व्हर्गीज कुरियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वर्गीज कुरियन
Verghese Kurien.jpg
जन्म वर्गीज
नोव्हेंबर २६, इ.स. १९२१
कोळीकोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू सप्टेंबर ९, इ.स. २०१२
नडियाद, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.इ. (यंत्र अभियांत्रिकी),
एम.एस्सी. (यंत्र अभियांत्रिकी)
प्रशिक्षणसंस्था लायोला कॉलेज, चेन्नई,
मिशिगन राज्य विद्यापीठ
पेशा अभियांत्रिकी, उद्योग (दुग्धप्रक्रिया)
पदवी हुद्दा संस्थापक चेअरमन (गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, आनंद)
धर्म ख्रिस्ती
जोडीदार मॉली
अपत्ये निर्मला
पुरस्कार मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३),
पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६५),
पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९६६),
पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९९९)

डॉ. वर्गीज कुरियन (लेखनभेद : व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ ; रोमन लिपी: Verghese Kurien) (नोव्हेंबर २६, इ.स. १९२१; कोळ्हिकोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत - सप्टेंबर ९, इ.स. २०१२; नडियाद, गुजरात, भारत) हे भारतीय अभियंते, उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण (इ.स. १९९९), जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते. इ.स. १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्रीदेखील होते.

बालपण व शिक्षण[संपादन]

वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील (वर्तमान भारताच्या केरळ राज्यातील) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात नोव्हेंबर २६, इ.स. १९२१ रोजी झाला.

वर्गीज कुरियन इ.स. १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्‌सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले.

कार्य[संपादन]

भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक सरकारी डेअरी मध्ये आणंद, गुजरात येथे झाली. त्या सुमारासच "खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड" [टीप १] ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्यावेळी पोलसनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबई सारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करीत होती. बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी व रोष पोलसनला जड जात होता. या कंपनी विरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या, योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल. ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते. त्यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले.

वर्गीज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल.मध्ये काम करण्याचे ठरविले. "गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड" [टीप २] या पालक संस्थेने १४ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे नाव बदलून "आणंद मिल्क युनियन लिमिटेड" [टीप ३] असे नाव ठेवले. नव्या जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग ’आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले. संस्थेचे लोकसहभागातून व्यवस्थापन [टीप ४] ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.

तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले इंडिया ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू (कन्डेन्स्ड मिल्क, दूध पावडर) विकत असे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते. पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात अमूलला यश आले. अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडी निवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बांगलादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे. या यशाचे श्रेय वर्गीज कुरियन यांना जाते.

याशिवाय भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वर्गीस यांच्या हस्ते १६ जुलै १९६५ रोजी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना करण्यात आली.[१]

निधन[संपादन]

मूत्रपिंडांच्या आजारामुळे वर्गीस कुरियन यांना नडियाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. सप्टेंबर ९, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार ०११५ वाजता रुग्णालयात त्यांचे निधन झाले[२].

तळटिपा[संपादन]

  1. ^ खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड (रोमन लघुरूप: KDCMPUL, के.डी.सी.एम.पी.यू.एल.)
  2. ^ गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (रोमन लघुरूप: GCMMF, जी.सी.एम.एफ)
  3. ^ आणंद मिल्क युनियन लिमिटेड (रोमन लघुरूप: AMUL, अमूल)
  4. ^ लोकसहभागातून व्यवस्थापन (इंग्लिश: Participatory Management, पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Gupta, Sharad (26 November 2019). "Remembering Verghese Kurien – India's first milkman" (इंग्रजी भाषेत). businessline. ३ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. वर्गीस कुरियन यांचे निधन". ९ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.