Jump to content

श्री.ग. माजगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्री. ग. माजगावकर या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री.ग. माजगांवकर (१९२९ - १९९७) - श्रीकान्त माजगावकर (शिरुभाऊ वा, श्री-ग-मा वा) हे एक पत्रकार, लेखक, प्रकाशक आणि, 'माणूस' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक. ते ’माणूसकार श्रीगमा’ या नावाने प्रसिद्ध होते. राजहंस प्रकाशन ही त्यांची मराठी पुस्तक प्रकाशन संस्था.

जन्म - ०१ ऑगस्ट १९२९ (आषाढ कृष्ण एकादशी, शके १८५१)

मृत्यु - पुणे, २० फेब्रुवारी १९९७ (माघ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १९१८)


दिलीप माजगावकर - श्रीगमांचे धाकटे बंधू
अलका गोडे, निर्मलाताई पुरंदरे (आधीच्या कुमुद माजगावकर) - बहिणी. निर्मलाताई पुरंदरे (१९३२/३३ - २०१९) या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या पत्‍नी. या स्वतः मोठ्या समाजसेविका होत्या.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे - मेव्हणे
वासुदेव गोडे - बहिणीचे यजमान

कै बाळासाहेब केतकर - बहिणीचे पति, "फ्रेंडस्‌ म्युझिक सेंटर" या सदाशिवपेठेतील दुकानाचे मालक (जुनी गाणी आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम संग्रह)


श्री. ग. माजगावकर यांनी आपल्या लेखणीद्वारे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा श्रीगमा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार २०१९ ते २०२९ असा ११ वर्षे दिला जाईल, आणि शिरुभाऊंच्या जन्मशताब्दि वर्षात त्याची सांगता होईल.

अलका गोडे यांनी त्यांच्या ’धाकट्या नजरेतून’ या आत्मकथनात्मक पुस्तकातून श्रीगमांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

माणूस विषयी

[संपादन]

‘माणूस’चा पहिला अंक १ जून १९६१ रोजी प्रसिद्ध झाला. काही काळ मासिक असलेले ‘माणूस’ नंतर साप्ताहिक करावे लागले, इतकी त्याची आवश्यकता भासू लागली होती. काही काळाने ‘माणूस’ने स्वतःचे मुद्रणालयही चालू केले. ‘माणूस’ने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक जाणिवा समृद्ध केल्या; महाराष्ट्राच्या सदसद्‌विवेकबुद्धी आणि संवेदनशीलतेला सतत टोचणी लावली. आजच्या अर्थपूर्ण लेखन करणाऱ्या कित्येक लेखक-लेखिकांनी केव्हाना केव्हा ‘माणूस’मध्ये लेखन केलेले आहे. ‘माणूस’ म्हणजे कसलातरी ध्यास असलेले लेखक, तसेच वाचकांना तयार करण्याचे विद्यापीठच होते. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या ‘माणूस’ने सातत्याने रोज नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचा चंगच बांधला होता. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना आपापली मते मांडण्याची हक्काची जागा ‘माणूस’ने दिली होती. नेते मंडळींना ‘माणूस’चा धाक वाटायचा. यशवंतराव चव्हाणांनी तर ‘माणूस’चा प्रत्येक अंक मिळालाच पाहिजे, असा आदेश आपल्या खासगी सचिवांना देऊन ठेवला होता. आणीबाणीचा काळ हा तर सर्वच पत्रकारांच्या अत्यंत कसोटीचा काळ होता. सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या होत्या. ‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध निःशब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा. तत्कालीन ज्वलंत राजकीय-सामाजिक विषयांवरील खास पुरवण्या किंवा विशेषांक हे ’माणूस’चे वेगळेपण होते.

’माणूस’मध्ये स्तंभलेखन करणारे लेखक: वि.ग. कानिटकर, कुमार केतकर, अशोक जैन, विजय तेंडुलकर, रवींद्र पिंगे, अनंत भावे, दि.बा. मोकाशी, अरुण साधू, वगैरे.

’माणूस’ साप्ताहिक इ.स. १९८६साली बंद करावे लागले. त्यापूर्वी त्याचा निरोप समारंभ पुण्याच्या पूनम हॉटेलच्या हॉलमध्ये झाला होता.

श्री.ग. माजगावकर यांचे २० फेब्रुवारी इ.स. १९९७ रोजी पुणे येथे निधन झाले.

श्रीगमांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • निर्माणपर्व
  • बलसागर
  • श्रीग्रामायन

पुरस्कार

[संपादन]
  • शेतकी मंत्री शरद पवारांच्या हस्ते मिळालेला ‘अ‍ॅग्रोफॉरेस्ट्री’ पुरस्कार
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मिळालेला उत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार

हे सुद्धा पहा

[संपादन]