विठ्ठल हरी घोटगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जयंत पांडुरंग नाईक (मूळ नाव विठ्ठल हरी घोटगे) (सप्टेंबर ५, १९०७ - ऑगस्ट ३०, १९८१) हे भारतातील ग्रामीण शिक्षणप्रसारामधील मोलाच्या कामगिरीकरता नावाजले गेलेले शिक्षणतज्ज्ञ होते.

जीवन[संपादन]

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी हे नाईकांचे मूळ गाव. विठ्ठल हरी घोटगे या मूळ नावानेच त्यांनी बी. ए. पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. पोलिसांकडून पकडले गेल्यानंतर आपल्या देशभक्तीचा कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी नाव बदलले व `विठ्ठल हरी घोटगे' चे ते `जयंत पांडुरंग नाईक' झाले. पुढे जे.पी. नाईक याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.

कार्य[संपादन]

स्वातंत्र्यसैनिक म्हणून बेल्लारीच्या तुरुंगात सजा भोगत असताना जे.पी. नाईकांनी गंधकाची भुकटी व गोडेतेल यांच्या मिश्रणातून त्वचारोगावर परिणामकारक असे मलम तयार केले. तुरुंगातील कैद्यांच्या त्वचारोगावर हे मलम वापरले जाऊ लागले. परिणामी कैद्यांच्या त्वचारोगावरील उपायासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॅसलीनपेक्षा हे मलम स्वस्त आणि उपायकारक ठरला. यामुळे व्हॅसलीनवरचा खर्च कमी करण्यात नाईक यशस्वी झाले. याचे बक्षीस म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेत सूट देऊ केली. पण शिक्षेत सूट देण्यापेक्षा बक्षीस म्हणून वाचायला वैद्यकशास्त्राची पुस्तके द्यावीत अशी मागणी नाईकांनी केली आणि त्यांची ही मागणी इंग्रज सरकारने पूर्ण केली.

जे.पी. नाईक यांनी तुरुंगातून सुटल्यावर धारवाड जिल्ह्यातील उप्पीनबेट्टीगेरी या छोट्याशा खेडेगावात आपले समाजकार्य सुरू केले. सुरुवातीला संपूर्ण गाव रोगमुक्त केल्यावर त्याच गावातील शिक्षित तरुणांच्या मदतीने त्यांनी गावात साक्षरता मोहीम राबविली. गावातील समूहशक्तीच्या श्रमदानातून गावाजवळची टेकडी फोडून गावासाठी सडक तयार केली. जे.पी. नाईकांमुळे मुंबईच्या गव्हर्नरांनी उत्कृष्ट गावासाठी पारितोषिक म्हणून ठेवलेली `ग्रामीण सुधारणा ढाल' उप्पीनबेट्टीगेरीसारख्या छोट्या गावाला मिळाली.