सईदा रिझवान हसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सईदा रिझवान हसन
जन्म १५ जानेवारी १९६८
हबिबगंज
जोडीदार अबू बक्र सिद्दिकी


सईदा रिझवान हसन बांगला देशातील एक ख्यातकीर्त पर्यावरणवादी विधिज्ञा होत्या. १५ जानेवारी १९६८ ला यांचा जन्म झाला होता. यांचा जन्म महिबूला व सुरैय्या हसन या दांपत्यापोटी हबिबगंज या गावी झाला. प्राथमिक शिक्षणजन्मगावी घेऊन त्यांनी वकार उन्निसा नून स्कूल आणि होली क्रॉस कॉलेजमधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे डाक्का विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्याच विद्यापीठातून एल्एल्.एम्. (१९९३) ही कायद्यातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्या तत्काळ बांगला देश इन्व्हाय्र्-न्मेन्टल लॉयर्स असोसिएशन( बेला) या जनकल्याणार्थ कार्यरत असलेल्या वकिलांच्या संघटनेसाठी काम करू लागल्या होत्या. ही संघटना समर्पित जीवन व्यतीत करणारे मोहिउद्दीन फरूकी या ज्येष्ठ व प्रसिद्ध वकिलांनी स्थापन केली होती. त्यांच्या निधनानंतर (१९९७) सईदा हसन या संघटनेच्या कार्यकारी संचालक झाल्या आणि त्यांनी संघटनेची सूत्रे हाती घेतली. “बांगला देशाच्या रहिवाशांच्या मनात देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास उत्पन्न करणे आणि कायदा व वकील केवळ धनदांडग्यांच्या सेवेसाठीच नेहमीकाम करत नसतात, असा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हे माझ्यापुढचे उद्दिष्ट आहे”, असे त्यांचे मत होते.

बांगला देशातील चितगाँग येथे ‘शिप ब्रेकिंग’ व्यवसाय तेजीत होता. हा व्यवसाय म्हणजे टाकाऊ जहाजांचे भाग अलग करून मोडीत विकण्याचा उद्योग होता. या गोदीत दरवर्षी सु. १५० टाकाऊ जहाजे भाग सुटे करण्या-साठी येत होते. ती निर्विषीकरण न करताच बंदरात आणली जात होती. या कामासाठी बालकामगारांचा उपयोग केला गेला. या जहाजांतील विषारी रसायनांचाया बालकामगारांच्या प्रकृतीवर घातक परिणाम झाला  आणि समुद्र- किनाऱ्यावरील पाणीही दूषित होत असे. अशा प्रकारे कायदा हातात घेऊन पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या आणि निष्पाप बालकांच्या स्वास्थ्याला बाधा आणणाऱ्या धनदांडग्यांना कायद्याचा उपयोग करून वठणीवर आणण्याचे काम सईदांनी बेला या संस्थेद्वारे हाती घेतले होते. याशिवाय कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण, नद्यांतील वाळूचा उपसा, बेसुमार वृक्षतोड, नदीकिनाऱ्यांवरील घुसखोरी, टेकड्यांचे सपाटीकरण, सार्वजनिक जागांवरील कचऱ्याचे ढीग अशा जनहिताला बाधक असलेल्या अनेक गोष्टींबाबत बेला या संस्थेने किमान शंभर खटले लढविले होते. सईदा ह्या खटल्यांच्या केंद्रस्थानी वकील म्हणून होत्या. सईदा रिझवान हसन नी यशस्वी रीत्या मिळविलेल्या दोन खटल्यांचे निकाल पुढील खटल्यांसाठी पूर्वोदाहरण (प्रेसिडन्ट) ठरले व संस्थेच्या कार्याकडे सर्व देशाचे लक्ष वेधले गेले. सईदा २००३ पासून खटले लढवत होत्या आणि मूळ देशात जहाजाचे निर्विषीकरण केल्याशिवाय कोणतेही जहाज बांगला देशात येऊ नये, अशी त्यांची धडपड होती. त्यात त्यांनी यश मिळविले. पुढे बांगला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण खात्याकडून परवानगी न घेता चालविली जाणारी सर्वच्या सर्व ३६ ‘शिप ब्रेकिंग यार्ड्स’ बंद करायला लावली आणि बांगला देशात येणाऱ्या प्रत्येक टाकाऊ जहाजाचे मूळ देशात निर्विषीकरण करण्याचा निर्बंध जारी केला.

सईदांच्या नेतृत्वाखाली बेला या संस्थेने पाणथळ जमिनीत भर टाकण्यावर निर्बंध आणण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आणि धनवान बांधकाम कंपनीच्या वीस ज्येष्ठ वकिलांशी सामना करून त्यांचा गृहप्रकल्प बेकायदेशीर असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा हक्क घटनेने दिलेल्या जीविताच्या हक्काचा एक भाग आहे, कायदा सर्वांसाठी असतो आणि तो सर्वांना समप्रमाणात लागू व्हावा, असे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही आमचे शेतकरी, कोळी, अरण्यवासी यांच्या हक्कांसाठी झगडत राहणार आहोत. वृक्षराजी, टेकड्या-पर्वत, तळी, नद्या ह्या मानवाचे हित जपतात. त्यांचे संरक्षण-संवर्धन हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो. चुकीच्या, शोषण करणाऱ्या आणि निसर्गसंपत्तीचा ऱ्हास करणाऱ्या विकास योजनांबाबत सतर्क राहून सत्तेचा गैरवापर थांबविण्यावर संस्थेचा कटाक्ष आहे. सईदांचा लढा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सुरू असून त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार लाभले होते. त्यांपैकी सर्वोच्च मॅगसेसे पारितोषिक स्वीकारताना त्यांनी मार्टिन ल्यूथर किंग यांच्या “आम्ही अद्याप संतुष्ट नाही आणि जोपर्यंत न्याय पाण्यासारखा खळखळून वाहत नाही आणि जोपर्यंत सदाचरणाचा अफाट ओघ सुरू होत नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही” , या सुप्रसिद्ध उद्गारांचा पुनरुच्चार केला होता.

सईदांना त्यांच्या पर्यावरणविषयक कार्याबद्दल अनेक मानसन्मानलाभले असून त्यांपैकी प्रतिष्ठेचे काही पुढील होत : त्यांच्या नेतृत्वा-खाली बेला या संस्थेला ‘ग्लोबल ५०० रोल ऑफ ऑनर’ (२००३) हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राने दिला आहे. बांगला देश शासनाचे इन्व्हाय्र्न्मेन्ट अवॉर्ड (२००७), सेलेब्रेटिंग विमेनहूड अवॉर्ड (२००८), द गोल्डमन इन्व्हाय्र्न्मेन्टल प्राइझ (२००९), रेमन मॅगसेसे अवॉर्ड (२०१२). यांशिवाय अमेरिकेतील टाइम या मासिकाने त्यांचा ‘हिरो ऑफइन्व्हाय्र्न्मेन्ट’ असा गौरव केला होता.

सईदांनी आपला वर्गमित्र अबू बक्र सिद्दिकी या वकिलाबरोबर विवाह केला असून त्यांना एक मुलगी व दोन मुलगे आहेत.