रेशीमकाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेशीमकाम : कापडावर रेशीमधाग्यांनी करण्यात येणारे विणकाम (सिल्क बीव्हिंग). रेशमाचे उत्पादन करण्याचे तंत्र शोधून काढण्याचे श्रेय चीन देशाला निर्विवादपणे दिले जाते. चीनमध्ये इ. स. पू. २६४० च्या सुमारास चिनी सम्राट हुआंग-ती याची पत्नी सी लिंग शी हिने रेशमाची पैदास करण्याचे तंत्र शोधून काढले. रेशीमधागा चिवट, मृदू व तकाकीयुक्त असल्यामुळे त्याच्यापासून विणलेली वस्त्रे अत्यंत मृदू, मुलायम पोताची, टिकाऊ व शानदार भासणारी असत. या वस्त्रांचे सुंदर अभिकल्प व त्यांमधील मोहक रंगसंगती यांमुळे त्यांनी प्राचीन काळी जगाचे लक्ष वेधून घेतले.

पौर्वात्य रेशीमकाम : इ. स. पू. पहिल्या शतकापासून या वस्त्रांची निर्यात पौर्वात्य तसेच पाश्चात्त्य देशांत उंटांच्या काफिल्यांकरवी सुरू झाली. सिरियन व्यापाऱ्यांचे तांडे असे काफिले घेऊन पामीरच्या खिंडीतून पार्थियामार्गे सिरियात येत. हा मार्ग अवघड व धोकादायक असून रेशीममार्ग (सिल्क-रूट) म्हणून प्राचीन काळी प्रसिद्ध होता. ही वस्त्रे सिरियातून पूर्वेकडील तसेच पश्चिमेकडील विविध देशांत पाठविली जात.  

चीन : चिनी लोक ‘सेरीस’ या नावाने प्राचीन काळी ओळखले जात असल्याने रेशमी किड्यांचे संवर्धन ‘सेरिकल्चर’ या नावाने संबोधले जाऊ लागले. भारतात रेशमी वस्त्रे ‘चीनांशुक’ म्हणून ओळखली जात.

मंगोलिया, रशिया, सिरिया इ. देशांत तसेच रेशीममार्गावरील अनेक कबरींत अगणित चिनी रेशमी वस्त्रांचे नमुने उत्खननात मिळाले. ब्रिटिश हंगेरियन पुरातत्त्ववेत्ता व भूगोलज्ञ सर ऑरेल स्टेन (१८६२-१९४३) या संशोधकाने या बाबतीत केलेले संशोधन महत्त्वपूर्ण आहे. या तपशिलांतून तसेच अरबी इतिहासकार अल् मसूदी (? – ९५६) व जगप्रसिद्ध प्रवासी ⇨मार्को पोलो (१२५४-१३२४) यांच्या वर्णनांवरूनही चिनी वस्त्रांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

रेशमी धाग्याच्या निर्मितीचे रहस्य अनेक वर्षे गुप्त ठेवण्याचे कसोशीचे प्रयत्‍न चिनी लोकांनी केले परंतु इ. स. पहिल्या शतकात एका चिनी राजकन्येचा खोतानच्या राजपुत्राशी विवाह झाला तेव्हा खोतानला जाताना तिने आपल्या केशभूषेत रेशमाच्या किड्यांची अंडी लपवून नेली व तेथे वस्त्रोत्पादन सुरू केले. यानंतर हे तंत्र इराण, भारत, जपान इ. देशांत, बायझंटिन साम्राज्यात तसेच पुढे जगभर पसरले.

चिनी वस्त्रे सुंदर, सफाईदार व तलम पोताची असत. उन्हाळ्यात वापरण्यासाठी विणला जाणारा ‘पा-ओ’ अंगरखा तर अत्यंत तलम व दोन औंसांपेक्षा (५६ ग्रॅम ) कमी वजनाचा असे. सुंदर, तलम पोताबरोबरच मोहक आकृतिबंध व सुखद रंगसंगती यांमुळे चिनी वस्त्रे लोकप्रिय झाली.

हान साम्राज्यकाळात (इ. स. पू. २०२ ते इ. स. ९) रेशमी कस्सू वस्त्रे वा चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) व भरतकामाची वस्त्रे तसेच प्राणी व मानवाकृती यांचे अलंकरण असलेली दमास्क वस्त्रे (ही वस्त्रे प्रथम दमास्कसमध्ये तयार करण्यात आल्याने त्यांना हे नाव पडले), गॉझ म्हणून ओळखली जाणारी जाळीदार वस्त्रे तयार होऊ लागली. यांवरील नक्षींत भौमितिक आकृतिबंध तसेच घोडे, ड्रॅगन यांचे लांबट आकार गाठ, ढग, पाने-फुले, घोडेस्वार, पंखांचे घोडे, प्राण्यांची झुंज असे विविध आकार आढळतात.

थांग साम्राज्यकाळात (६१८-९०६) चीनचे व्यापारी संबंध भारत व इराणसारख्या दूरवरच्या देशांत पसरले. इराणी अलंकरण व भारतीय बौद्ध धर्म यांचा प्रभाव चीनमध्ये वाढला. त्यामुळे इराणी मंडलाकार नक्षी, शिकार करणारे घोडेस्वार तसेच बुद्ध व बोधिसत्वांच्या आकृती वस्त्रांमध्ये दिसू लागल्या. इतर अलंकरणांत शंभर फुलांतून वर येणारा ड्रॅगन, संगीताची वाद्ये, उडणारी बदके, मोर इ. आकार दिसू लागले.

सुंग काळात (९६०-१२७९) रेशमी, किनखाबी, मखमली व कस्सू वस्त्रे यांची निर्मिती होऊ लागली. ही कस्सू वस्त्रे रेशमी ताणा आणि रेशमाबरोबर जरीचा धागा बाण्यासाठी वापरून घट्ट विणीने विणली जात व अलंकरणही सुंदर असे. दोन्ही दृष्टींनी ती उच्च दर्जाची मानली जात. प्रसिद्ध फ्रेंच गोबेलिन वस्त्रेही त्यांच्या तुलनेत फिकी पडतील, इतकी ती गच्च विणीची असून त्यांची जर शेकडो वर्षांनंतरही तशीच झगझगीत राहिल्याचे आढळते.

मंगोल सम्राटांच्या काळात (१२६०-१३६८) चिनी सम्राटांचे संबंध इस्लामी सम्राटांबरोबर सलोख्याचे असल्याने इराणी  व तुर्की शैलींतील अलंकृत वस्त्रे आणि चिनी शैलीतील अलंकरणयुक्त वस्त्रे यांची देवाणघेवाण झालेली आढळते. चिनी वस्त्रांवर अरबी लिपीतील अक्षरे आली, तसेच दमास्क वस्त्रांचा प्रभाव पडला, तर इस्लामी वस्त्रांवर सर्वत्र स्वतंत्र, सुटे अभिकल्प दिसू लागले. या काळात चित्रविचित्र प्राण्यांचे आकारही नक्षीत आले.

चीनमध्ये मांचू राजवटीत (१६४४-१९१२) रुजाग्याचे गालिचे, मखमली व भरतकामाची वस्त्रेही विशेष सुंदर शैलीत विणली गेली. चिनी स्त्रिया सुंदर भरतकामात निपुण होत्या विशेषतः, शांघायमधील ‘कू’ घराण्यातील स्त्रिया भरतकामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या भरतकामात निसर्गातील पाने, फुले, झाडे, पक्षी यांचे आल्हाददायक आकार असत. चिनी वस्त्रांवरील नक्षीत ड्रॅगन, चंद्र, सूर्य, तारे, लाटा, ढग इत्यादींच्या आकारांचा प्रतीकात्मक वापर केला गेला.


