विकिपीडिया:धूळपाटी/बाळाजी विश्वनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.



बाळाजी विश्वनाथ
पेशवे
अधिकारकाळ नोव्हेंबर १७, १७१३ - एप्रिल २, १७२०
अधिकारारोहण नोव्हेंबर १७, १७१३
पूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे)
जन्म १६६० (तारीख अनिश्चित)
मृत्यू एप्रिल २, १७२०
सासवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
उत्तराधिकारी थोरले बाजीराव पेशवे
वडील विश्वनाथ परशरामपंत भट
पत्नी राधाबाइ
संतती थोरले बाजिराव, अन्नत

बाळाजी विश्वनाथ भट ( इ.स.१६६०एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.

महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पूर्वज. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४०० पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार १४७८ च्या सुमारास ही देशमुखी मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथांचे वडील व आजोबा शिवछत्रपतींच्या सेवेत असावेत असेहि रियासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास महादजी विसाजी देशमुख (बाळाजी विश्वनाथ यांचा पणजा) या परंपरागत देशमुखीवर होते.. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणे देशमुखीचे असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामील आहेत या संशयाने सिद्दीने भट घराण्याचा छळ चालू केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालून समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानू" कुटुंबाबरोबर साताऱ्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरू केल्यावर मुरूड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवून एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानू" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवीस-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मोगलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानू" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखीत बसला आणि कटवाल्यांकडून मारला गेला. स्वामिनिष्ठेची ही पराकाष्ठाच होती.


बाळाजी विश्वनाथाची सुरवातीच्या काळातील उमेदवारी[संपादन]

बाळाजी विश्वनाथ यांनी रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून त्यांना आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबू मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानी-सुलतानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होते. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळून सगळे अनुभवत होते. १७०५ च्या दरम्यान त्यांनीसुद्धा आपली समशेर गाजवली, आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी. कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती, आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखील मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास गादीवर बसवले गेले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंजेबाशी झुंजत होती. सातारा, परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणून प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडित" म्हणजेच बाळाजी गेले होते.. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कमी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्यासंबधीचे पत्र त्यांनी "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहिलेले आढळते.

१७०७ आणि नंतर[संपादन]

२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वत:ला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूंनी गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहूंनी सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहूंचा नाईलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावून घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आणि नारो राम यांनी शाहूंची बाजू बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजून गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला.


अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे बाळाजींनी परत जोडली. जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहूंच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उद्भवू नये म्हणून बाळजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्वाचे. १७०७ पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात ते त्या योग्यतेचा होतेच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.

बाळाजी विश्वनाथ यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]

  • पहिला पेशवा (नयनतारा देसाई)
  • बाळाजी विश्वनाथ (अरविंद जयवंत)
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे (प्रमोद ओक)


खालील मजकूर योग्य त्या लेखात स्थानांतरित करावा[संपादन]

बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांस शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. नानासाहेबांनी पुण्याला खर्‍या अर्थाने शहराचे रूप दिले. सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ आणि पर्वती हे नानासाहेबाच्या आज्ञेवरुन बांधले गेले. मुठेवर "लकडी पूल" त्यांनी बांधून घेतला. पुण्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत रहावा म्हणून त्यांनी "कात्रज" वसवले.

नानासाहेबांनी खर्‍या अर्थाने मराठे शाहीचा अटकेपार गेलेला सुवर्णकाळ बघितला. त्याच बरोबर मराठ्यांना पानिपतचा प्राणांतिक फटका त्यांच्याच कारकीर्दीत बसला. व्यवस्थापनाच्या दृष्टीने मात्र नानासाहेबांनी आपले काम चोख बजावले. रघुनाथरावांनी वयाच्या २३व्या वर्षीच अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातील ४ मे १७५८ रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहिलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे - "आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतील. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे." बाजीरावापासून राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधू नदी आणि काश्मीरपर्यंत, पूर्वेला ओरिसापर्यंत, नैर्ऋत्येला गोव्यापर्यंत आणि दक्षिणेला म्हैसूरपर्यंत पसरले. निजामाला तर मराठ्यांनी मिळेल तिथे पिटून काढले. सदाशिवरावभाऊने हैदराबादच्या निजामाला सळो की पळो करुन सोडले. दिल्लीचे सिंहासन मराठ्यांनी आपल्या टाचेखाली आणले. शिवछत्रपतींची "थोरली मसलत" म्हणजेच दिल्लीवरचा हक्क पेशव्यांनीच प्रस्थापित केला. याच घटनेवर वीर सावरकरांसारख्या प्रतिभावान कवीने तर "अटकेवर जरीपटका म्हणून २६० ओळींचा पोवाडाच लिहून काढला". तो संपूर्ण पोवाडाच वीरश्रीने भरला आहे, सगळा पोवाडा इथे देता येत नसला तरी त्याच पोवाड्यातील काही मोजक्या ओळी पुढील प्रमाणे -

ऐका ऐका हिंदुमात्र हो! वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या सात शतकांचा उगवे सुड जिंकिले जेत्याला॥१॥

जो जो मागे आला आसुर शक्तीच्या की भरावरी, भारतीय यज्ञाश्व नाचला त्याच्या त्याच्या उरावरी॥४३॥

कुठे आज ते शक? वा बर्बर? बाल्हीकही? वा हूण कुठे? भारतीय जठरग्नीत जळुनी भस्म जाहले द्रुत ते ते॥४४॥

परी आज ते शल्य उपटले आज तोडीला ध्वज तो रे, आज जिंकीलि तीही लढाई, आजि महंमद-मद उतरे॥६४॥

हिंदूवीरांचा कीं श्रीशे असे यशस्वी हट केला, आज हिंदवी जरिपटका की पुन्हा पोचला अटकेला॥८०॥

पठाण मोंगल तुर्क इराणी-दाढी तितुकी सामोरी, पुर्तुगिज वलंदाज फिरंगी टोपी तितुकी पाठिवरी॥१३१॥

परी तितुक्यांहीसहित मराठा-वीर झुंज करी, एक्या ह्स्ते उपटित दाढी टोपी उडवी दुज्या करी॥१३२॥

पालखेडसी निजाम पिटला अल्ली पिटिला बंगाली, अर्काटासी नबाब पिटला, पिटिला सिद्दी जली स्थली॥१६४॥

बादशहाच्या बादशाहिची जाळुनि दाढी दिल्लीवरी, होता की नव्हतासा केला निजाम पिटुनी भोपळी॥१८०॥

जयजयकारे भरा अंबरा करा महोत्सव घरोघरी, मांगलिका कीं हिंदुमात्र हो वार्ता आतांची आली॥२२०॥

आज सात शतकाने विजयी मिरवित सोनेरी तोडा, पिई सिंधुचे पाणि पुनरपी हिंदु सैनिकांचा घोडा॥२५२॥


पानिपत[संपादन]

मात्र राघोबादादाची पाठ फिरताच दिल्लीतील शहा, अहमदशहा अब्दालीशी चुंबाचुंबी करु लागला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सदाशिवरावभाऊ(चिमाजी अप्पाचा पुत्र) शिंदे, होळकर, गायकवाड, मेहेंदळे असे तोलामोलाचे सरदार घेउन जाट व रजपुतांच्या मदतीने दिल्लीवर चालून गेला. दिल्ली ताब्यात येताच त्याने विश्वासरावाला आपल्या पुतण्याला सिंहासनावर बसवण्याचे ठरवले. मात्र उद्या हिंदू राजा बसवून भाऊ निघून जाईल, पण अफगाणांनी चिडून आक्रमण केले तर उत्तरेतील सगळी राज्ये त्याखाली भरडली जातिल ही भिती जाट-शीख-रजपुतांना वाटली, त्यांनी या गोष्टीला नकार दिला. मात्र मराठ्यांची दहशत रहावी म्हणुन सदशिवरावभाऊने घणाचे घाव घालुन दिल्लीचे तख्त फोडले.

पण जाट-रजपुतांची भीती खरी ठरली. राघोबाने डिवचलेला अब्दाली संधीची वाटच बघत होता. मराठ्यांनी दिल्लीवर आक्रमण करताच दिल्ली आपल्या ताब्यात रहावी म्हणुन त्याने मोर्चा बांधणी चालु केली. १७ ऑक्टोबर १७६० रोजी त्याने दिल्लीच्या दिशेने कुच केले. अगदि २४-२५ तारखेपर्यंत तो भागपतपर्यंत आला. मराठी सैन्य या वेळी धान्याच्या चणचणीमुळे कुंजपुराकडे वळली होती. मराठी सैन्याने अब्दालीने यमुना ओलांडु नये म्हणुन फारसे काही प्रयत्न केले नाहीत. आधीच आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्याच प्रभावाखाली असलेल्या भूमीवर अब्दालीला अंगावर घेऊ असा विचार भाऊने केला. हे अब्दालीच्या पथ्यावरच पडले, त्याचे सैन्य अगदी सोनपत आणि पानिपत नजीक येउन ठेपले. भाऊला त्या भागाची फारशी माहीती नव्हती, उत्तरेतिल त्याची पहीलीच मोहीम होती. सुरुवातिला छोट्या-छोट्या चकमकीत मराठी सैन्याने हिसका दाखवला असला तरी अनुभवी अब्दालीच्या सैन्याने १४ जानेवारी १७६१ रोजी मुख्य लढाईला तोंड फ़ोडले. या पानिपतच्या तिसर्‍या लढाईत दोहो बाजूंचे मोठे नुकसान झाले.

