शिरीन रत्नागर
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | 1944 |
| मृत्यू तारीख | २६ मे 2026 |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| व्यवसाय | anthropologist, लेखक, पुरातत्त्वज्ञ, इतिहासकार |
| नियोक्ता | जवाहरलाल नेहरू विद्यापीठ |
| शिक्षण घेतलेली संस्था | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ |
शिरीन एफ. रत्नागर (१९४४ - २६ मे, २०२६) या एक भारतीय पुरातत्त्वशास्त्र होत्या. त्यांनी खासकरून हडप्पा संस्कृतीवर मोठे काम केले होते. याशिवाय त्यांनी यासंबंधित अनेक पुस्तके आणि शैक्षणिक पाठ्यपुस्तकांचे लिखाण केले आहे.
शिक्षण आणि कारकीर्द
[संपादन]रत्नाकर यांचे शिक्षण पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी, युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथून मेसोपोटेमियाच्या पुरातत्वशास्त्राचा अभ्यास केला.[१] त्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीजमध्ये पुरातत्वशास्त्र आणि प्राचीन इतिहासाच्या प्राध्यापिका होत्या. त्या २००० मध्ये सेवानिवृत्त झाल्या, आणि मुंबईत राहून एक स्वतंत्र संशोधक म्हणून कार्यरत होत्या. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरलेल्या घटकांचे अन्वेषण (संशोधन) करण्याच्या त्यांच्या कामासाठी त्या विशेष ओळखल्या जातात.[२]
अयोध्या वाद
[संपादन]मे २००३ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे एक विनंती केली. बाबरी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी हिंदू मंदिर होते, हा दावा बोर्डाने फेटाळला होता. त्यामुळे मशिदीच्या पाडलेल्या जागेवर 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (ASI) विभागाने जे उत्खनन केले होते, त्याची पाहणी करण्याची परवानगी शिरीन रत्नाकर, सूरज भान आणि धनेश्वर मंडल यांना मिळावी, अशी मागणी बोर्डाने केली होती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही मागणी त्वरित मान्य केली.[३][४] त्यानंतर, उत्खननाचे काम थांबल्यावर रत्नाकर यांनी या ऐतिहासिक स्थळाला दोनदा भेटी दिल्या — पहिल्यांदा जूनमध्ये आणि दुसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात धनेश्वर मंडल यांच्यासोबत.[४][५] या तिघांनीही पुढे जाऊन या खटल्यात वक्फ बोर्डाचे तज्ज्ञ साक्षीदार म्हणून साक्ष दिली. एएसआयने उत्खननात सापडलेल्या अवशेषांची शास्त्रोक्त पद्धतीने स्तराधारित नोंद ठेवली नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला. तसेच, मशिदीच्या संरचनेखाली मंदिर सापडल्याचा एएसआयचा निष्कर्षही त्यांनी फेटाळून लावला.[६] २००७ मध्ये रत्नाकर आणि मंडल यांनी या उत्खननाचे अत्यंत चिकित्सक आणि टीकात्मक मूल्यमापन करणारे 'अयोध्या: आर्किऑलॉजी आफ्टर एक्स्कॅव्हेशन' (तुलिका पब्लिशर्स, नवी दिल्ली) हे पुस्तक सह-लेखन करून प्रकाशित केले.[३] मात्र, यामुळे न्यायालयाचा तीव्र रोष ओढवला गेला. हा खटला न्यायालयात प्रलंबित असताना, आणि ज्यामध्ये एएसआयचा अहवाल व इतर साक्षीदारांच्या साक्षींसारखे पुरावे बंद खोलीत सादर करण्यात आले असताना, त्यावर अशा प्रकारे जाहीर चर्चा करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला.[३][४][६] यानंतर लेखकद्वयीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आणि प्रकाशकानेही या पुस्तकाच्या बाजारात असलेल्या सर्व न विकलेल्या प्रती मागे घेतल्या. तरीही, न्यायालयाने त्यांना नाममात्र दंड भरण्याचा आदेश दिला.
पुस्तके
[संपादन]- एन्काउंटर्स, द वेस्टरली ट्रेड ऑफ द हरप्पा सिव्हिलायझेशन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (१९८१).
- एन्क्वायरीज इन टू द पॉलिटिकल ऑर्गनायझेशन ऑफ हरप्पन सोसायटी, रविश पब्लिशर्स (१९९१).
- द एंड ऑफ द ग्रेट हरप्पन ट्रॅडिशन, न्यू दिल्ली: मनोहर, आयएसबीएन 81-7304-331-0. (२०००)
- अंडरस्टँडिंग हरप्पा: सिव्हिलायझेशन इन द ग्रेटर इंडस व्हॅली, तुलिका बुक्स, आयएसबीएन 81-85229-37-6 (२००२)
- मोबाईल अँड मार्जिनलाइज्ड पीपल्स, न्यू दिल्ली: मनोहर (२००३)
- ट्रेडिंग एन्काउंटर्स: फ्रॉम द युफ्रेटिस टू द इंडस इन द ब्रॉन्झ एज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (2nd एडिशन), आयएसबीएन 0-19-568088-X (२००६)
- द अदर इंडियन्स - एसेज ऑन पास्टोरलिस्ट्स अँड प्रीहिस्टोरिक ट्रायबल पीपल, थ्री एसेज कलेक्टिव्ह (२००४)
- अयोध्या: आर्किऑलॉजी आफ्टर एक्स्कॅव्हेशन, न्यू दिल्ली: तुलिका बुक्स (२००७)
- द टाईमचार्ट हिस्टरी ऑफ एन्शंट इजिप्त, वर्थ (२००७). आयएसबीएन 190302532X.
- मेकर्स अँड शेपर्स: अर्ली इंडियन टेक्नॉलॉजी इन द हाउसहोल्ड, व्हिलेज, अँड अर्बन वर्कशॉप, तुलिका बुक्स (२००७).
- बियिंग ट्रायबल, प्रायमस बुक्स (२०१०). आयएसबीएन 9380607024.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Shereen Ratnagar". Harappa.com. 26 डिसेंबर 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 डिसेंबर 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Shereen Ratnagar: A past to mirror ourselves" (PDF). Topoi.org. 2014-12-25 रोजी पाहिले.
- 1 2 3 Etter, Anne-Julie (2020-12-15). "Creating Suitable Evidence of the Past? Archaeology, Politics, and Hindu Nationalism in India from the End of the Twentieth Century to the Present". South Asia Multidisciplinary Academic Journal (इंग्रजी भाषेत) (24/25). doi:10.4000/samaj.6926. ISSN 1960-6060.
- 1 2 3 Final Judgement Delivered on 11-03-2011 In Contempt Case No. 1 of 2010 - Allahabad High Court - In Re: O.O.S. No. 4 of 1989
- ↑ Chakravarti, Uma (2010). Mandal, D; Ratnagar, Shereen (eds.). "Clinching Archaeological Evidence". Economic and Political Weekly. 45 (5): 27–28. ISSN 0012-9976. JSTOR 25664062.
- 1 2 Varghese, Rachel A. (2018-07-03). "'Order'-ing Excavations: Constitution of Archaeology as Legal Evidence in the Ayodhya Case". Public Archaeology (इंग्रजी भाषेत). 17 (2–3): 89–109. doi:10.1080/14655187.2019.1586059. ISSN 1465-5187.