"मराठीतील कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दक...
(काही फरक नाही)

१०:४३, ३ मे २०१६ ची आवृत्ती

मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, चरित्रकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात.

शब्दकोश

संख्येने सर्वाधिक, उपप्रकारांत सर्वाधिक आणि सर्वांच्या परिचयाचा कोशप्रकार म्हणजे शब्दकोश होय. मराठीतील निव्वळ शब्दकोशांची संख्या ४००च्या घरात जाईल. मराठी भाषेत स्वातंत्र्यपूर्व काळात १३४ तर स्वातंत्र्योत्तर काळात २७० पेक्षा अधिक शब्दकोश निर्माण झाले.

मराठीतील पहिला शब्दकोश म्हणजे विल्यम कॅरे यांनी १८१० मध्ये प्रकाशित केलेला 'मराठी-इंग्रजी कोश' (अ डिक्शनरी ऑफ दी मऱ्हाटा लँग्वेज). हा कोश पंडित विद्यानाथ (वैजनाथ शर्मा) यांच्या मदतीने तयार केल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. वैजनाथ शर्मा हा कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमधील मराठीचा प्रमुख पंडित होता. या कोशाची पृष्ठसंख्या ६५२ असून यात मराठी शब्द मोडी लिपीत व अर्थ इंग्लिश भाषेत दिला आहे.

दुसरा कोश लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी या लष्करी अधिकार्‍याने मुंबई येथे इ. स. १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. या कोशाचे दोन भाग असून पहिल्या भागात मराठी शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द देऊन दुसऱ्या भागात इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. कोशातील शब्दसंख्या आठ हजारपर्यंत आहे.

शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमीळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत.