Jump to content

वेदांमधील संज्ञा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेद हे प्राचीन भारतीय संस्कृतीचे पवित्र ग्रंथ आहेत आणि त्यांचा रचनाकाळ इसवी सनापूर्व १००० ते १५०० या कालखंडात मानला जातो. वेदांमध्ये चार मुख्य ग्रंथांचा समावेश होतो: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या ग्रंथांमध्ये संज्ञा (नाम) हा एक महत्त्वाचा भाग आहे, जो भाषिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यासला जातो.वेदांचा अर्थ कळण्याच्या दृष्टीने त्यातील विविध पारिभाषिक शब्दांचा नेमका अर्थ माहीत असणे आवश्यक असते. अशा काही संज्ञा व त्यांचे अर्थ यांची नोंद येथे केली आहे. यासाठी श्रीअरविंद लिखित द सिक्रेट ऑफ द वेद या ग्रंथाचा आधार घेतला आहे.[]

क्र. संज्ञा अर्थ
०१ सत्यम्,ऋतम्,बृहत् 'सत्यम्' म्हणजे अस्तित्वाचे सत्य. ते जेव्हा कृतिशील होते तेव्हा त्याला 'ऋतम्' असे म्हणतात. ते सत्य जेव्हा शरीरमनाच्या कृतींना योग्य दिशा देते त्यावेळी त्याला बृहत् म्हणतात. []
ऋतं सत्यचेतनेचा मनावर पडणारा प्रकाश
०२ भूमा आणि अल्प विराट् किंवा अनंत चेतनेला 'भूमा' असे नांव आहे आणि मर्यादित व्यक्तिचेतनेला 'अल्प' असे नांव आहे.
०३ महस् अतिमानस किंवा सत्यचेतनेला 'महस्' असे म्हटले जाते. महस् म्हणजे विराट आणि महान.
०४ अनृतम् शारीर आणि मानसिक स्तरावर जेव्हा सत्य अवतरित होते तेव्हा त्यात काही विकृती निर्माण होतात त्याला 'अनृतम्' असे म्हणतात.
०५ ऋषि, कवि, द्रष्टा ज्याच्या ठिकाणी ही सत्यचेतना जागृत आहे आणि दृष्टि, श्रुति आणि विवेक हे कार्यरत आहेत त्याला 'ऋषि', 'कवि', 'द्रष्टा' असे म्हणतात.
०६ जातवेदस् अग्नीला जातवेदस ही संज्ञा आहे. विविध विश्वांची निर्मिति करणारी आणि पूर्ण ज्ञानाने विश्वरचना करणारी ही शक्ति 'जातवेदस्' नांवाने ओळखली जाते. []
०७ विश्वानि वयुनानि विद्वान् अग्नीला चैतन्यशक्तीचे सर्व आविष्कार, निर्मितिप्रक्रिया यांचे ज्ञान असते. त्यामुळे त्यास 'विश्वानि वयुनानि विद्वान्' असे म्हटले जाते.
०८ कविक्रतु दिव्य चेतनेच्या स्फुरणातून जे कर्म निर्माण होते, सत्यचेतनेच्या ज्ञानातून ज्याची निर्मिती होते आणि ज्यात प्रमाद किंवा विकृतीला स्थान नसते असे कर्म.; सत्यचेतनेतून निर्माण झालेली प्रभावशाली इच्छाशक्ती म्हणजे कविक्रतु.(वेदरहस्य: पा. ६७) द्रष्ट्या ऋषींचा संकल्प म्हणजे कविक्रतु (वेदरहस्य: पा. १२२)
०९ सुवितम्, भद्रम् सत्याच्या आणि ऋताच्या ज्ञानाने चित्ताची जी प्रसन्न स्थिती होते तिला सुवितम् म्हणतात.
१० मयस् सत्यचेतनेचा आनंद
११ मयोभुव: जे देव सत्यचेतनेचे प्रतिनिधी म्हणून येतात त्यांना मयोभुव: हा शब्द वापरला जातो. त्यांच्या अस्तित्वात शुभत्व आणि आनंद ओतप्रोत भरलेला असतो.