यात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. लाखापेक्षा पेक्षा जास्त मराठी सैन्य कापले गेले. १८ वर्षांचा कोवळा विश्वासराव लढाईत मारला गेला. सदशिवरावभाऊ देखील कामी आला. दोघांची प्रेते अफगाणी सैनिकांच्या हाती लागली. कोवळ्या विश्वासरावाचे प्रेत बघून तर अब्दाली चाटच पडला "सुभान अल्लाह, क्या नूर है? मरनेके बाद इतना हसीन है तो जिंदा कैसा होगा?" अश्या आशयाचे उद्गार त्याच्या तोंडून निघाले. म्हणूनच अब्दाली विश्वासरावाच्या प्रेताला आपल्या बरोबर घेऊन जाणार होता असे म्हणतात. ब्रिटिश पत्रे देखील विश्वासरावाला "Most handsom among marathas" असे म्हणतात. असे समजतात की पानिपतच्या लढाई नंतर पुणे भागातील एकही घर असे नव्हते की ज्या घरातला पुरुष कामी आला नव्हता पेशवाईची पत्रे याचा उल्लेख घरोघरी बांगड्या फुटल्या असे करतात. नानासाहेबाला जे पत्र आले त्यात लिहिले होते "दोन हिरे हरवले, काही मोती हरवले आणि मोहोरा किती हरवल्या याची गणनाच नाही". पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला खरा पण मराठ्यांनी अब्दालीला देखील असा फटकावला की त्यानंतर दिल्लीकडे परत तो कधीच फिरकला नाही. आजही तेथील माणसे जिंकलेल्या अब्दालीपेक्षा हरलेल्या मराठ्यांना मान देतात, भाऊने जेथून लढाईची सुरुवात केली होती तिथे हरियाणा सरकारने एक स्मृतिस्तंभ उभा केलाय. मात्र पानिपतचा पराभव मराठ्यांच्या सत्तेवरचा मर्मप्रहार ठरला. त्यानंतर मराठी सत्ता परत पूर्वीच्या तडफेने कधीच उठली नाही. मराठ्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला.


थोरले माधवराव प्रशासनपर्व[संपादन]

