वसंत अवसरीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

वसंत अवसरीकर (१९४०:अवसरी, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील तमाशात काम करणारे एक सोंगाडे आहेत. त्यांचे मूळ नाव वसंत कुशाबा रोकडे असून आईचे नाव हिराबाई तर आजोबांचे नाव शंकरराव अवसरीकर आहे. वसंत अवसरीकरांचे आजोबा शंकरराव आणि वडील कुशाबा हे दोघेही उत्तम ढोलकीपटू होते. काका ग्यानबा अवसरीकर हे मात्र सोंगाड्या होते. त्यांच्याबरोबर काम करून करून वसंत अवसरीकर सोंगाड्या झाले.

वसंत अवसरीकरांची आई हिराबाई घरच्या तमाशात नाचायची. शंकररावांचा तमाशा त्याकाळी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय होता; परंतु एकट्या तमाशावर भल्यामोठ्या कुटुंबाचे भागत नसल्यामुळे ते लग्नातील वाजंत्र्यांची सुपारी घेत. त्याकाळी वाजंत्र्यांनी वाद्य वाजविण्याबरोबर जमलेल्या मंडळीचे लोकरंजन करण्याचेही काम करावे लागे. वरातीच्या रात्री तर वगनाट्यासकट पूर्ण तमाशा दिवस उजाडेपर्यंत चालत असे.

या अवसरीकर (रोकडे) कुटुंबीयांची लोकनाट्यसेवा महाराष्ट्रात विशेषत: खेड, मंचर, नारायणगाव या परिसरांत खूप लोकप्रिय होती. शंकर अवसरीकर यांच्या संपूर्ण कुटुंबाने तमाशाला वाहून घेतले होते. त्यांची तिन्ही मुले संभाजी (प्रमुख भूमिका), वसंताचे वडील कुशाबा (ढोलकी) आणि गेनभाऊ (सोंगाड्या) व गुणाजी मास्तर (खलनायक) असत. तर वसंतची आई हिराबाई मुख्य नर्तकी व मुख्य स्त्रीभूमिका करीत असे.

वयाच्या सातव्या वर्षापासून वसंता घरच्या तमाशा फडात काम करू लागला. लहानपणी राजा हरिश्चंद्राचा मुलगा रोहिदास, रजवाडी वगात युवराज अशी कामे त्यांनी केली. अवसरी गावातील त्यांच्या घरात तमाशाचे सर्व साहित्य ठेवले जात होते. पण दुर्दैवाने घराला लागलेल्या आगीत हे सर्व साहित्य जळून खाक झाले. तरीही न खचता नव्या उमेदीने वसंतराव यांनी मुंबईचा रस्ता धरला.

वसंत अवसरीकरांना पेटीवादनाची खूप आवड होती. घरच्या तमाशात ते इतरांचे पाहून पाहून सरावाने पेटी वाजवायला शिकले. मुंबईत पावसाळ्याचे चार महिने त्यांचा मुक्काम लालबागच्या न्यू हनुमान थिएटरमध्ये असायचा. तिथे येऊन, तत्कालीन प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विश्वनाथ मोरे वसंतरावांना पेटीचे धडे द्यायचे. तमाशाचा मुक्काम हलला की पेटीशिक्षण बंद होई.