श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिज्जत गृह उद्योग या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड ही भारतातील महिलांची सहकारी संस्था आहे. ही संस्था पापड, खाद्यपदार्थ व इतर गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करते. याद्वारे ही संस्था स्त्रीयांना रोजगार मिळवून देते व स्वबळावर उभे राहण्याची संधी देते.

या संस्थेची स्थापना १९५९मध्ये मुंबईमध्ये सात स्त्रीयांनी ८० रुपयांच्या भांडवलासह केली होती. २०१०मध्ये या संस्थेची उलाढाल ६.५ अब्ज रुपये होती. भारतात या संस्थेच्या ८१ शाखा असून त्याद्वारे अंदाजे ४३,००० स्त्रीयांना रोजगार मिळतो.

इतिहास[संपादन]

१९५९मध्ये मुंबईच्या गिरगाव भागातील लोहाणा निवास या पाच इमारतींमधून राहणाऱ्या जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारणदास कुंडलिया, बानुबेन एन. तन्ना, लागुबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन विठलाणी आणि अन्य एक स्त्री अशा सात महिलांनी छगनलाल करमसी पारेख या सर्व्हंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या समाजसेवकाकडून ८० रुपये उसने घेतले व बंद पडत आलेल्या पापड तयार करणारी कंपनी चालवायला घेतली. पहिल्या दिवशी त्यांनी चार पाकिटे पापड बनविले.