१२ आहुती मर्त्य मानवाने अमर्त्य तत्त्वाला केलेले समर्पण
१३ क्रतु समर्पित कर्म किंवा प्रभावशाली शक्ती असे दोन्ही अर्थ क्रतु या शब्दाने व्यक्त होतात.महान कार्य किंवा महान इच्छाशक्ती असाही त्याचा अर्थ आहे. ज्ञानशक्ती असाही त्याचा अर्थ आहे. (सं ०१: पा. ६७)
१४ सोम दैवी आत्मानंद. हा आनंद अतिमानस सत्यचेतनेतून मनाकडे प्रवाहित होतो.[] सोमरस म्हणजे आनंद आणि सौंदर्य. (वेदरहस्य: पा. १७५)
१५ धी विचारशक्ती, बुद्धीची शक्ती किंवा जाणिवेची शक्ती, आकलन. इंद्र व वायू यांच्या सहकार्यातून बनलेली सामान्य मानसिकता आणि ऋतं किंवा सत्यचेतना यांच्यामधला दुवा म्हणजे धी.[]
१६ मति मानसिकता, मानसिक कृती किंवा मनोवस्था
१७ घृत अग्नी किंवा ग्रीष्मातील सूर्यासारखा दाहक व प्रकाशक असा याचा अर्थ आहे. अंजन घालणे हाही त्याचा एक अर्थ आहे, लकाकणारे प्रवाही द्रव्य असाही त्याचा अर्थ आहे. घृत याचा बाह्य अर्थ चमकदार, प्रवाही तूप असा आहे तर अंतरंग अर्थ बुद्धीची तेजस्वी स्थिती, प्रकाशमान विचार असाही होऊ शकतो. यालाच मेधा म्हणतात.
१८ धियं घृताचीम् अत्यंत समृद्ध व तेजस्वी मेधाशक्ती. ज्ञानाच्या माध्यमातून प्रकट होणारा सत्याचा प्रकाश.
१९ क्रतुं बृहन्तम् सत्यचेतनेची शक्ती प्रकाशमान आणि प्रभावी इच्छाशक्तीतून प्रकट झाली की तिला क्रतुं बृहन्तम् म्हणतात. (वेदरहस्य : पा. ६६)
२० तुविजात पुनःपुन्हा जन्म घेणारा. (वेदरहस्य : पा. ६७)
२१ उरुक्षय विराटात राहणारा. उरु म्हणजे विराट. (वेदरहस्य : पा. ६७)
२२ दक्ष इच्छाशक्ती आणि विवेकशक्ती म्हणजे दक्ष. (वेदरहस्य: पा. ६७)
२३ माया: सत्यचेतनेची समग्रता आणि व्यापक कृती यातून ज्ञानाच्या विविध शाखा निर्माण होतात, त्या माया: असे म्हणतात. (वेदरहस्य: पा. ७७)
२४ गो गाय हा पशु आणि प्रकाशमान असा त्याचा दुसरा अर्थ होतो. सत्यचेतनेच्या प्रकाशदायी शक्ती असा त्याचा अर्थ होतो.(वेदरहस्य: पा. ७७) गाय ही चेतनेच्या ज्ञानस्वरूपाचे प्रतीक आहे, तर घोडा हे तिच्या शक्तीस्वरूपाचे प्रतीक आहे. (वेदरहस्य: पा. १०६)
२५ स्वसराणि सोमरसाचा उल्लेख असा केला आहे. समूर्त झालेली शांती किंवा विसाव्याचे स्थान असा त्याचा अर्थ आहे. (वेदरहस्य: पा. ७८)
२६ वृत्र नकारात्मक शक्तींचे प्रतीक (वेदरहस्य: पा. १००) वृत्र हा प्रकाशाने नाहीसा केलेला अंधार आहे, असा त्याचा अर्थ आहे.