इराण : इराणमध्ये तिसऱ्या शतकात सॅसॅनिडी वंशाच्या राजवटीत दुसऱ्या शापुरने सिरिया व मेसोपोटेमिया येथील कुशल विणकर आणून रेशमी वस्त्रांच्या उत्पादनास चालना दिली. चीनमधून आणलेले कच्चे रेशीम यासाठी वापरले जाई. पर्सेपलिसजवळील नाक-ई-बोस्तान येथील खडकावर कोरलेल्या उत्थित शिल्पात खुस्त्रू परवीझ व त्याच्या अधिकाऱ्यांच्या कपड्यांवर कोरलेले तिसांहून अधिक अभिकल्प सॅसॅनियन अलंकरणाची कल्पना देतात. यांत चौरस वा मंडलयुक्त आकारात पक्षी, प्राणी असून त्यांपैकी काहींच्या गळ्यांत अगर पायांत फडफडणाऱ्या फिती आढळतात. स्वतः खुस्त्रूच्या तुमानीवर प्रसिद्ध सॅसॅनियन ‘सेनमूर्व’ प्राणी दिसतो. हा प्राणी मोराचा पिसारा, गरुडाचे पंख व पुढचा अर्धा भाग आणि सिंहाचे पंजे अशा वैचित्र्यपूर्ण मिश्रणाने बनविण्यात येऊन सॅसॅनियन राजघराण्याचे प्रतीकचिन्ह म्हणून वापरला गेला.

सॅसॅनियन वस्त्रांवरील संकल्पनांत अंतराअंतरावर असलेले स्वतंत्र अभिकल्प व पाठीमागील एकरंगी पार्श्वभूमी हे वैशिष्ट्य आढळते. हे बुट्टे तिरप्या रेषेत रचना करून विणले जात. इतर कबरींत सापडलेल्या वस्त्रांतही अनेक चित्रविचित्र पशुपक्ष्यांचे आकार, मानवाकृती मुखवटे, पंखांचे घोडे, बकरे इ. आकार मोत्याप्रमाणे ठिपके असलेल्या रुंद पट्ट्यांच्या वर्तुळाकारात विणलेले आढळतात. अलंकरणात परस्परसन्मुख पक्ष्यांची जोडीही दिसते.

या वस्त्रांत टसरप्रमाणे वीण वापरून रेशमाची तकाकी असलेल्या धाग्याचा भाग पृष्ठभागावर येईल, अशा पद्धतीने विणल्यामुळे सर्व पृष्ठभागाला एक तकाकी दिसते. ही पद्धत अकराव्या शतकापर्यंत, विशेषतः इराणी रेशमी वस्त्रांच्या विणीत वापरली गेली.

या काळातील इराणी वस्त्रे पाश्चात्त्य देशांतील चर्चमधील संग्रहालयांतही आढळतात. यांत वरील अभिकल्पांखेरीज अनेकरंगी किनखाबी विणीत शिकारीचे देखावे, जीवनवृक्ष, सुरूची झाडे, दोन तोंडांचा गरुड (सामर्थ्याचे प्रतीक) व तीन रत्‍नांचा हार तोंडात धरलेला पक्षी (सम्राज्ञीचे प्रतीक) असे आकार आढळतात. या आकारांखेरीज डाळिंबाचा आलंकारिक आकारही नक्षीत दिसतो. हाच पुढे पाश्चात्त्य देशांत व इस्लामी वस्त्रकलेत आवडीने वापरला गेला.

इस्लामी राजवटीत इराणमध्ये धार्मिक पुस्तकांतील चित्रे तसेच पानाफुलांच्या अलंकरणात चित्रशैलीचा प्रभाव दिसू लागला. अरबी लिपीच्या अक्षरांचाही अंतर्भाव वस्त्रातील अलंकरणात झाला. या काळातील किनखाबी वस्त्रांत जरीच्या कापडाच्या पार्श्वभूमीवर मखमली विणीत उठावदार दिसणाऱ्या आकृती अत्यंत मोहक, झगझगीत रंगांत विणल्या गेल्या. दुसरे महत्त्वाचे तंत्र म्हणजे, दुहेरी विणीचे कापड विणले गेले. यात जरीच्या धाग्याबरोबरच तिहेरी वीण वापरून विणलेले वस्त्र याखेरीज वेगवेगळ्या विणींचा एकाच कापडात वापर करून विणलेली ‘लंपास’ वस्त्रेही प्रसिद्धीस आली. इराणी वस्त्रांच्या रंगसंगतीत पिवळट हिरवा, गडद हिरवा, करडा, झगझगीत निळा, लाल असे अनेक रंग वापरले गेले. नक्षीत गडद निळ्यावर पांढरा व करडा, लालभडक पार्श्वभूमीवर सोनेरी अशा सुंदर रचना आढळतात. गडद जांभळा रंग राजवस्त्रांसाठी वापरला गेला.

