लोहस्तंभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोहस्तंभ
दिल्ली येथील लोहस्तंभ
लोहस्तंभ is located in भारत
लोहस्तंभ
भारत मधील स्थान
गुणक 28°31′28.76″N 77°11′6.25″E / 28.5246556°N 77.1850694°E / 28.5246556; 77.1850694
स्थान मेहरौली येथील कुतुब मिनार परिसर, दिल्ली, भारत
उंची ७.२१ मी (२३ फूट ८ इंच)
यांना समर्पित विष्णू

दिल्ली येथील मेहरौली उपनगरात एक लोहस्तंभ आहे. हा एक २३ फूट ८ इंच (७.२ मीटर) उंच आणि १६ इंच व्यासाची दंडगोलाकार खांब असून त्याची निर्मिती "राजा चंद्र", बहुदा दुसरा चंद्रगुप्त (इ.स. ३७५-४१५) याने केली.[१][२] हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. स्तंभाचे वजन ३,००० किलो (७,००० पौंड)पेक्षा जास्त असून असे मानले जाते की याची निर्मिती कदाचित उदागिरी लेण्यांच्या बाहेर केली गेली[३] आणि, दिल्ली सल्तनतच्या सुरुवातीला ते सध्याच्या ठिकाणी उभे केले गेले..

भौतिक वर्णन[संपादन]

कुव्वत-उल-इस्लाम मशिदीच्या आवारातील लोहस्तंभ

स्तंभाची उंची, त्याच्या शिखरापासून पायापर्यंत, ७.२१ मी (२३ फूट ८ इंच) इतकी असून पायाचा १.१२ मी (३ फूट ८ इंच) भाग जमिनीखाली आहे. त्याच्या शिखराच्या भागाची उंची ३०६ मिमी (१२ इंच) इतकी आहे. खांबाचे वजन ६ टन (१३,२२८ पौंड) पेक्षा जास्त आहे. [४]. खांबाच्या गंजप्रतिरोधक क्षमतेमुळे त्याने पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि पदार्थविज्ञान शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्या खांबाला "पुरातन भारतीय कारागिरांच्या लोह काढणे आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या उच्च कौशल्याची साक्ष" म्हणून ओळखले जाते. [५][६]
फॉस्फरसमुळे लोहस्तंभावर असणाऱ्या हलक्याशा गंजाच्या आवरणातील अस्थिर ऑक्सिहायड्रॉक्साईडचे रूपांतर स्थिर ऑक्सिहायड्रॉक्साईइडमध्ये होते आणि गंजण्याची प्रक्रिया मंदावते. अधिक कालावधीनंतर यापेक्षा जास्त स्थिर असे लोखंडाचे संयुग मॅग्नेटाइट तयार होते. लोखंडामधील फॉस्फरसचा हवेतील बाष्पाशी संपर्क येऊन फॉस्फॅरिक आम्ल तयार होते. फॉस्फॅरिक आम्लाची लोखंडावर अभिक्रिया होऊन आयर्न-हायड्रोजन-फॉस्फेट- हायड्रेटचे गंजप्रतिबंधक आवरण तयार होते. हे आवरण अस्फटिकी स्वरूपात असते. लोहस्तंभाचे वजन सहा टन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे सांद्रीकरण आणि निर्जलीभवन या चक्रास चालना मिळते. यामुळे अस्फटिकी आयर्न हायड्रोजन फॉस्फेट हायड्रेटचे रूपांतर स्फटिकी स्वरूपात होते. या स्फटिकांमुळे गंजाच्या आवरणातील छिद्रे आणि भेगा भरून निघतात आणि गंजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. [७] [५]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ फिनबर बेरी फ्लड, २००३, "Pillar, palimpsets, and princely practices", Res, Xliii, न्यूयॉर्क विद्यापीठ, pp97.
  2. ^ "आयआयटीच्या विद्यार्थ्यानी सोडवले स्तंभाचे रहस्य".
  3. ^ आय बालसुब्रमण्यम २००५, पान. १.
  4. ^ जोशी, एम्.सी. (२००७). द मेहरौली आयर्न पिलर. दिल्ली: एन्शंट हिस्ट्री. ISBN 978-81-87358-29-9.
  5. ^ a b ऑन द करोजन रेजिस्टन्स ऑफ द दिल्ली आयर्न पिलर, आर. बालसुब्रमण्यम, करोजन सायन्स, भाग ४२ (२०००) पान. २१०३-२१२९. करोजन सायन्स हे गंज विज्ञान आणि अभियांत्रिकी विशेष पुस्तक आहे.
  6. ^ योशिओ वासेदा, शिगेरु सुझुकी. कॅरेक्टरायझेशन ऑफ करोजन प्रोडक्ट्स ऑन स्टील सरफेसेस. p. vii. ISBN 978-3-540-35177-1.[permanent dead link]
  7. ^ डॉ. देशपांडे, प्रविण प्रल्हाद (२०१४). प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राचा संक्षिप्त इतिहास. राज्य मराठी विकास संस्था. ISBN 978-81-208-0592-7.