२७ वृषभ परमपुरुषाला वेदांमध्ये वृषभ असे संबोधण्यात आले आहे. (वेदरहस्य: पा. १०५)
२८ मध्यजगत प्राणमय जगत (वेदरहस्य: पा. १०७)
२९ सप्तगु सात किरणांना धारण करणारा अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. (वेदरहस्य: पा. ११०)
३० सप्तगाव: विश्वपिता सूर्य - त्यातून निघालेले सात किरण म्हणजे सप्तगाव: (वेदरहस्य: पा. ११०)
३१ हिरण्य हे श्रेष्ठ चेतनेचे प्रतीक आहे. (वेदरहस्य: पा. ११६)
३२ सुवर्ण हे सत्याचे प्रतीक आहे. (वेदरहस्य: पा. ११६)
३३ सूनृता आनंददायी सत्य असा याचा अर्थ आहे. सायाणाचार्य याचा अर्थ सुखकर आणि सत्यवाणी असा करतात. (वेदरहस्य: पा. १२०)
३४ ऋतावरी सत्याने ओतप्रोत असा याचा अर्थ आहे. उषादेवतेस ऋतावरी असे संबोधले आहे. (वेदरहस्य: पा. १२०)
३५ दुरितम् अडखळणे, चुकीच्या मार्गाने जाणे, प्रमाद, पाप आणि आपत्ती असा याचा अर्थ आहे.
३६ सुवितम् योग्य मार्गाने जाणे आणि सर्व शुभ व आनंददायी गोष्टींची प्राप्ती होणे असा याचा अर्थ आहे. (वेदरहस्य: पा. १२१)
३७ श्रव इंद्रिये किंवा बुद्धि जे जाणू शकत नाहीत असे श्रेष्ठ दिव्य ज्ञान. जे दिव्य श्रवणाने ऐकता येते व दिव्य दृष्टीने पाहता येते असे ज्ञान म्हणजे श्रव. (वेदरहस्य: पा. १२२)
३८ गवेषणा हरवलेल्या गायींचा शोध घेणे. (वेदरहस्य: पा. १२७)
३९ गोअर्णस प्रकाशाचा मुक्त उचंबळता सागर. (वेदरहस्य: पा. १२९)
४० स्वर्लोक हे विशिष्ट जगताचे नाव आहे. द्यावा-पृथिवीच्या पलीकडे असलेले हे जगत आहे. याला उरुलोक म्हणजे व्यापक जग असे म्हटले आहे. येथे प्रचंड प्रकाश असतो. सूर्य, उषा, अंगी यांना प्रकट करताना विष्णूने केलेल्या यज्ञाचा परिणाम म्हणून स्वर्लोकाची निर्मिती झाली. ते सत्याचे, अमृताचे आणि सौंदर्याचे परमधाम आहे. (वेदरहस्य: पा. १३५)
४१ वज्र स्वर्लोकातील शिला (वेदरहस्य: पा. १३९) []
४२ नवग्वा इंद्राचा मित्र
४३ दशग्वा अंगिरस (वेदरहस्य: पा. १४१)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Aurobindo, Sri (1998). The Secret of the Veda (PDF). The Complete Works of Sri Aurobindo. 15. Sri Aurobindo Ashram Publication Department. 23 March 2025 रोजी पाहिले.
  2. ^ Bloomfield, Maurice (1908). The Religion of the Veda: The Ancient Religion of India. G.P. Putnam's Sons. 23 March 2025 रोजी पाहिले.
  3. ^ Doniger, Wendy (1981). The Rig Veda: An Anthology. Penguin Classics. 23 March 2025 रोजी पाहिले.
  4. ^ Prabhavananda, Swami (1943). Vedic Religion and Philosophy. Vedanta Press. 23 March 2025 रोजी पाहिले.
  5. ^ Panikkar, Raimon (1977). The Vedic Experience: Mantramañjarī. Motilal Banarsidass Publishers. 23 March 2025 रोजी पाहिले.
  6. ^ वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम