सदस्य:सुबोध कुलकर्णी/s5

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गंगूबाई यांच्या आडनावाला एक इतिहास आहे. त्यांच्या खापरपणजी गंगव्वा यांचे यजमान धारवाड जवळील नरगुंद या संस्थानात नोकरीला होते. या संस्थानाचे राजे बाबासाहेब यांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सरकारविरोधात भाग घेतला. त्यांच्या दत्तक विधानाचा प्रस्ताव कोल्हापूरच्या कर्नल मन्सन यांने नामंजूर केल्याने त्यांनी युद्ध सुरु केले. सर्वांनी नरगुंद सोडून सुरेभान येथील जंगलात आश्रय घेतला. तेथे लढाई होवून त्यात मन्सन मारला गेला. बाबासाहेबांनी त्याचे मुंडके नरगुंदच्या वेशीवर टांगले आणि धड धारवाड कचेरीत पाठवले. याचा सूड घेण्यासाठी इंग्रजांनी कर्नल सूटर याला मोठ्या फौजेसह पाठवले. फितुरीमुळे बाबासाहेब पकडले गेले. त्यांच्या पत्नी व आई यांनी मलप्रभा नदीत देह अर्पण केले. दहशत बसविण्यासाठी बाबासाहेबांची बेळगावात सर्वकडे धिंड काढून त्यांना जाहीर फाशी देण्यात आली. कारभारी राघोबा यांनाही फाशी देण्यात आली. गंगव्वा यांचे यजमान अखेर भूमिगत झाले. ब्रिटीश अधिकारी सतत त्रास देऊ लागल्याने गंगव्वा नरगुंद सोडून सुरक्षित अशा हनगल गावात स्थायिक झाल्या. चौकशीपासून वाचण्यासाठी या गावाचे नाव त्यांनी आपल्या नावापुढे जोडले. हे गाव धारवाडपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.