बायझंटिन : बायझंटिन साम्राज्यकाळात (इ. स. ३३० ते १४५३) रेशमी कापड सोन्याइतके मोलाचे मानले जाई. प्रसिद्ध बायझंटिन सम्राट पहिला जस्टिनिअन (४८३-५६५) याने तिबेटी साधूंना मोठे आमिष दाखवून त्यांच्याकरवी रेशमी किड्यांची अंडी आणविली व रेशमी वस्त्रांचे उत्पादन कॉन्स्टॅंटिनोपल येथे सुरू केले. राजांच्या कार्यशाळांत सुरुवातीला इराणी व सिरियन विणकर हे उत्पादन करू लागले. साहजिकच इराणी अभिकल्प व बायझंटिन चित्रशैलीतील ख्रिस्ती अलंकरण, उभट उंच आकार व ठळक बाह्यरेषा यांचा मिलाफ या वस्त्रांवरील नक्षीत झाला. पंख असलेले सिंह, इतर पशू व चित्रविचित्र आकारांचे प्राणी, पानाफुलांचे आलंकारिक आकार, भावदर्शी टपोरे डोळे असलेले चेहरे व उंच मानवाकृती हे आकार दिसू लागले. सुंदर वीण व झगझगीत रंगसंगती यांमुळे ही वस्त्रे पाश्चात्य देशांत लोकप्रिय झाली. ईजिप्शियन कबरी व पश्चिमेकडील रोमन साम्राज्यातील अनेक चर्चचे संग्रह यांत बायझंटिन वस्त्रांचे जतन केलेले नमुने आढळले आहेत. शार्लमेन राजाच्या कबरीतही अशी वस्त्रे आढळली आहेत.

बायझंटिन वस्त्रांवरील आकारांत पानाफुलांचे पौर्वात्य अलंकरण, सपाट रंग व ग्रीक पद्धतींच्या पिळदार देहाच्या मानवाकृती यांचा मिलाफ झाला. याचे सुंदर उदाहरण प्रसिद्ध सॅमसन सिल्क आणि क्वाड्रिगा सिल्क या उल्लेखनीय वस्त्रांत दिसते. रंगसंगतीत लाल अगर जांभळ्या गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी, पिवळा, काळा, पांढरा वगैरे रंगांचे अलंकरण नक्षीत दिसते. झगझगीत रंगसंगती, सुसंवादी रचना आणि कलात्मक आकार हे या वस्त्रांचे वैशिष्ट्य मानले गेले.

इस्लाम काळ : इस्लामी वर्चस्वाचा काळ वस्त्रकलेत महत्त्वाचा ठरला अरबी लिपीमधील गोल अक्षरांच्या नक्श शैलीचे व कोनात्मक अक्षरांच्या क्यूफिक शैलीचे सुलेखन हे मृत्पात्री व अन्य कारागिरीच्या वस्तूंप्रमाणेच वस्त्रांवरील अलंकरणातही दिसू लागले. दुसरी गोष्ट म्हणजे, मानवाकृती काढण्यास मनाई असल्याने पानाफुलांची व भौमितिक आकारांची नक्षी प्राचुर्याने दिसू लागली.

इराकमधील बगदाद शहरातील कुशल विणकरांचे व पशुपक्ष्यांच्या सुंदर नक्षीने त्यांनी विणलेल्या वस्त्रांचे कौतुक प्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो याने केले आहे. ईजिप्तमध्ये इस्लामी राजवटीत अरबी सुभाषिते अलंकरणात आली. ही अक्षरे विणलेली वस्त्रे ‘तिराझ’ वस्त्रे या नावाने ओळखली जात. अशा कापडात चंदेरी व सोनेरी धागाही वापरला जाऊ लागला. नक्षीसाठी लोकरीच्या धाग्याऐवजी रेशमी धागा वापरण्याची पद्धत फातिमी खिलाफतीच्या काळात (९०८-११७१) ईजिप्तमध्ये आल्याबरोबर वस्त्रांवरील आकृतिबंधांत सूक्ष्म तपशील व वक्राकार यांना प्राधान्य मिळाले. त्यामुळे आकार अधिक नाजुक दिसू लागले. इस्लामी काळातील ईजिप्तमधील वस्त्रे ठसठशीत नक्षीची व विरोधी रंगच्छटांची होऊ लागली.