Jump to content

राय बागन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रायबागन
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSavitri संपादन
आडनावDeshmukh संपादन
मृत्यू तारीख1660 संपादन
Significant personमुघल साम्राज्य संपादन
व्यवसाययोद्धा संपादन

सावित्रीबाई देशमुख (मृत्यू :१६६० च्या दशकात), उर्फ रायबागन (संस्कृत - राजव्याघ्रि; इंग्लिश :रॉयल टायग्रेस), ही सम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीतील एक मराठी महिला मुघल सेनापती होती.[] ती दख्खनमधील माहूर येथील मुघल सरदार राजे उद्धवजी रामजी उर्फ उदाजीराम उर्फ राजे उदारम यांची विधवा होती. सामुगडच्या लढाईत तिच्या मुलाच्या मृत्युनंतर तिने तिच्या पतीच्या प्रदेशाचा कारभार हाती घेतला. तिचा मुलगा जगजीवन औरंगजेबाकरता लढत होता, तेव्हा हरचंद रायने त्याच्या प्रदेशावर हल्ला केला. कारभार हाती आल्यावर तिने हरचंद रायाचा पराभव करून ठार मारले. तिच्या धाडस आणि शौर्यासाठी, औरंगजेबाने तिला 'राय बागन' पदवी बहाल केली.[][] ती मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध शाहिस्तेखानाच्या मोहिमेत सहभागी झाली होती.[]

राजे उदाराम यांचे कुटुंब

[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा राजे लखुजी जाधव यांचे जवळचे सहाय्यक राजे उद्धवजी रामजी ऊर्फ राजे उदाराम ऊर्फ राजे उदाजी राम हे मराठा योद्ध्यांच्या पहिल्या फळीतील होते, त्यांनी गनिमी युद्धात प्रशिक्षण घेतले होते. सुरुवातीला त्यांनी मलिक अंबर सोबत काम केले. नंतर, मलिक अंबरशी मतभेद झाल्यामुळे, अंबरने त्यांच्यावर हल्ला केला. यातून सावरून ते मुघल सैन्यात सामील झाले.[] मुघल आणि निजामशाही सैन्यात झालेल्या भटवाडीच्या लढाईत ते मुघल सैन्याचा भाग होते. आदिलाबादच्या कारकुनाला उद्देशून ७ नोव्हेंबर १६२४ रोजी लिहिलेल्या पत्रात, त्यांना "महाराजा उदाजी राम" असे संबोधले गेलेले आहे.[] १४ डिसेंबर १६३१ रोजीच्या महाजननाम्यातही हेच शीर्षक दिसते.[] या कार्यवाहीचे अध्यक्ष शहाजहान होते. मासिर उल उमर म्हणतात, "जरी उदाजी राम हे कपट आणि कट रचण्यासाठी कुप्रसिद्ध होते, तरी ते त्यांच्या क्षमतेसाठी आणि उदारतेसाठी देखील प्रसिद्ध होते. दानधर्मात ते कधीही कमी पडले नाहीत आणि या बाबतीत ते दख्खनच्या अधिकाऱ्यात अग्रेसर होते."[] २८ मार्च १६३३ ते ६ एप्रिल १६३३ दरम्यान दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्याच्या वेढा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युनंतर, त्यांचा कोवळा मुलगा जगजीवनराव याला लगेचच त्यांच्या वडिलांचा मनसब आणि "उदाजी राम" ही पदवी देण्यात आली.[]

१९३७ मध्ये जगजीवन वयात आल्यावर त्यांनी जागिरीचा कारभार पाहणे सुरू केला.[१०] तोपर्यंत, रायबागन कुटुंबाच्या जागीरचे कामकाज सांभाळत होत्या. मासिर उल उमर म्हणतात, "राय बागीन, ज्यांनी त्यांच्या (उदाजी राम) मृत्यूनंतर जमीनदारीचे कामकाज कुशलतेने सांभाळले. त्यांच्या पदरी कुशल नोकर असल्याने, उदाजी रामच्या मृत्यूनंतर, काळाच्या गरजेनुसार आणि त्यांच्या माणसांना सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी, सेनापतीने, तिच्या मुलासाठी, त्याच्या लहान वयातही, २००० घोडेस्वारांसह ३,००० सैनिकाचा दर्जा प्रस्तावित केला आणि त्याला 'उदाजी राम' ही पदवी मिळवून दिली." जग जीवनचा विवाह लक्ष्मीबाई नावाच्या महिलेशी झाला होता, ज्याला परगणा दौलताबादमध्ये जागीर देण्यात आली होती. १९५० मध्ये भारतीय संविधानाद्वारे पदव्या रद्द होईपर्यंत ही पदवी उदाजी रामच्या सर्व वंशजांकडे राहिली.[११]

