Jump to content

ग्रंथालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वाचनालय या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस.आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.

वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे तीन घटक आहेत. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण - घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.

शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते.

बदलत्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात. आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत आहे. अनेक नवीन कल्पना ग्रंथालयात बघायला मिळतात ग्रंथालयाचे विविध प्रकार अस्तित्वामध्ये आहेत कार्पोरेट व इंडस्ट्री क्षेत्रांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय ही तेथील कर्मचारी, व्यवस्थापक व अधिकारी, इंजिनियर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात. वेळेनुसार व आवडीनुसार या ग्रंथालयाचा या लोकांना लाभ घेता येतो. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर, तसेच व्यापारी हे आपल्या आवडीनुसार आपल्या घरांमध्येच ग्रंथालय तयार करतात. आपल्या व्यवसायानुसार ग्रंथसंग्रह जतन करणे त्याचं वाचन करणे अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथालये उभी राहताना दिसतात. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे. मात्र पुरेसा निधीअभावी आणि सामाजिक मदतीअभावी अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे डिजिटल ग्रंथालयाच्या साह्याने तुम्हाला जगभरातील अनेक मोलाचे ग्रंथ हे ग्रंथालयामधून वाचता येणे शक्य झाले आहे, इतकेच नाही तर कुणालाही त्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून नोंद करून हव्या त्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आज माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे त्या दृष्टीने ग्रंथालये ही वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये सामाजिक संघटनांनी अथवा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तसेच सरकारने योग्य ती जबाबदारी स्वीकारण्याने ही ग्रंथालय चळवळ पुढे जाण्यास नक्कीच मदत होत आली आहे.

कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.

ग्रंथालयातील विविध विभाग :

१ ग्रंथोपार्जन

२ ग्रंथ वर्गीकरण

३ तालिकीकरण

४ देवघेव

५ संदर्भ

६ नियतकालिके

इतिहास[संपादन]

प्राचीन भारतीय विद्यापीठ तक्षशिलेचे ग्रंथालय हे सर्व जगात प्रसिद्ध होते. अनेक ग्रीक तसेच चीनी प्रवासी या ग्रंथालयाला भेट देऊन गेल्याची नोंद सापडते. प्राचीन काळात राजे-राजवाड्यांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल आहे.

१ प्राचीन काळ : प्राचीन काळी इजिप्त आणि अलसरीया शासकीय कागदपत्रे व धर्मिक वाचन साहित्य अभिलेखागार या स्वरूपात ग्रंथालये अस्तित्वात होती. ग्रीस व इजिप्त या देशात ग्रंथालये असल्याची नोद आढळते.

२ मध्ययुगीन काळ : मध्ययुगीन मुस्लिम देशामध्येही ग्रंथालये होती. अरब बगदाद येथे मोठ्या प्रमाणात ग्रंथालये होती.

३ आधुनिक काळ : या कालखंडात विज्ञान प्रसार व विकास झाला. माहिती देवाण घेवाण वाढली, संशोधनांत वाढ झाली, शिक्षणात वाढ झाली, नवनवीन तंत्रज्ञानात वाढ झाली. त्यामळे पारंपरिक ज्ञान साधनाबरोबर डिजिटल ज्ञान साधनांचा उदय झाला. त्यांमुळे आधुनिक ग्रंथालये अधिकच विकसित झाली. ग्रंथालयांत नवीन सेवांचा उदय झाला.

महाराष्ट्रातील प्रमुख ग्रंथालयाची माहिती[संपादन]

पारंपरिक ग्रंथालयांमध्ये देखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे, त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्‍नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. महाराष्ट्रात नाशिक येथे स्थापन झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाला एक वेगळा इतिहास आणि परंपरा लाभलेली आहे. या ग्रंथाच्या कार्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. काही ख्रिश्चन मिशनरी व नाशिक मधील वाचनप्रेमी यांनी एकत्र येऊन या ग्रंथालयाची योजना प्रत्यक्षात आणली. १८४० हा काळ म्हणजे भारतात नुकत्याच पाश्चात्त्य शिक्षणाची झालेली सुरुवात होती. अशा या काळामध्ये या ग्रंथालयांचे योगदान सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. या ग्रंथालयांनी या काळामध्ये शिक्षण चळवळीला मोठी चालना दिली. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्‍नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या गावोगावी ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी या कामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. ब्रह्मपुरी, राजगुरुनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. बहुतांश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर/सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (उदा. आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली.[ संदर्भ हवा ]

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकूण १२,८६१ ग्रंथालये आहेत. महाराष्ट्रामधील ७५ टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत.

कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरू झाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार आहेत. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळी शकते. २४ तास सुरू असणारी अभ्यासिकादेखील आहेत. ब्रिटिशपूर्व काळामध्ये स्थापन झालेली काही सार्वजनिक ग्रंथालय ही आज केवळ ग्रंथालय न राहता संस्कृतिक केंद्र बनलेली आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे सार्वजनिक ग्रंथालय हे होय. या ग्रंथालयांनी आपल्या सातत्यपूर्ण कार्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक मोठा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यात या ग्रंथालयाने मोठे योगदान देखील दिलेली आहे.

प्रबोधनासाठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयांची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरू व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकांकडे वाचनालयाची सूत्रे आहेत.[ संदर्भ हवा ]

सातारा जिल्ह्यातील ग्रंथालये[संपादन]

सातारा जिल्ह्यामध्ये ३९५ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. येथील ग्रंथालय चळवळ चांगलीच भरभराटीला आली असली तरी साताऱ्यातील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत.

महाराष्ट्रातील ग्रंथालय सेवक[संपादन]

महाराष्ट्रात राज्यात १२,८६१ ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत २२,६७८ ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार ३० हजार, ‘क' वर्गासाठी 96 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख ९२ हजार आणि ‘अ' वर्गासाठी दोन लाख ८८ हजार रुपये वार्षिक अनुदान देत आले आहे. हे अनुदान एक एप्रिल २०१२ पासून देण्यात येत आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा ९२६ रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून २९६४ रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांचा एकूण मासिक पगार ५९२६ रुपये असतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा ८८८९ रुपये मिळतात. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या किमान १० टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणग्यांमधून जमा करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च झाली तरी उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी पुरवावी लागते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही 'ड' वर्गातल्या सेवकाचा पगार १५०० रु. होणार. महाराष्ट्रातील निम्म्या वाचनालयांतील सेवक एवढ्याच तुटपुंज्या पगारात काम करतात. या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनही नाही.

ग्रंथालयांचे प्रकार[संपादन]

 • शैक्षणिक ग्रंथालयाची माहिती

शैक्षणिक ग्रंथालयाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. विविध कौशल्ये प्राप्त करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासात या ग्रंथालयाचे महत्त्वाचे आहे.

शैक्षणिक ग्रंथालयाची उदिष्टे :

 1. शैक्षणिक व सामाजिक घटकांच्या माहिती विषयक गरजांची पूर्तता करणे.
 2. विविधं प्रकारच्या शैक्षणिकव संदर्भ ग्रंथाचे उपार्जन करून संवर्धन करणे.
 3. विविध अभ्यासक्रमांस लागणारे वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
 4. वाचकांना द्यावयाच्या माहितीचे व संदर्भ सेवांचे नियोजन करणे.

१.शालेय ग्रंथालय : पाचवी ते दहावी या वर्गांसाठी शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना जी ग्रंथालये उपलब्ध आहेत, त्यांना शालेय ग्रंथालय असे म्हणतात. आपल्या देशात अलीकडील काळात माध्यमिक स्तरांवर शालेय ग्रंथालये दिसत असली तरी ती शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहेत. शालेय ग्रंथालये ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविण्याची कामे करतात. यामध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकांची देवघेव करणे,विशिष्ट माहिती संदर्भ पुरवणे, ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे. ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे. चर्चासत्र आयोजित करणे. नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीवा निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात.

२. महाविद्यालय ग्रंथालय : महाविद्यालयात विधार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी जे ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविद्यालय ग्रंथालय असे म्हणतात. महाविद्यालय ग्रंथालयांची कामे :

 1. . विद्यार्थी, प्राधापक यांना क्रमिक पुस्तके व इतर वाचन साहित्य पुरवणे.
 2. .ग्रंथालयात एखादे पुस्तक नसल्यास ते इतर ग्रंथालयातून आंतर देवघेवी द्वारे आणून देणे.
 3. . ग्रंथालयात आलेल्या नवीन पुस्तकांची यादी देणे.
 4. . सदर्भ ग्रंथ पुरविणे.
 5. . वाचकांना मागर्दर्शन करणे.
 6. . पुस्तकांचे तालिकीकरण व वर्गीकरण करणे.
 7. . वाचन विभाग उपलब्ध करून देणे.
 8. . विशेष दिनादिवशी ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे.
 9. . संशोधन कार्यात मदत करणे.
 10. . विद्यर्थ्यांमध्ये वाचन कौशल्ये विकसित करणे.
 11. . कारकीर्द मार्गदर्शन करणे, या संदर्भात स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देणे. सर्व ग्रंथ आणि नियतकालिके यांची माहिती पुरविणे.
 12. वृत्तपत्र कात्रणे काढून अद्यावत माहिती शिक्षक व विद्यार्थी यांना पुरविणे.
 13. ग्रंथालयाच्या उपयोगाकरिता मार्गदर्शन करणे.
 14. .संदर्भ ग्रंथाची माहिती देऊन त्यांतील मजकुराची व त्या ग्रंथाचा उपयोग कसा करावयाचा याविषयी मार्गदर्शन करणे.
 15. विविध विषयांच्या मागणीनुसार सूची तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
 16. ग्रंथ मंडळाची स्थापना करणे, व ग्रंथांवर चर्चासत्रे आयोजित करणे.

३. विद्यापीठ ग्रंथालय : विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, प्राधापक, संशोधक यांच्यासाठी विद्यापीठात असणारे ग्रंथालय म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय होय. विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविध ज्ञानशाखांतील विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांच्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालय प्रणाली होय. विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक वर्ग, संशोधन करणारे विद्यार्थी, संलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग, बहिस्थ विद्यार्थी स्थानिक नागरिक, शासकीय अधिकारी इत्यादी असतात. या ग्रंथालयांतून अभ्यासकांना विविध प्रकारच्या ग्रंथालयीन माहिती सेवा व डिजिटल वाचन साहित्याच्या साह्याने पुरविल्या जातात.

विद्यापीठ ग्रंथालयाची कामे :

 1. ग्रंथ संग्रह विकासाचे धोरण ठरविणे.
 2. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी निगडित विविध विषयांचे ग्रंथ, नियतकालिके व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
 3. आंतर ग्रंथालयीन देवाण घेवाण कार्यक्रमातून वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
 4. . संदर्भ ग्रंथाची ओळख करून देणे.
 5. . ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करणे.
 6. . विद्यार्थांना कारकीर्दविषयी मार्गदर्शन करणे.
 7. . वर्तमानपत्रांची कात्रणे काढून वाचकांना पुरवणे.
 8. . मागणीनुसार विषयवार सूची तयार करून देणे.
 9. . पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प पूर्ण करायचा असतो, या संदर्भाकरिता सूची कशी तयार करावी, वाड़्मय शोध कसा करावा, संदर्भ कसे द्यावेत व संशोधन प्रकल्पाचा आराखडा या संदर्भात मार्गदर्शन करणे.
 10. . ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे.
 11. . ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल तयार करणे, तसेच ग्रंथालयाची नियमावली व अंदाजपत्रक तयार करणे.
 12. . इंटरनेटच्या माध्यमातून विविध सेवा पुरविणे.
 13. . शिक्षक व संशोधक त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक त्या माहिती सेवा पुरविणे.
 • सार्वजनिक ग्रंथालय : समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय. ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य, देश पातळीवर कार्यरत असतात विविध प्रकारच्या सामाजिक व संयुक्त उपक्रमांद्वारे लोकशिक्षणाचे मोलाचे कार्य पार पाडले जाते.

