्तरला, “या एवढ्याशा भाकरतुकड्यांना मेजवानी म्हणून संबोधावे असे त्यात काय आहे? आपल्याकडे ताटवाट्या नाहीत, घरदार नाही, नोकरचाकर नाहीत. मेजवानी कसली त्यात?”

तेव्हा रामशरण म्हणाला, “जेव्हा माणूस भुकेला असतो तेव्हा ताजी भाकरी मिळणे आणि जेव्हा तो तहानलेला आहे तेव्हा त्याला नितळ अशा झऱ्याचे ताजे, स्वच्छ पाणी प्यायला मिळणे, ही मेजवानीच नाही का?”

तात्पर्य

[संपादन]

भौतिक सुखसोयी किंवा बाह्य संपत्ती नसतानादेखील महात्म्यांच्या ठायी सहज, उपजत असणाऱ्या उदात्त जीवनामुळे आणि प्रसन्नतेमुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना कसे समाधान मिळते, हे या कहाणीतून समजते.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.