शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधी
शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधी (जन्म - १३ डिसेंबर १९१७ - मृत्यू ०६ जानेवारी १९९२) [१] - या इचलकरंजी संस्थानच्या राजकन्या होत्या आणि लेखिका म्हणून ओळखल्या जात.
जीवन
[संपादन]वडिलांचे अकाली निधान झाल्याने आजोबा श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर व आजी यांनी शैलजादेवींचा सांभाळ केला. त्या काळाच्या रितीरिवाजानुसार राजवाड्यातच त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. धार्मिक ग्रंथ, श्लोक, चित्रकला, गायन, भरतकाम, अश्वारोहण, तलवारबाजी, भालाफेक, नेमबाजी इत्यादी गोष्टीमध्ये त्या पारंगत झाल्या. त्या सतार वाजवीत असत.[१]
१७ जून १९३४ रोजी शैलजादेवी यांचा विवाह श्रीमंत त्र्यंबकराव ऊर्फ आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याबरोबर झाला. त्या कोल्हापुरातील विशालगड वाड्यातील ज्येष्ठ स्नुषा झाल्या. या दोघांना राजेसाहेब, कुमारसाहेब, कन्या मंगलाराजे व उर्मिलादेवी अशी अपत्ये होती. शैलजादेवी यांनी माँटेसरीचा कोर्स केला होता. त्यांनी राजवाड्यात एक शाळा सुरू केली.
पुढे त्यांनी एम.ए ही पदवी संपादन केली. त्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात प्रथम आल्या. स्त्रियांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी 'शांता फॅब्रिक्स' या नावाचा हातमागाचा उद्योग सुरू केला. हा उद्योग व शाळा त्यांनी सुमारे दहा वर्षे चालविली.
त्यांना इंग्रजी व मराठी भाषा अवगत होत्या. गुरुदेव रानडे यांचे कानडी ग्रंथ वाचता यावेत म्हणून त्यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी कानडी भाषा व लिपि शिकून घेतली.
त्यांना पावसच्या स्वामी स्वरुपानंदांचा अनुग्रह लाभलेला होता.
कोल्हापूरात ज्ञानेश्वरीचे सामूहिक वाचन करण्यासाठी म्हणून त्यांनी 'सखी मंडळ' सुरू केले होते. त्या मंडळामध्ये त्या ज्ञानेश्वरीच्या कठीण ओव्यांचा अर्थ समजावून देत असत. त्यातूनच पुढे श्रीज्ञानेश्वरी मुक्तचिंतन या पुस्तकाची निर्मिती झाली.
सावित्री या महाकाव्याच्या अनुवादामधील काही भागाचे गायन जानेवारी १९९१ मध्ये पुण्याच्या टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास औंधचे आप्पासाहेब पंत अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
प्रकाशित लेखन
[संपादन]- श्रीकृष्णचरितामृत, मेहता पब्लिशिंग हाऊस, ISBN13: 9789386175168 [२]
- श्रीज्ञानेश्वरी मुक्तचिंतन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, प्रकाशन वर्ष - १९८९
- सावित्री (एक आख्यायिका आणि एक प्रतीक) - (श्रीअरविंद लिखित महाकाव्याचा हा छन्दोबद्ध भावानुवाद आहे.) श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी, प्रकाशन वर्ष - १९९३, ISBN: 81-7058-334-9 [३]
- सावित्री (श्रीअरविंद यांच्या सावित्री या महाकाव्याचे कथारूप), महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर, २४ नोव्हेंबर २००७ (पहिली आवृत्ती)
संदर्भ
[संपादन]- ^ a b सावित्री (श्रीअरविंद यांच्या सावित्री या महाकाव्याचे कथारूप), महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर, २४ नोव्हेंबर २००७ (पहिली आवृत्ती)
- ^ www.bookganga.com
- ^ "सावित्री - Marathi translation of Savitri by Sri Aurobindo". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-23 रोजी पाहिले.