४. सार्वजनिक ग्रंथालय : सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण, संस्कृती, माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकांमध्ये व विविध देशांमध्ये सामंजस्य निर्माण करणारी अत्यावश्यक संस्था होय. सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश, वर्ण, वर्ग, असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निरपेक्षपणे मोफत किंवा अल्प वर्गणी घेऊन उपलब्ध करून दिले जाते. अशा ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात. या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सार्वजनिक निधीतून केले जाते. ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात.

सार्वजनिक ग्रंथालयाची कामे : १ ग्रंथालय ज्या ठिकाणी आहे त्या परिसरातील वाचकांची, वड, गरज आणि त्यांचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिके व दृक्‌श्राव्य साधनांचे संकलन करणे.
२. विद्यार्थ्यांना व शिक्षकाना क्रमिक पुस्तके व संदर्भ पुरविणे.
३. संशोधक व अभ्यासक यांना अद्यावत वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
४. साक्षरता प्रसारासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करणे.
५. अनौपचारिक शिक्षणासाठी व निरंतर शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
६. स्थानिक परिसरातील वस्तू, हस्तकला इत्यादी जतन करणे.
७. समाज प्रबोधनासाठी विविध प्रकारच्या व्याख्यानमाला, परिसंवाद, नाटके, ग्रंथप्रदर्शने आयोजित करणे.
८. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे. त्यासाठी विज्ञानविषयक व्याखाने परिसंवाद इत्यादींसारखे उपक्रम आयोजित करणे.
९.बालकांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देणे व त्यांच्यासाठी लागणारे वाचन साहित्य संग्रहित करणे व त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.
१० माहिती केंद्र म्हणून काम करणे.
११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे.
१२ सार्वजनिक ग्रंथालय हे सामाजिक, शैक्षणिक व सांकृतिक कार्य करते.
१३ सर्व नागरिकांना स्वयंशिक्षणासाठी मदत करणे.

५. राष्ट्रीय ग्रंथालय : राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतर्गत प्रकाशित झालेल्या सर्व प्रकाशनांचे संकलन व जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात डिलिव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रतेक प्रकाशकाने आपल्या प्रकाशनाच्या ३ प्रती या ग्रंथालयास विनामूल्य द्याव्या/पाठवाव्या लागतात. भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. या ग्रंथालयामध्ये सर्वांना प्रवेश असतो. समाजातील सर्व घटकातील लोकांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता विनामूल्य प्रवेश दिला जातो.

राष्ट्रीय ग्रंथालयाची कामे : १. भारतातील सर्व भाषांमधील प्रकाशित झालेले सर्व ग्रंथ संग्रहित करणे.
२. राष्ट्रीय सूचीय माहितीचे केंद्र म्हणून कार्य करणे.
३ संघ तालिका म्हणून काम करणे.
४. ठरावीक कालखंडात राष्ट्रीय ग्रंथसूचीची निर्मिती करणे.
५. देशातील सर्व नागरिकांना सेवा पुरविणे.
६. शासनास वेळोवेळी लागणारी माहिती पुरविणे.
७ देशात नवीन सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यास उत्तेजन देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.
८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविध वाचन साहित्याची माहिती समाजातील घटकांपर्यत पोहचविणे.
९ हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जतन करणे.
१० इतर देशांतील राष्ट्रीय ग्रंथालयांबरोबर प्रकाशनांची देवाण घेवाण करणे.

