लता जौहर
लता जौहर ऊर्फ स्नेहलता जौहर- (जन्म - १० एप्रिल १९३२, मृत्यू - ११ ऑक्टोबर २०२१) शिक्षिका, बहुभाषाविद, सतार-वादक म्हणून परिचित आहेत. त्यांना बंगाली, तमिळ, हिंदी, पंजाबी या भाषांसहित एकूण तेरा भाषा अवगत होत्या. [१]
जीवन
[संपादन]सुरेंद्रनाथ जौहर आणि दयावती जौहर यांची ही ज्येष्ठ कन्या. सुरेंद्रनाथ जौहर यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. ते उद्योजक होते. 'एस.एन.सुंदरसन आणि कंपनी' या नावाच्या कंपनीची स्थापना त्यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबात अनिल, नरेंद्र, जितेंद्र (मुले), तारा, चित्रा (मुली) हे इतर सदस्य होते. प्रथमत: १९४२ साली लता त्यांच्या आई-वडिलांसोबत पाँडिचेरी येथे गेल्या. लता यांचे शिक्षण सर गंगाराम हिंदू गर्ल्स हायस्कूल, लाहोर येथे झाले.
शिक्षण व अध्यापन
[संपादन]१५ जानेवारी १९४५ मध्ये श्रीमाताजींनी मुला-मुलींसाठी वसतिगृहाची स्थापना केली. त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी लता या होत्या.[१] श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथील शिक्षणाचे माध्यम फ्रेंच होते. तेव्हा बेंजामिन सर आणि शांती दोशी यांच्याकडून लता फ्रेंच शिकल्या. आश्रमवासी असलेल्या मेधानंद यांच्याकडून लता यांनी जर्मन भाषेचे शिक्षण घेतले. आश्रमातील विख्यात संगीतकार सुनील भट्टाचार्य यांच्याकडून लता यांनी सतारीचे प्रशिक्षण घेतले. लता या आश्रमाच्या हार्पेगान या कार्यशाळेत काम करत असत. शारीरिक शिक्षण विभागात देखील त्यांचा सहभाग असे. लता यांनी आश्रमातील इटालियन अभियंता अल्बर्टो ग्रासी यांच्याकडून इटालियन भाषेचे शिक्षण घेतले. लता यांना तेरा भाषा येत होत्या. वयाच्या सत्तरीमध्ये त्यांनी रशियन भाषा शिकण्यास आरंभ केला.[२]
१९५८ मध्ये त्यांनी श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे गणिताच्या अध्यापनास सुरुवात केली. पुढे त्या शास्त्र आणि इंग्रजी या विषयांचेही अध्यापन करू लागल्या. लता यांना १९६० मध्ये पॅरिस येथे शिक्षक-प्रशिक्षणाचा कोर्स करण्यासाठी, फ्रेंच शासनाने दिलेली शिष्यवृत्ती मिळाली. नऊ महिन्यांमध्ये हा कोर्स पूर्ण करून लता जर्मनी येथे गेल्या आणि तेथे त्यांनी नाट्यशास्त्राचा एक कोर्स केला. पुढे त्यांनी इटली, ग्रीस, इजिप्त, यु.ए.ई, साउथ आफ्रिका, तर्की, रशिया इत्यादी देशांना भेटी दिल्या. कालांतराने लता यांनी फ्रेंच, जर्मन, स्पनिश व पोर्तुगाली या भाषा शिकविण्यास सुरुवात केली.[१]
अध्यापनाव्यतिरिक्त त्या आश्रमाच्या बाटिक विभागात तीन दशके कार्यरत होत्या.
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Lata Jauhar: In Memoriam by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2021-11-16. 2025-03-04 रोजी पाहिले.
- ^ "Moscow Sri Aurobindo Center of Integral Yoga - News - Meeting with Tara Jauhar". www.purna-yoga.ru. 2025-03-05 रोजी पाहिले.