रा.भि. जोशी
रामचंद्र भिकाजी जोशी | |
---|---|
टोपणनाव | रा.भि. जोशी |
जन्म |
१० जुलै इ.स. १९०३ हैदराबाद |
मृत्यू |
६ नोव्हेंबर इ.स. १९९१ मुंबई |
शिक्षण | पदव्युत्तर (इंग्रजी व मराठी) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | शिक्षण, मराठी साहित्य |
भाषा | मराठी, इंग्रजी, उर्दू |
साहित्य प्रकार | प्रवासवर्णन, कथा, अनुवाद, व्यक्तिचित्रे |
प्रसिद्ध साहित्यकृती | वाटचाल, घाटशिळेवरि उभी |
वडील | भिकाजी गोपाळ जोशी |
आई | जानकीबाई जोशी |
पत्नी | सुधा जोशी |
अपत्ये | नीलिमा भावे |
रामचंद्र भिकाजी जोशी (जन्म : १० जुलै १९०३; - ६ नोव्हेंबर १९९१) हे एक मराठी लेखक होते.
जीवनकार्य
[संपादन]जोशी यांचा जन्म १० जुलै, १९०३ रोजी हैदराबाद येथे झाला. १९२१ साली ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८२१-२३ या काळात अमरावतीला डेप्युटी कमिशनर कार्यालयात त्यांनी कारकुनी केली. १९२३मध्ये त्यांनी इंदूरच्या होळकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. कलकत्त्याच्या संस्कृत असोसिएशनची काव्यतीर्थ परीक्षा ते १९२५ साली उत्तीर्ण झाले. तसेच १९२७मध्ये अलाहाबाद विद्यापीठाची पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर नोकरी व पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले.[१]
इ.स. १९२८ ते १९३० याकाळात दीर्घ आजारामुळे ते त्रस्त होते. पण पुन्हा इ.स. १९३० ते ३१ मध्ये गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तर इ.स. १९३१ ते ३२ या काळात ते विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. इ.स. १९३२ मध्ये काशी साठे (विवाहानंतर सुधा जोशी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर इ.स. १९३२ ते १९३४ याकाळात ग्वाल्हेर परिसरातील एका छोट्या संस्थानाच्या राजकुमारांचे खाजगी शिक्षक म्हणून त्यांनी काम झाले. १९३५ साली मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर इंग्रजी व मराठी विषयाची पदवी त्यांनी संपादन केली. १९३५-३६ याकाळात ते पुन्हा पार्ले टिळक विद्यालयात शिक्षकी करू लागले. इ.स. १९४० मध्ये ऑल इंडिया रेडिओ दिल्ली येथे वृत्तविभागात अनुवादक व निवेदक म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यामुळे त्यांनी आपले बिऱ्हाड दिल्लीला हलवले. इ.स. १९४४ पर्यंत ते दिल्लीतच वास्तव्यास होते. इ.स. १९४४ ते १९४६ याकाळात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस प्रकाशनाच्या मुंबईत प्रवासी प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाले. इ.स. १९४६ ते ४७ कर्नाटक प्रकाशन संस्थेचे ते प्रवासी प्रतिनिधी होते.[१]
इ.स. १९४७ मध्ये मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये रा.भि. जोशी प्राध्यापक म्हणून काम करू लागले. इ.स. १९६१ पर्यंत ते याच महाविद्यालयात कार्यरत होते. इ.स. १९६१-१९६४ याकाळात ते महाड येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. या महाविद्यालयाचे ते पहिले प्राचार्य होते. इ.स. १९६४ ते १९६८पर्यंत ते मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापक होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करून १९६८साली ते सेवानिवृत्त झाले.[२]
इ.स. १९६८ ते १९७० याकाळात जोशी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाचे संचालक होते. इ.स. १९६८ मध्ये पार्ले येथे भरलेल्या मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. इ.स. १९७१-१९७३ मध्ये ते इंडियन सेक्युलर सोसायटीच्या एका प्रकल्पावर ते निदेशक होते. इ.स. १९७३मध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक जबाबदाऱ्यांमधून ते निवृत्त झाले. त्यानंतर ते पूर्णवेळ लिखाण करत असत.[३]
२९ सप्टेंबर १९९१ रोजी रा.भि. जोशी यांच्या पत्नी सुधा जोशी यांचे निधन झाले. व त्याच वर्षी ६ नोव्हेंबर १९९१ रोजी रा.भि. जोशी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. नीलिमा भावे ही जोशींची मुलगी होय.[३]
जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
कांचेचे कवच | कथासंग्रह | अभिनव प्रकाशन | १९९४ |
वाटचाल | प्रवासवर्णन | मौज प्रकाशन | १९६१ |
उथव | प्रवासवर्णन | मौज प्रकाशन | १९७८ |
घाटशिळेवरि उभी | प्रवासवर्णन | अश्वमेध प्रकाशन | १९८४ |
स्वर्गनगरी | प्रवासवर्णन (बाल साहित्य) | प्रकाशन | १९८६ |
साठवणी | आत्मपर | मौज प्रकाशन | १९७९ |
सोन्याचा उंबरठा | व्यक्तिचित्रण | अश्वमेध प्रकाशन | १९८६ |
एकत्र गुंफून जीवितधागे | ललित | अश्वमेध प्रकाशन | १९९२ |
दीडवितीची दुनिया | ललित | मौज प्रकाशन | २००३ |
प्रदक्षिणा | ललित | मौज प्रकाशन | २००५ |
झम्मन आणि इतर कथा | कथा | केशव भिकाजी ढवळे प्रकाशन | १९५३ |
साहित्य संवाद | समीक्षा | इनामदार बंधू प्रकाशन | १९६१ |
हरी नारायण आपटे (इंग्रजी) | चरित्र | साहित्य अकादमी | १९७८ |
वाताहत: कादंबरी (उर्दूमधून अनुवाद) कृष्णचंद्र(मूळ लेखक) | अनुवाद | अभिनव प्रकाशन | १९४८ |
मिलाद शरीफ कथा (उर्दूमधून अनुवाद) | अनुवाद | व्हीनस प्रकाशन | १९५८ |
अनोळखी वाटा (विविध उर्दू लेखिकांच्या निवडक कथा) | अनुवाद | इनामदार बंधू प्रकाशन | १९६० |
अनुवादित उर्दू कथा | अनुवाद | महाराष्ट्र उर्दू अकादमी | १९९७ |
पोएट्रीज अँड सायन्सस: (इंग्रजीतून भाषांतर) काव्ये आणि विज्ञान | भाषांतर | महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ | |
(ऑर्ट अँड मॅन बा. सी. मर्ढेकर) (इंग्रजीतून भाषांतर) कला आणि मानव | भाषांतर | मौज प्रकाशन | १९९१ |
आधुनिक मराठी गद्य | संपादित | व्हीनस प्रकाशन | १९५३ |
जीवनाचे झरे (संपादन- नीलिमा भावे) | धर्मविषयक लेख | लोकवाङ्मयगृह | - |
निवडक रा.भि. जोशी (संपादन- नीलिमा भावे) | धर्मविषयक लेख | साहित्य अकादमी, नवी दिल्ली | - |
संदर्भ
[संपादन]संदर्भसूची
[संपादन]- जोशी, रा.भि. घाटशिळेवरि उभी.