Jump to content

वडजाई देवी मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री वडजाई देवी मंदिर, वडजल (सातारा)

श्री वडजाई देवीचा गाभाऱ्यातील स्वयंभू जागृत तांदळा (वडजल)

वडजाई देवी

[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील श्री क्षेत्र वडजल येथील वडजाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जागृत देवता समजली जाणारी ही देवी प्रामुख्याने सरदार काटकर तसेच अनेक घराण्यांची कुलदेवी आहे. ग्रामीण किंवा स्थानिक बोलीभाषेत "वडजुबाई" नावाने प्रसिद्ध असलेल्या वडजाई मातेचे हे स्वयंभू आणि जागृत स्थान असल्याने अनेक भाविक भक्त नवसपूर्ती व आपल्या कुळानुसार आपले कुलाचार विधी करतात.

मंदिर परिसर

[संपादन]

मंदिर आवारात दर्शनी कमान असून दोन दीपमाळा आहेत. कमान ओलांडून थोड्या पायऱ्या उतरल्यास देवीचे छोटेखानी परंतु रेखीव मंदिर नजरेस पडते. मंदिर सभागृहात उजव्या बाजूस शिवपिंड व समोर नंदी महाराज विराजमान आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर शेंदूरचर्चित गणेशांची पाषाणात कोरलेली प्रतिमा दिसते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताच वडजाई देवीचा तांदळा दृष्टीस पडतो. शेंदूरविलेपित असलेला वडजाई देवीचा तांदळा पाहून भाविक नतमस्तक होतात. उत्सवकाळात अथवा विशेष प्रसंगी देवीच्या तांदळ्यावर चांदीचा मुखवटा चढवला जातो. सुहासिनी महिला देवीची ओटी भरतात. पिठामीठाने देवीची परडी भरतात. मंदिरास प्रदक्षिणा आवार असून मंदिराच्या भिंतीवर कोरलेली शिल्पे आढळतात.

यात्रा/उत्सव

[संपादन]

देवीचा वार्षिक उत्सव आणि नवरात्र उत्सव मोठया जल्लोषात पार पाडला जातो. "वडजाईच्या नावानं चांगभलं! वडजुबाईच्या नावानं चांगभलं!" या गजरात सारा आसमंत दुमदुमून जातो. देवीची पालखी छबिना साऱ्या गावातून मिरवला जातो. ढोल, गजी नृत्य अशा अनेक पारंपरिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल श्री क्षेत्र वडजल येथे पाहावयास मिळते.  दर मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला बऱ्याच भाविकांची देवी दर्शनासाठी मांदियाळी आढळून येते.