श्रुती महापात्रा
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| स्थानिक भाषेतील नाव | ଶୃତି ମହାପାତ୍ର |
| जन्म तारीख | १९ ऑक्टोबर 1963 |
| जन्मस्थान | कटक |
| मातृभाषा | ओडिया भाषा |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | ओडिया भाषा |
| व्यवसाय | सामाजिक कार्य |
| शिक्षण घेतलेली संस्था | उत्कल विद्यापीठ |
श्रुती महापात्रा (जन्म:२९ सप्टेंबर, १९६३) या एक दिव्यांग समावेशकता तज्ज्ञ आहेत. सर्वसमावेशक शिक्षण आणि सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापन व नियोजन या विषयांत त्यांचे विशेष नैपुण्य आहे.
कारकीर्द
[संपादन]श्रुती महापात्रा यांचा जन्म २९ सप्टेंबर १९६३ रोजी झाला.[१] त्या भारताच्या ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर येथे राहतात.[२][१] १९७८ मध्ये त्यांनी सुवर्णपदकासह विज्ञानात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 'डेव्हलपमेंटल बायोलॉजी'मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. १९८७ मध्ये, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी बनायचे होते, परंतु एका मोटार अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली.[१] महापात्रा या स्वतः व्हीलचेअर वापरकर्त्या असून त्या दिव्यांगांच्या अधिकारांसाठी मोहिमा राबवतात.[२] त्यांनी 'ओडिशा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा'चे अध्यक्षपद भूषवले आहे आणि त्या 'दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांवरील राष्ट्रीय समिती'च्या सदस्या आहेत.[३] या कार्यासाठी त्यांनी 'स्वाभिमान' नावाची एक बिगर नफा संस्था स्थापन केली होती.[२] २००९ मध्ये, पुरी येथील जगन्नाथ मंदिर व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी सुलभ करण्यात आले, हा विजय त्यांनी इतर कार्यकर्त्यांसह मिळवला.[४] भारतातील कोव्हिड-१९ महामारीच्या काळात त्यांनी इशारा दिला होता की, ओडिशामधील ४३ टक्के दिव्यांग मुले शाळा सोडत आहेत.[५]
"स्वाभिमान" संस्थेची स्थापना
[संपादन]त्यांनी २००१ मध्ये 'स्वाभिमान' नावाच्या संस्थेची स्थापना केली. ही संस्था ओडिशा आणि संपूर्ण भारतात दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कौशल्यांच्या विकासासाठी कार्य करते. या संस्थेच्या माध्यमातून त्या गेल्या १५ वर्षांपासून दिव्यांग मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी "अंजली" नावाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत.[२][६]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]१९७८ मध्ये त्यांना उत्कल विद्यापीठाकडून 'गुणवंत विद्यार्थी पुरस्कार' मिळाला. १९८०, १९८१ आणि १९८२ मध्ये त्या तीनदा 'राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेच्या विजेत्या' ठरल्या. १९९२ मध्ये त्यांना 'राष्ट्रीय युवा वैज्ञानिक पुरस्कार', १९९५ मध्ये 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कार, २००१ मध्ये रेड क्रॉस अवॉर्ड, २०१० मध्ये 'सीएनएन-आयबीएन रिअल हिरोज सन्मान' आणि 'ख्यामाता सन्मान' असे दोन सन्मान मिळाले. २०११ साली 'सरला सन्मान' आणि 'महिला पुरस्कार स्टेट बँक ऑफ इंडिया' मिळाले. २०१२ साली 'बेझंट सेल्फलेस सर्व्हिस पुरस्कार' मिळाला. २०१३ साली 'सुभद्रा सन्मान' तसेच तत्कालीन माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते 'विद्या भवन सामाजिक सेवा पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. २०१४ साली 'कादंबिनी सन्मान' आणि २०१५ साली 'रॉकस्टार पुरस्कार नीना फाउंडेशन' प्रदान करण्यात आले.[१][७] भारत सरकारच्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून त्यांना २०२१ चा नारी शक्ती पुरस्कार घोषित करण्यात आला. २०२२ सालच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[३][८]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 Baral, Maitree (6 November 2017). "'Disability' Rendered Her Unsuitable For IAS: Meet Sruti Mohapatra, Crusader For People With Disabilities". NDTV (इंग्रजी भाषेत). 12 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2022 रोजी पाहिले.
- 1 2 3 4 "Sruti Mohapatra Gives The Disabled Opportunities She Never Had". Outlook India (इंग्रजी भाषेत). 5 February 2022. 9 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2022 रोजी पाहिले.
- 1 2 Kainthola, Deepanshu (8 March 2022). "President Presents Nari Shakti Puraskar for the Years 2020, 2021". Tatsat Chronicle Magazine (इंग्रजी भाषेत). 9 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2022 रोजी पाहिले.
- ↑ Mahapatra, Sampad (28 October 2009). "Temple for special people". NDTV. 15 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2022 रोजी पाहिले.
- ↑ "43 lakh disabled students across states may drop out, unable to cope with e-education". The Times of India. ANI. 25 July 2020. 30 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2022 रोजी पाहिले.
- ↑ "About - Anjali International Children & Youth Festival". 2026-03-16 रोजी पाहिले.
- ↑ "Dr Sruti Mohapatra - TALE OF A GLOWING FLAME -By Dr. Prasanna Mishra". 2017-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-19 रोजी पाहिले.
- ↑ "श्रुती महापात्रा यांना २०२१ चा नारी शक्ती पुरस्कार". www.sambadepaper.com. ईस्टर्न मीडिया. 8 March 2022 रोजी पाहिले.