सदस्य:Kailassalade

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
‘भुईशास्रा’तील आदिम मातृसत्ताक संस्कृतीच्या अस्पष्ट खुणा 


प्रा.कैलास सलादे, मराठी विभाग, सा.फु.पुणे विद्यापीठ पुणे. मोबा-९९२१५२८४२१


  शेतीचा लागलेला शोध हा मानवी संस्कृती स्थापनेतील प्रारंभ बिंदू होय.शेतीचा शोध हा स्रीने लावला याबद्दल सर्व अभ्यासक सहमत आहे.कृषीचा शोध स्रीने लावल्याने मानवी संस्कृतीच्या स्थापनेत तिचा मुख्य सहभाग स्पष्ट होतो.या संस्कृती प्रारंभावस्थेत संस्कृतीची प्रमुख म्हणून स्रीच होती.प्रारंभीच्या मातृसत्ताक कृषिसंस्कृतीत “शिकार करणारा (hunter and food gatherer)पुरुष हा तिच्या आश्रयाने नांदत होता.”१ प्रारंभ अवस्थेत स्रीला प्रतिष्ठा होती.कारण स्री आणि भूमी यांच्यातील गर्भधारणक्षमतेबद्दल मानव भांबावलेल्या अवस्थेत होता.स्रियांची ही सर्जनशीलता बघून स्रियांबद्दल त्याच्या मनात आदर आणि भीती  या दोन्ही भावना निर्माण झाल्या असाव्या.कारण मातृसत्ताक कृषिसंस्कृतीमध्ये बर्याच कृषिदेवता ह्या स्रीरूपी होत्या. “स्री हे विश्वनिर्मितीचे,सृजनाचे केंद आहे.उगमस्थान आहे.तिच्यात अलौकिक आणि विलक्षण यातुशक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा होती.”२ डॉ. रा.चिं.ढेरे एक निरीक्षण नोंदवतात की खननयष्टी(डीगिंग स्टीक) च्या साह्याने स्रीने शेतीला सुरुवात केली.या कालावधीत समाजजीवनात स्रीचे स्थान महत्वाचे होते. “कारण अगदी प्राथमिक अवस्थेत उत्पादनाची शक्यताच नसल्याने श्रमविभागणीचा प्रश्नच निर्माण झालेला नसावा.पुरुषांकडे विशिष्ट असे काम नव्हते.स्रीकडे मात्र मुलांची जोपासना नैसर्गिक रीत्या असल्याने या श्रमाविभागणीला पूर्व प्राथमिक अवस्थेत स्रीचे स्थान अधिक महत्वाचे होते.”३ “लोकायत परंपरेने वामाचारात स्रीला प्राध्यान्य दिले होते.स्री हीच विश्वाची माता आहे असेही या परंपरेत मानले गेले.”४संस्कृतीच्या निर्मितीत कृषीच्या शॊधाचा वाटा महत्वाचा आहे.हा कृषीचा शोध सहजासहजी लागलेला शोध नाही.काळाच्या निरीक्षणातून आणि प्रयोगातून स्रियांनी प्राथमिक अवस्थेतील शेतीचा शोध लावून भटकंतीला कंटाळलेल्या मानवाला स्थिरता मिळवून दिली. म्हणून  त्याकाळात समाजजीवनात “स्रियांना उच्चपदस्थ भूमिका मिळाली असावी.एखाद्या  गटाची व जमातीची संपत्ती नव्या पिढीच्या हातात देण्याचे काम स्रिया करीत असत.सर्व प्राचीन समाजामध्ये जो मातृदेवतांचा पंथ दिसतो.त्यातून स्रीची उच्चभूमिका दिसते.”५ संस्कृती निर्माणात महत्वाचे योगदान देणाऱ्या स्रीचे नंतरच्या काळात अवमूल्यन झाले.संस्कृतीच्या प्रधानावस्थेकडून ती दुय्यम अवस्थेकडे फेकली गेली.स्रीचे हे अवमूल्यन “सीमान द बूव्हा’ एक मानवी जीवनातील ,इतिहासातील पायरी व टप्पा समजतात.”६ मुळात हे अवमूल्यन खननयष्टीच्या शेतीकडून नांगराने केल्या जाणाऱ्या कृषीकडे जी वाटचाल झाली तिच्यामुळे घडले असे रा.चिं.ढेरे मत नोंदवतात.नांगराकडे कृषीची जी वाटचाल झाली “ती पुरुषसत्तेच्या प्रस्थापनेची नांदी ठरली.शेती(क्षेत्रासत्ता ,क्षेत्रप्रतिष्ठा)संपून,तिच्या जागी कृषी (म्हणजे कर्षसत्ता) स्थिरावली.जोवर खननयष्टीच्या साह्याने स्री करवी शेती होत होती .तोवर निसर्गाशी/सृष्टीशी आमौपम्यवृतीचा अनुभव घेतला जात होता.परंतु कर्षसत्तेत भूमी आणि तिच्याशी समरूपता साधणारी स्री केवळ भोगवस्तू बनली,भोगवासना बनली.”७ नांगराच्या साह्याने शेतीला प्रारंभ झाला.या अवस्थेत स्री शारीरिक असमर्थतेमुळे नांगराच्या अधिक कष्टाच्या शेतीपासून दूर झाली.पुरुषाने कृषिव्यवस्था आपल्या हाती घेतली.मुळातील मातृप्रधान संस्कृती नष्ट होत गेली.आर्यांची पुरुषप्रधान संस्कृती सर्वत्र वर्चस्व निर्माणकर्ती झाली.मुळातील नैसर्गिक,आदिम अशी मातृसंस्कृती नष्ट होऊन नंतरच्या काळात स्री पुरुषाची गुलाम बनली.मनुस्मृतिने तिच्या अभिव्यक्तीचे,अविष्काराचे स्वतंत्र्य नाकारले.आणि तिचे अस्तित्व गौण ठरवले.