आपल्या स्वकीयांच्या आणि मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून नानासाहेब खचले. त्यांनी त्याची हाय खाल्ली हेच दु:ख उराशी कवटाळून हा महान पेशवा २३ जून १७६१ रोजी वारला. त्यांच्या धाकट्या मुलाने माधवराव पेशवा १ला याने मात्र पुढच्या काही वर्षात दक्षिणेत मराठी सत्तेचा दरारा परत प्रस्थापित केला. माधवरावास २० जुलै, १७६१ रोजी पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी - १७६२ उरळी, नोव्हेंबर १७६२ घोडनदी, ऑगस्ट १७६३ राक्षसभुवन या लढाया केल्या. निजामाला १७५९ ला उदगीरला सदाशीवरावभाऊने निजामाला हरवून ८५ लाखाचा मुलुख हस्तगत केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी मराठयांच्या नाजुक परिस्थितीचा फायदा घेत नळदुर्ग, अक्कलकोट या ठिकाणी निजामाने धुडगूस घालत होता. माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ रोजी मोहिम हाती घेतली. पण २९ डिसेंबर, सन १७६१ मध्ये राघोबादादांनी अनपेक्षित तह केला. या नंतर पेशव्यांनी हैदरअलीखान विरुद्ध मोहीम उघडली, मात्र रघुनाथरावांनी निजामाशी हातमिळवणी करुन घरभेदीपणा केल्याने माधवरावांनी तात्पुरती शरणागती पत्करली. मात्र निजाम व राघोबादादा यांच्यात बेबनाव सुरु झाला निजामाने पुण्यावर हल्ले केले. या नंतर औरंगाबादवर मराठ्यांनी हल्ले केले. पुढे राक्षसभुवन येथे १० ऑगस्ट १७६३ च्या युद्धात पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला. निजामाकडून उदगीरचे ६० लाख आणि नवीन २२ लाख असा एकूण ८२ लाखांचा मुलुख मराठ्यांनी मिळवला. माधवरावाने हैद्राबादच्या निजामाला दाती तृण धरायला लावले. या नंतरच्या काळात माधवरावांनी कर्नाटकवर एकंदर ५ स्वार्‍या केल्या. या मोहिमांमुळे अगदी शहाजीराजांच्या वेळचा जहागिरीचा सर्व मुलूख परत मराठ्यांना मिळाला. या मोहिमांत माधवरावाचे शिस्त, चिकाटी, शौर्य, जरब हे गुण उजळून निघाले. १२ वर्षांत त्याने मराठी सत्तेचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवुन दिला. मराठ्यांचा ब्रिटिश इतिहासकार ग्रॅंड डफ हा माधवराव पेशव्याची तुलना त्याचाच आजा पहिला बाजीराव याच्याबरोबर करतो. राघोबादादाने मात्र माधवरावाच्या पेशवा बनण्याला विरोध केला. राघोबादादाला पेशवेपद त्याच्याकडे पाहिजे होते. म्हणजे शाहूराजे - ताराराणी मधला जुना वादच परत या दोघात चालू झाला. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी राघोबादादांना नजरकैदेत टाकले. पुढे आतड्याच्या क्षयाच्या आजाराने माधवरावांचे १७ नोव्हेंबर १७७२ रोजी थेऊर येथे गणपती मंदिराच्या ओसरीतच निधन झाले. ग्रॅंड डफ म्हणातो - "पानिपतापेक्षाही माधवरावाचा मृत्यू हा पेशवाईसाठी दुःस्वप्न ठरला." माधवराव गोरेपान, उंचपुरे, आणि थोराड शरीराचे होते, काळेभोर आणि पाणीदार डोळे, उग्र चेहेरा याच बरोबर मितभाषी असून एरवी बोलताना रोखठोक आणि ठासून बोलत. लेखन रेखीव होते. राज्याच्या कर्जफेडीसाठी स्वतःचे लाखो रुपये, जडजवाहीर दिले. बाजीरावाप्रमाणेच माधवरावांना देखील चैन, आळस, लबाडी बिलकुल खपत नसे.


पेशवाईचे पुनरुत्थान[संपादन]

त्या नंतर डिसेंबर १७७२ मध्ये त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. १७७३ मध्ये राघोबादादाच पेशेवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करुन न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी त्याचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमुटपणे पेशवेपदावर नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमले तेव्हा अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुन: पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणिसांनी इंग्रजांची २-३ राजकिय व लष्करी आक्रमणे परतवून लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले.

पेशवाईचा अस्त[संपादन]

सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर पेशवेपदावर राघोबादादाचा पुत्र दुसरा बाजीराव आला, हाच तो पळपुटा बाजीराव. यशवंतराव होळकराला भिऊन हा पुणे सोडून पळाला आणि वाई येथील इंग्रजांच्या आश्रयाला गेला. इथून प्रत्येक बाबतित इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. ३१ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या करारा नुसार बाजीरावाने इंग्रजांची तैनाती फ़ौज स्वीकारुन, त्या फौजेच्या खर्चासाठी मोठा मुलुख इंग्रजांच्या घशात घातला. १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर पेशवाईतील उरले-सुरले शहाणपण संपले. १७९९ मध्ये टिपू सुलतान आणि १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर इंग्रजांना पुणे हे सोपे आणि एकुलते एक लक्ष झाले. १८०३च्या तहा नंतर देखील बाजीराव आणि ब्रिटिश यांच्यात धुसफुस चालूच राहीली. शेवटी त्याची परीणीति ५ नोव्हेंबर १८१७ या दिवशी खडकी येथील लढाईत झाली. ईस्ट इंडिया कंपनीने लेफ्टनंट कर्नल बर(Burr) याच्या नेतृत्वाखाली दुसर्‍या बाजीरावाचा पराभव केला. १८१८ मध्ये अशीरगडजवळ धोलकोट येथे John Malcolm याच्या समोर मराठ्यांनी शरणागती दिली. काही इतिहासकार याची २ कारणे देतात १)२रा बाजीराव हा नजरकैदेतच वाढला असल्याने त्याला दरबारी कामकाज व राजकारण आणि युध्दातले छक्के-पंजे माहीत नव्हते, २)पेशव्यांच्याच हाताखाली मोठे झालेले सरदार आता पेशवाईलाच धाक दाखवत होते. अशी संकटे या आधीच्या कोणत्याच पेशव्यावर आली नव्हती. इंग्रजांनी त्याचे राज्य हिसकावून त्यास वार्षिक ८ लक्ष रुपयांचे पेन्शन चालू केले, त्याची रवानगी कानपूरजवळ ब्रह्मवर्तास झाली. इंग्रजांनी रायगड देखील ताब्यात घेतला, रायगडवर त्यांनी सगळी हिशेब आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या.

इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला. बाजीरावास अनेक लग्नांनंतर देखील मूल झाले नव्हते, शेवटी वेणगांव(कर्जत-रायगड) येथील माधवराव भट, जे बाजीरावाच्या सांगण्यावरुन ब्रह्मवर्तास स्थायिक झाले होते त्यांच्या "गोविंद" नावाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचेच नाव धोंडोपंत ठेवले, हेच ते स्वातंत्र्यसेनानी "नानासाहेब पेशवे" या शिवाय बाजीरावाने २ मुले दत्तक घेतली होती - गंगाधर उर्फ बाळासाहेब आणि सदाशिव उर्फ दादासाहेब. २रा बाजीराव २८ जानेवारी १८५१ मध्ये वारला, मात्र ११ डिसेंबर १८३९ च्या त्याच्या मृत्युपत्राप्रमाणे इंग्रजांनी नानासाहेबास उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली तरी पदव्या आणि पेन्शन देण्यास नकार दिला. नानासाहेबच नव्हे तर भारतातील बर्‍याच संस्थानांना इंग्रजांनी तनखा नाकारला, काहींची तर संस्थानेच वारसाहक्कावरून किंवा दत्तकविधानावरून खालसा करावयास घेतली.


१८५७ चे स्वातंत्र्यसमर आणि सामाजिक परीस्थिती.[संपादन]

सगळीकडे असंतोष पसरत चालला होता. १८३० पासूनच भारतीय उद्योगांची इंग्रज सरकार जाणूनबुजून गळचेपी करत होते. माल निर्यातीवर जबर कर लादला, आणि इंग्लंडमधून येणारा माल आयातकर अत्यल्प बसविल्याने स्वस्तात विकायला काढला. भारतीय उद्योगांचे तीनतेरा वाजले. १८३०-३१ सालचा विनिमय दर होता १५ भारतीय रु. = १ स्टर्लिंग पौंड. यावरुन भारतीय धंदे का बुडत गेले याचे सुस्पष्ट कारण समजते. आर्थिक आघाडी अशी पिछाडली होती तर भारतीय सैनिकाचे पगार देखील इंग्रज सैनिकांपेक्षा कित्येक पटींनी कमीच होते, त्यांना बढती अशी कधी मिळतच नसे. यातच भर म्हणून सामाजिक स्थित्यंतरे घडत होती. कायद्याने हिंदूंच्या धार्मिक रिवाजात आडकाठी करण्यात आली, समुद्रयात्रेला हिंदु धर्माने धर्मबाह्य ठरवल्याने ही समुद्रयात्रेची अट शिपायांना जाचक ठरू लागली. मात्र या असंतोषाला वाढवण्याचे एक तात्कालिक कारण घडले - काडतुसांना लावलेली चरबी, ही गाय किंवा डुकराची असे. गाय हिंदूंना पवित्र आणि डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असल्याने सैनिकांमधे प्रचंड असंतोष पसरला होता. या सर्व थरांतील असंतुष्ट घटकांना नानासाहेब पेशव्यांनी एकत्र आणले. १८५७ च्या आधीची नानासाहेबांनी - झाशीची राणी किंवा आसाम, जयपूर, चांदा, ग्वाल्हेर, रेवा, संबलपूर या आणि अशा शेकडो राजे-रजवाड्यांना १८५४ पासूनच या युद्धाबाबत पत्रे लिहिली. लष्करी छावणीत सैनिकांकडून कमळावर आणि नागरिकांकडून भाकर्‍यांवर हात ठेवून घ्यायला लावलेली शपथ बघता यात नानासाहेबांनी किती गुप्तता ठेवली होती हे लक्षात येते. केवळ वार्षिक ८ लाखाच्या तनख्यासाठी लढणारे नाना नव्हते ना झाशीची राणी. २र्‍या बाजीरावाच्या मृत्यूनंतर नानासाहेबांच्या आई नेपाळ येथे राहिल्या, तेथे त्यांनी ८० गावे ’खरेदी’ केली यावरून नानासाहेबांसाठी बाजीरावाने ७ पिढ्या पुरेल इतका पैसा सोडला होता हे समजते, त्यापुढे ८ लाखाचे पेन्शन ते काय?

संदर्भ[संपादन]