 • ऐतिहासिक ग्रंथालये
 • व्यक्तिगत ग्रंथालये
 • लोक ग्रंथालये
 • विशेष ग्रंथालये

विशेष ग्रंथालये इतर ग्रंथालयांपेक्षा वेगळी असून त्यांच्या ग्रंथसंग्रहानुसार, वाचकास दिल्या जाणाऱ्या सेवांनुसार, आणि वाचकांच्या विविध प्रकारांनुसार या ग्रंथालयांचे प्रकार पडतात. थोडक्यात या ग्रंथालयाचे वाचक वेगळे, वाचन साहित्य वेगळे आणि सेवा वेगळ्या असतात.
१ अंध ग्रंथालये :
ज्या ग्रंथालयात अंध वाचकासाठी ब्रेल लिपीमधील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते, त्यास अंध ग्रंथालय असे म्हणतात.
२ रुग्णालय ग्रंथालये :
रुग्णालयात जे रुग्ण उपचारासाठी दाखल केले जातात आणि त्यांना जी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, त्या ग्रंथालयास रुग्णालय ग्रंथालय म्हणतात.
रुग्णालयीन ग्रंथालयामध्ये प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ. नियतकालिके इत्यादी वाचन साहित्य रुग्ण, व रुग्णाचे नातेवाईक ह्यांना वाचन सेवा तसेच डॉक्टरंना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुख्याने केले जाते.
३ कारागृहीन ग्रंथालये :
ही ग्रंथालये ज्या गुन्हेगारांना कारागृहात ठेवले जाते आणि जे शिक्षा भोगत असतात त्यांना ग्रंथ पुरवतात.
४ दैनिक ग्रंथालये :
वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या माहितीविषयक गरजा पूर्ण करण्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालये म्हणजे वर्तमान पत्राची ग्रंथालये. या ग्रंथालयांत संदर्भ ग्रंथाबरोबरच वर्तमान पत्रातील लेख, कात्रणे फाइली, संपादक व पत्रकार यांनी तयार केलेली टिपणी, पत्रके, अहवाल, शासकीय प्रकाशने व विविध छायाचित्रांचे संकलन व संग्रह करून ती योग्य वेळी उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय सर्व संदर्भ ग्रंथ ठेवले जातात.

५ संशोधन ग्रंथालये :
संशोधन ग्रंथालये म्हणजे ज्या ग्रंथालयात विशेष प्रकारचे प्रलेख असतात व व्यापक प्रमाणात संशोधन कार्य हाती घेण्याकरिता विविध सेवा पुरवल्या जातात, असे ग्रंथालय.
संशोधन ग्रंथालयाचा संबध हा संशोधन कार्याशी निगडित असतो. ज्याआधारे नवीन विषयाची, माहितीची, ज्ञानाची निर्मिती व विकास होतो. या ग्रंथालयात वाचकांमध्ये संशोधक, संशोधन करणारे विद्यार्थी यांचा समावेश असतो.
या ग्रंथालयात पुढीलप्रमाणे सेवा पुरविल्या जातातौ १.सूची तयार करणे.
२.प्रलेखन सेवा प्रदान करणे.
३.नियतकालिक लेखांचे निर्देश करणे. ४.सारसेवा पुरविणे.
५.संशोधनाबाबत अद्यावत माहिती पुरविणे.
६.संगणकीय नेटवर्क मार्फत माहितीची प्राप्ती करून देणे.

संशोधन ग्रंथालयाची कामे ":
१. ग्रंथ निवड, ग्रंथ उपार्जन, ग्रंथ व्यवस्थापन, व माहिती वितरीत करणे.
२. सारसेवा, निर्देश सेवा, आणि साहित्य शोध सेवा देणे.
३. वाचकांना उच्च दर्जाचे उपयुक्त असे वाचन साहित्य पुरविणे.
४. सार व निर्देश सेवा देणे आणि साहित्य शोध सेवा देणे.
५. विविध प्रकारच्या डेटा बेसमधून माहितीचा शोध घेऊन ती वाचकांना पुरविणे.

या शिवाय विषयवार ग्रंथालयेही असतात जसे,

 • कायदा विषयक ग्रंथालये.
 • वैद्यकीय ग्रंथालये यालाच रुग्णालयीन ग्रंथालय असे म्हणतात.

या ग्रंथालयात प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ, नियतकालिके इत्यादी साहित्य जतन करून रुग्ण, व नातेवाईक ह्यांना वाचन सेवा व डॉक्टरना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुखाने केले जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

ग्रंथालयांची सूची[संपादन]

अन्य संसाधने[संपादन]