       एके काळाची ही मातृप्रधान संस्कृती नष्ट झाली असली तरी कोणतीही संस्कृती ही पूर्णतः कधीच नष्ट होत नसते.तिच्यातील काही अवशेष हे नंतरच्या पिढ्यात अभौतिक संस्कृतीचे घटक म्हणून टिकून राहतात.आदिम मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा या सजीवाशेष रूपाने लोकगीते,लोककथा,उखाणे,म्हणी,विधीविधानाच्या रूपाने  साहित्यात टिकून राहतात. “भारतामध्ये अगदी अलीकडेपर्यंत आसाममधील खासी जमातीमधील आणि त्रावणकोर कोचीन मधील नायर जमातीमध्ये मातृसत्ताक समाजपद्धती अस्तिवात होती.”८ सातवाहन राजवटीतील राज्यकर्ते आपल्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावत याकडे मातृसत्ताक संस्कृतीचा एक अवशेष म्हणून बघायला हवे.मराठी साहित्यामधून मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा शोधता येतात.
       ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘भुईशास्र’(२०११) या काव्यसंग्रहातून आदिम अशा मातृसंस्कृतीच्या काही अस्पष्ट खुणा दिसून येतात.काव्यसंग्रहाच्या शीर्षकातच ‘भुई’ हा मातृप्रतिमेचा आदिबंध सांगणारा शब्द आहे.मुळात भूमी आणि स्री यांच्यातील एकरूपता हे मातृसत्ताक संस्कृतीचे एक महत्वाचे वैशिष्ट्ये होते. “भूमी आणि स्री यांची एकरूपता माणसाच्या मनोविश्वात भूमीच्या  सर्जनशीलतेचा आणि स्रीच्या  सर्जनशीलतेचा अनुभव माणसाने परस्पर भाषेत मांडला आहे.कधी भूमीला स्री मानून तिच्यावर स्रीचे निसर्गधर्म आरोपित केले आहे.तर कधी स्रीला भूमी मानून तिच्यावर भूमीचे निसर्गधर्म आरोपित केले आहेत.”९ पाटेकरांच्या ‘भूईशास्र’या काव्यसंग्रहातून ‘स्री’चे,स्रीच्या भावजीवनाचे ,समाज स्थानाचे आणि तिच्यावरील सांस्कृतिक वर्चस्वाचे अनेक रूपे व्यक्त झाली आहे.या संग्रहातील रूपांमध्ये ‘माय आणि भुई’ह्या दोन रूपातील साध्यर्म्य वौशिष्ट्य पूर्ण आहे .ह्या कवितेतील स्री ही पुरुषप्रधान व्यवस्थेत दुय्यम स्थानावर फेकली गेलेली आहे.पुरुषीव्यवस्थेशी संघर्ष करणारी आणि आपली मातृसत्ताक जीवनपद्धती जपू बघणारी स्री या कवितेत ‘आई’च्या रूपाने जाणवते.मातृसत्ताक कृषिव्यवसायावर हळूहळू पुरुषांचे वर्चस्व प्रस्थापित होत गेले आणि स्रीच्या स्थानाचे अवमूल्यन होत गेले.ह्या गोष्टींचा संदर्भ पाटेकरांच्या ‘मुंगीचिया विवरी’या कवितेत जाणवतो. “आईने पेरलं वावर/स्वतःच्या हातानं/उगवून आल्यावर म्हणाली/एवढा हिर्वा हिर्वा/हिर्वा हिस्सा माझा/माझ्या एकटीचा/नेमकी तितकंच/तेवढंच हिर्व तिच्या भरताराच्या डोळ्यात खुपलं/आईच्या हिर्व्या हिस्स्याचं जाळीत झालं..”१० हा संदर्भ स्रीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचा आहे.मुळ मातृसत्ताक संस्कृती ज्या पुरुषी कावेबाजीतून नष्ट झाली तोच गनिमीकावा कवितेतील भ्ररताराकडून केला गेला आहे.आदिम मातृप्रधान संस्कृतीत स्रीच्या हातातून शेती ज्या पद्धतीने काढून घेतली व स्रीला दुय्यम स्थानावर आणले तो आदिम संस्कृतीतील सांस्कृतिक स्थित्यंतराचा संदर्भ संस्कृतीतिहासाची पुनरावृत्ती करतो.
