श्री देवी भराडी आई
श्री भराडी देवी (Bharadi Devi) ही महाराष्ट्रातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथील या ठिकाणी देवीचे मंदिर आहे.[१] मालवण पासून १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या मसूरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. ही देवी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. श्री भराडी देवीचे मंदिर आंगणे कुटुंबीयांचे खाजगी मंदिर असून ते सर्व भाविकांसाठी खुले आहे.[२] या देवीच्या जत्रोत्सवाला दरवर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक उपस्थित राहतात.
| श्री देवी भराडी आई | ||
| नाव: | भराडी देवी | |
|---|---|---|
| निर्माता: | स्वयंभू | |
| स्थान: | मसुरे,आंगणेवाडी,मालवण | |
इतिहास आणि आख्यायिका
[संपादन]श्री भराडी देवी ही स्वयंभू देवता आहे. आख्यायिकेनुसार आंगणे नावाच्या ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी पान्हा (दूध) सोडत असे. एकदा आंगणे यांनी हे पाहिल्यावर त्यांना रात्री स्वप्नात देवीने दृष्टांत दिला आणि आपण त्या ठिकाणी प्रकट झाल्याचे सांगितले. तेव्हापासून त्या पाषाणाची पूजा सुरू झाली. ही स्वयंभू पाषाणरूपी देवी 'भरड' (माळरान) परिसरात आढळल्याने तिला श्री भराडी देवी असे नाव पडले.[३][४]
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत. देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाही.
पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पा यांना त्यांच्या मोहिमेत यश मिळाल्याने त्यांनी या मंदिराला २२ हजार एकर जमीन दान दिली होती अशी ऐतिहासिक नोंद आहे.
मंदिर आणि पूजा पद्धती
[संपादन]श्री भराडी देवीचे मंदिर मसुरे गावातील आंगणेवाडी येथे आहे. मंदिराचा परिसर माळरानाने वेढलेला आहे असून येथील शांत वातावरण भाविकांना आकर्षित करते. मंदिरात देवीच्या पाषाणमूर्तीची पूजा केली जाते, परंतु या मूर्तीचा फोटो काढण्यास मनाई आहे. भाविक नवस बोलतात आणि पूर्ण झाल्यावर प्रसादाचे वडे अर्पण करतात. असे मानले जाते की हे वडे मंदिराबाहेर नेण्यास बंदी आहे.
देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते. भिक्षा मागण्याचा एक आगळावेगळा नवस या ठिकाणी असतो. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.[५]
जत्रोत्सव
[संपादन]श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा कोकणातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. हा उत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होतो आणि त्याची तारीख विशिष्ट तिथीवर अवलंबून नसते. गावकरी दिवाळीनंतर शिकारीसाठी जंगलात जातात आणि शिकार मिळाल्यावर ग्रामस्थ एकत्र येऊन जत्रेची तारीख ठरवतात.[६] या जत्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात आणि यात धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असतो. जत्रेदरम्यान मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात.[७]
यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवळात ताटे लावणे (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणाऱ्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे अशी पूर्वापार प्रथा आहे.
भराडी देवीची पालखी नाचवताना भाविकांकडून देवीस मोठ्या प्रमाणात नवस केले जातात. ते नवस पूर्ण होत असल्याने नवसफेड करण्यासाठी भाविकांना रांग लावावी लागते. भराडी देवीची यात्रा साधारण दीड दिवस चालते. सूर्योदयाच्यावेळी सूर्यकिरणांचा कवडसा देवीच्या मुखावर पडल्यानंतर देवीची ओटी भरून यात्रेस सुरुवात होते. यात्रेचा दुसरा दिवस जत्रेचा असतो. दुसऱ्या दिवशी वाडीतील सर्व आंगणे ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. त्यानंतर एकवीस ब्राह्मण येऊन सम्राज्ञा होते, देवळाचे शुद्धीकरण आदी विधी होतात. देवीने जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडून घेतला म्हणून देवीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दुसऱ्या दिवशी साधारण तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान व्यापारी लावलेली दुकाने मोडायला घेतात त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या जत्रेला मोडजत्रा असेही म्हणतात.
सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व
[संपादन]श्री भराडी देवीच्या जत्रेला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या उत्सवाला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते आणि सामान्य भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कोकणातील संस्कृतीचा हा एक अविभाज्य भाग आहे. या जत्रेमुळे आंगणेवाडी हे गाव कोकणातील प्रति पंढरपूर म्हणूनही ओळखले जाते.[८]
भौगोलिक स्थान
[संपादन]विमानाने जाणाऱ्या भक्तांसाठी आंगणेवाडी पासून सर्वात जवळचे विमानतळ चिपी असून ते आंगणेवाडी पासून ३१ किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्थानक कणकवली असून जे ३५ किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे मोठे शहर मालवण असून मालवण बसस्थानक ते आंगणेवाडी अंतर १० किमी आहे. मालवणहून आंगणेवाडीला रिक्षा, खाजगी गाड्या आणि राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत. जत्रेदरम्यान विशेष बससेवा चालवल्या जातात.[९][१०] मंदिर परिसरात स्वच्छतागृहे आणि पाण्याची सोय आहे. जत्रेदरम्यान तात्पुरती शौचालये उभारली जातात. मंदिर परिसर माळरान आणि हिरवळीने वेढलेला आहे.
राहण्याची व भोजनाची सोय
[संपादन]मालवण शहरापासून आंगणेवाडी मंदिर हे सुमारे १० किमी अंतरावर आहे. मालवण, तारकर्ली आणि देवबाग येथे अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत. मालवण आणि तारकर्ली येथे स्थानिक कुटुंबांनी चालवलेले होमस्टे उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला घरगुती वातावरण आणि मालवणी संस्कृतीचा अनुभव मिळेल. फेब्रुवारी किंवा मार्चमधील आंगणेवाडी जत्रेदरम्यान लाखो भाविक येत असल्याने हॉटेल्स लवकर बुक होतात त्यामुळे आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे.
भोजनासाठी मंदिराजवळ आणि मालवणात अनेक खानावळी आणि रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. जत्रेच्या काळात गावकरी सामुदायिक प्रसाद आयोजित करतात जिथे सर्व भाविकांना मोफत जेवण मिळते ज्यात स्थानिक पदार्थांचा समावेश असतो. मंदिर परिसरात आणि जवळच्या गावांमध्ये लहान टपऱ्या आणि दुकाने असतात जिथे जत्रेच्या वेळेस चहा, नाश्ता, सरबत, आणि फुलांच्या माळा मिळतात.
आजूबाजूची इतर ठिकाणे
[संपादन]श्री भराडी देवी मंदिर आंगणेवाडी येथून जवळपास असलेली काही उल्लेखनीय पर्यटन आणि धार्मिक स्थळे-
- तारकर्ली बीच
- सिंधुदुर्ग किल्ला
- देवबाग बीच
- रॉक गार्डन, मालवण
- चिवला बीच
- कुणकेश्वर मंदिर
- मालवण बाजारपेठ
संदर्भ
[संपादन]- ^ "Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, 'या' दिवशी सुरू होणार उत्सव". Loksatta. 2024-12-12. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ Mali, Priyanka Chetan. "आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली! जाणून घ्या नवसाला पावणाऱ्या भराडी देवीचे महात्म्य". Hindustan Times Marathi. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ CD (2024-03-01). "भराडी आईचा महिमा". Marathi News Esakal. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ "भराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव". Zee 24 taas. 2024-12-12. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ हिंदळेकर, -प्रशांत (2022-02-24). "आंगणेवाडी वार्षिकोत्सव विशेष; अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान". Marathi News Esakal. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ माझा, सदाशिव लाड, एबीपी (2023-12-26). "कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली! 2 मार्चला उसळणार भक्तांचा महासागर". marathi.abplive.com. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ author/mahesh-vidyanand-sarnaik (2024-12-12). "Sindhudurg: आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली, दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख". Lokmat. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ माझा, सदाशिव लाड, एबीपी (2024-03-02). "कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार". marathi.abplive.com. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ सकाळवृत्तसेवा (2020-02-12). "आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज". Marathi News Esakal. 2025-04-14 रोजी पाहिले.
- ^ author/sudhir-rane (2023-02-02). "आंगणेवाडी यात्रेसाठी एसटी सज्ज! जादा गाड्यांचे नियोजन; कोणत्या गावातून किती गाड्या धावणार..जाणून घ्या". Lokmat. 2025-04-14 रोजी पाहिले.