Jump to content

सच्चेपणाचे मोल (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देव भावाचा भुकेला असतो असे म्हणतात, त्याचा प्रत्यय देणारी ही लोककथा आहे.

कथेचा आशय

[संपादन]

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका गरीब माणसाने स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी, दिवसभर शिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. अंधार पडला तरीही तो जंगलातच होता, एकटा, भुकेलेला, थकूनभागून गेला होता. त्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले होते. शिकार नाही तर नाही, निदान एखाद्या घरट्यामध्ये तरी काही मिळते का ते पाहावे म्हणून तो बेलाच्या झाडावर चढला.पण त्याला काही घरटे सापडले नाही. खायला घेऊन येणाऱ्या वडिलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बायकामुलांची त्याला आठवण झाली आणि त्याला त्यांच्या विचाराने रडू कोसळले. ते अश्रू बेलाच्या पानांसहित झाडाखाली असलेल्या शिवलिंगावर ओघळले. शिवभक्त शिवाला ही बेलाची त्रिदले वाहत असतात. पण इथे अगदी अभावितपणे त्रिदल शिवलिंगावर वाहिले गेले होते. त्याच वेळी त्याला सापाने दंश केला आणि तो शिकारी मेला. ताबडतोब त्याच्या जीवाला देवांच्या घरी नेण्यात आले आणि शंकराच्या पुढ्यात उभे करण्यात आले. “या माणसाच्या आत्म्याला येथे जागा नाही,” स्वर्गवासी लोक एका सुरात किंचाळले. “कारण त्याला पवित्र नीतिनियमांची माहिती नाही, तो अभक्ष्य भक्षण करीत असे आणि त्याने देवदेवतांना कधीही अर्घ्य दिलेले नाही.” पण भगवान शंकर त्यांना म्हणाले, “त्याने मला बेलाची पाने वाहिली आहेत, आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्याने मला सच्चे अश्रू समर्पित केले आहेत. सच्च्या अंतःकरणाचे मोल हे कर्मकांडापेक्षा कितीतरी अधिक आहे.” असे बोलून, त्यांनी त्याचे स्वर्गात स्वागत केले.

तात्पर्य

[संपादन]

अंतःकरणपूर्वक केलेल्या कृतीचे मोल हे भावविहीन केलेल्या कर्मकांडापेक्षा कितीतरी अधिक असते.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.