           मातृसत्ताक संस्कृतीमध्ये पुरुषाला फारसे महत्वाचे स्थान नव्हते.पित्याचा कुळाशी फारसा संबंध नव्हताच.आर्य संस्कृतीत मात्र ‘पिता’हा सर्व कुटूंब व्यवस्थेचा प्रमुख आणि समाज व्यवस्थेत आदराचे स्थान प्राप्त झालेला होता.त्यामुळे ऐश्वर्य पाटेकर यांच्या कवितेतील वेगळ्याच बापाची प्रतिमा बघून ह्या प्रतिमेवर काहींनी आक्षेप नोंदवले आहे.आपल्या संस्कृती विचारात पाटेकरांनी चितारलेली बापाची प्रतिमा बसत नाही असे आक्षेपकर्त्यांचे म्हणणे होते.मात्र त्यांच्या कवितेतील बापाची प्रतिमा ही आदिम मातृसत्ताक संस्कृती सदर्भातून आलेली आहे.पुरुषाचा “मातृसत्ताक समाजात पित्याच्या कुळाशी संबंध जवळ जवळ नसतोच.चिनी भाषेत कुळवाचक शब्दाचा अर्थ ‘स्री पासून’ जन्मलेला असा होतो.अतिप्राचीन काळातील मातृसत्तकाचा हा अवशेष असावा. ‘खासी’ टोळ्यांमध्ये from the women sprang the clan’ असा वाक्प्रचार आहे.मुलाचा वंश आईवरून ठरतो.पिता हा केवळ निमित्तकारण म्हणून जन्मदाता(begetter)होय,’स्रीला’भेट देणारा परका पाहुणा एवढेच त्याचे स्थान!”११ पाटेकरांच्या कवितेतली बाप  प्रतिमाही या पेक्षा वेगळी नाही.म्हणून बापाची ओळख सांगताना कवी म्हणतो-“आईनं बोट दाखवलं तुझ्याकडे/म्हणून तुला बाप समजतो/बाकी काय खुणा आहे तुझ्या/तू माझा बाप असल्याच्या माझ्यात.”१२ ही बापाची ओळख पुरुषप्रधान संस्कृती रक्षकांना खटकणारी आहे.मात्र कवीच्या भावविश्वात आदिम मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा ह्या निमित्ताने स्पष्ट झाल्या आहे.
