Jump to content

शं.प. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर परशराम जोशी (इ.स. १८८० - १६ फेब्रुवारी, इ.स. १९४९) हे एक मराठी नाटककार होते.

शं.प. जोशींनी सामाजिक विषयांवरील विनोदी नाटके लिहिली. एखादा ज्वलंत सामाजिक विषय घेऊन त्यावर विनोदी पद्धतीने शरसंधान करणे हा त्यांच्या नाटकांचा गाभा होता.

शं.प. जोशी यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

  • खडाष्टक (१९२७)
  • संगीत तो आणि ती (१९३९)
  • मायेचा पूत (१९२१)
  • विचित्रलीला (१९१६)

नाटकांची कथानके[संपादन]

’खडाष्टक’मध्ये लहानसहान गोष्टींवरून तात्त्विक आणि शाब्दिक भांडण करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले आणि आजही होतात. गद्य ’खडाष्टक’चा पहिला प्रयोग १६ एप्रिल १९२७ रोजी झाला. ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ने बसवलेले हे नाटक केशवराव दाते यांनी दिग्दर्शित केले होते. पुढे हे नाटक ‘संगीत खडाष्टक’ झाले, तेव्हा ते ‘राजाराम संगीत मंडळी’ सादर करू लागली.
’तो आणि ती’मध्ये जोशींनी प्रेमभावनेची भली-बुरी रूपे दाखविली आहेत.
’मायेचा पूत’ या नाटकात जोशींनी अनिष्ट व अनैसर्गिक पद्धतीने दत्तक घेण्याच्या रूढीवर हल्ला चढवला आहे.
’विचित्रलीला’त इष्ट सुधारणा कोणत्या आणि अनिष्ट कोणत्या हे विनोदी पद्धतीने व अतिशय मार्मिक स्वरूपात माडले आहे.

शं.प. जोशींच सर्वच नाटके रंगभूमीवर खूप गाजली. त्यांच्या नाटकांत स्वभावनिष्ट आणि प्रसंगनिष्ट विनोदाची जागोजाग कारंजी आहेत. त्यांचे विनोद मूळ उद्देशाला हानी पोहोचवत नाहीत. या नाटकांमधील स्वभावरेखाटनही सुरेख झाले आहे. ’खडाष्टक’मधील कर्कशराव, रंगोपंत रागिणी, वारुबाई, वारोपंत; ’मायेचा पूत’मधील इंदुमती, प्रभाकर, भैय्यासाहेब आणि सरस्वती; तसेच विचित्रलीलामधील चतुरराव, रंगराव आणि सुधा ही पात्रे अविस्मरणीय झाली आहेत.

गौरव[संपादन]

शंकरराव जोशांची नाटके चारच असली तरी त्यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना रसिक प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले. नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे नाट्य संमेलनाध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. इ.स. १९३६मध्ये पुणे येथे भरलेल्या २८व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.