          कवितेतील बापाच्या प्रतिमा ‘पितृत्व’आदिबंधाच्या विरोधाभासी आहे.पित्याचा किंवा बापाचा आदिबंध पाऊस,मार्गदर्शक,सावली या प्रतिमातून व्यक्त होतो.मात्र येथे बापाची प्रतिमा –“ठणक बेंबीच्या देठीला/मशागतीतून मागे राहिलेलं धसकट/खसकन खुपसलं पायात/हाच तो बाप,ज्यानं मोडला आईचा खोपा/छाकट्या छिनालगवश्या बाईसाठी.”१३मातृसंस्कृतीत कुटूंब व्यवस्थेची प्रमुख म्हणून स्रीच मुख्य होती.याचा संदर्भ भुईशास्रात दिसतो. “पिकाच्या मधोमध पोहचलो/जगून राठ झालेल्या शरीराचं/भूरभूरलं जावळ/ह्याच त्या माझ्या चार बहिणी/आईच्या जात्यापाळच्या ऒवीतल्या चार गावच्या बारवा/अन मी मधी जॊंधळा हिरवा.”१४ या लॊकगीत आणि संकेतांच्या जवळ जाणा-या कवितेत बापाचे स्थान मुळीच दिसत नाही.कारण बापानं “गॊमाशी झटकावी इतक्या सहजतेने/झटकून फेकलं नातं.”१५ किंवा “रानभर चरणारी चंद्रीगाय/संध्याकाळी माझ्याच गव्हाणीत आपसूक येऊन/उभी राहते खुंट्याशी बिनदाव्याची/तू तर कधीच वळाला नाहीस/माझ्या घराकडं.’’१६
     कवितेतल्या बाप प्रतिमेनं कधीच पितृत्व स्वीकारलं नाही.बाप म्हणून ज्या जबाबदा-या आणि कर्तव्य असतात त्या त्याने कधीच पूर्ण केल्या नाही.स्रीला भेट देणारा एक परका पाहूणा किंवा ‘बिगेटर’या भूमिकेपलिकडे तॊ कधीच गेला नाही.मातृसत्ताक पध्द्तीमध्ये पुरुष हा “In jawai he neither live not eats in his wise’s house,but visites it only other dark.”१७ ह्या पुरताच मर्यादित राहिला. मातृसंस्कृतीत “पुरुषाला स्रीच्या गर्भधारणेच्या प्रक्रीयेतील आपली ताकद आणि यॊगदान माहित नसल्याने तॊ तंत्र आणि यातू या दॊहॊमध्ये भांबवलेल्या अवस्थेत होता.”१८ असे निरिक्षण विद्यूत भागवत यांनी  नॊंदवलेले आहे.पाटेकरांच्या कवितेतील बापाच्या प्रतिमा ह्या संस्कृतीकक्षात न बसणा-या अशा आढळून येतात. कारण मातृसंस्कृतीत “पुरुषाला महत्वाचे स्थान नाही.स्रीच्या नात्यातील माणसांच्या दृष्टीने तॊ अगदी परकाच मानला जातॊ.केवळ ‘बिगेटर’ या शब्दानेच ते त्याचा उल्लेख करतात.एकेकाळी अज्ञात असलेले निर्मिती क्रीयेतील पुरुषाचे स्थान ज्ञात झाल्यावर त्याला ‘बिगेटर’हे स्थान तरी लाभले.परंतु व्यावहारिक जीवनात कुटूंबाच्या दृष्टीने त्याला मुळीच स्थान  नसल्याने तो केवळ ‘उदासिन’ परका पाहूणाच राहिला.”१९
          ‘भुईशास्र’ या ऍश्वर्य पाटेकर यांच्या संग्रहातील बापाची प्रतिमा यापेक्षा वेगळी नाही.या काव्यसंग्रहभर बापाची प्रतिमा ‘nagetive’(नकारात्मक)स्वरूपाची राहिली आहे.कारण ‘भुईशास्र’ ह्या संग्रहात आदिम मातृसत्ताक संस्कृतीच्या अस्पष्ट खुणा स्पष्ट झाल्या आहे.

संदर्भ- 1-ढेरे रामचंद्र चिंतामण,’श्री आनंदनायकी’,पद्मागंधा प्रकाशन पुणे,प्रथम आवृत्ती,२००२,पृ.९४. 2-लोहीया शैला, ‘भूमी आणि स्री’, गॊदावरी प्रकाशन ऒरंगाबाद,जुलै २०००,पृ.१७. 3-गाडगीळ स.रा., ‘लोकायत’,लोकवाड्‍मय गृह प्रा,लि.मुंबई,व्दि.आ.१९९४,पृ.६८. 4-तंत्रैव,पृ.२४. 5-विद्यूत भागवत, ‘स्रीवादी सामाजिक विचार’,डायमंड पब्लिकेशन पुणे,प्र.आ.२००८,पृ.१११. 6-तंत्रैव,पृ.१११. 7-ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.९४. 8-गाडगीळ स.रा.,उनि.पृ.७२. 9- ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.९३. 10-पाटेकर ऍश्वर्य, ‘भुईशास्र’,शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर,प्र. आ. २०११,पृ.४६. 11-गाडगीळ स.रा.,उनि.पृ.१३१. 12- पाटेकर ऍश्वर्य, उनि.पृ.49. 13- तंत्रैव,पृ.41. 14- तंत्रैव,पृ.42. 15- तंत्रैव,पृ.49. 16- तंत्रैव,पृ.49. 17- गाडगीळ स.रा.,उनि.पृ.131 . 18- ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.111. 19- गाडगीळ स.रा.,उनि.पृ.131 .