सामुगडची लढाई

[संपादन]

मासिर उल उमर म्हणतात, "जेव्हा तो (जग जीवन) वयाने समजूतदार झाला तेव्हा त्याला फारसी गद्य, कविता आणि सुलेखनाची पूर्ण ओळख झाली. त्याने दख्खनच्या पद्धतींचाही त्याग केला आणि वरच्या (उत्तर) भारतातील अधिकाऱ्यांसारखे जीवन जगले. तो सन्मानाने आणि प्रतिष्ठेने वागला आणि माहूरची जहागीर राखली."[१२] १६५८ मध्ये, राजकुमार औरंगजेबने त्याचे वडील शाहजहान यांना पदच्युत करून कैद केले. सत्तेसाठी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह यांच्यात वैर निर्माण झाले. मुघल साम्राज्य दोन गटात विभागले गेले. एका गटाचे नेतृत्व औरंगजेब करत होता तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व दाराने केले. औरंगजेब दख्खनचा सुभेदार असल्याने, दख्खनमधील मनसबदारांनी त्याची बाजू घेतली. या दोघात आग्र्याजवळील सामुगड येथे निर्णायक लढाई झाली. या लढाईला सामुगडची लढाई म्हणून ओळखले जाते. २८ मे १६५८ रोजी, महाराजा उदाजी राम यांचे पुत्र जगजीवन राव, औरंगजेबसोबत लढताना मरण पावले. राजे उदारमांच्या कुटुंबाच्या नोंदींमध्ये, शहाजहानने जगजीवन राव यांना उद्देशून लिहिलेले एक पत्र सापडले होते, जे दर्शविते की कुटुंबाला हरचंद रायांकडून वैयक्तिकरित्या विनाशाची धमकी देण्यात आली होती. शहाजहानने जगजीवन राव यांना त्यांच्यासमोर उपस्थित राहण्यास सांगितले. [१३] युद्ध सुरू झाल्यानंतर, जगजीवन राव यांनी औरंगजेबाची बाजू घेतली. कदाचित त्यांच्या मृत्यूची बातमी पोहोचताच हरचंद राय यांनी माहूरवर हल्ला केला. त्यानंतर सावित्रीबाईंनी प्रत्युत्तर दिले आणि हरचंद रायांच्या सैन्याचा नाश केला. सम्राट औरंगजेबाने त्यांच्या धाडसाची आणि शौर्याची दखल घेतली. त्या काळातील मुघल सैन्यातील एकमेव महिला योद्ध्याला त्यांनी "राय बागन" ही पदवी दिली.[१४]

छत्रपती शिवाजी महाराजांशी सामना

[संपादन]

१६६१ मध्ये, औरंगजेबाने शाहिस्तेखान खानाला दख्खनचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले. शिवाजी महाराज त्यावेळी पन्हाळा किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात अडकले. त्यावेळी शाहिस्तेखानाने पुणे आणि जवळील महत्त्वाची स्थळे ताब्यात घेतली आणि विध्वंस आरंभला. लवकरच शिवाजी महाराज वेढ्यातून सुटले आणि राजगड किल्ल्यावर पोहोचण्यात यशस्वी झाले, तेव्हा त्यांनी आपले लक्ष शाहिस्तेखानावर केंद्रित केले. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखान आणि विजापूरचा आदिल शाह दुसरा यांच्याशीही तह केला. शाहिस्तेखानास मदत करण्यास राय बागानला सांगण्यात आले होते. दरम्यान, शाहिस्तेखानाने कोकणावर हल्ला करण्यासाठी कर्तालब खान आणि राय बागानची नियुक्ती केली. हा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. त्यांनी कुरवंडा घाटाचा मार्ग निवडला. शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य उंबरखिंड जवळील जंगलात त्यांची वाट पाहत होते. उंबरखिंडच्या लढाईत, शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३००-४०० मराठा धनुर्धारी आणि तलवारबाजांनी मुघलांचा पराभव केला. त्यांचे शौर्य आणि लढाऊ कौशल्य पाहून राय बागनने शिवाजी महाराजांचे कौतुक करण्यास सुरुवात केली. मराठ्यांना हलके घेऊ नका असे तिने सुरुवातीपासूनच मुघलांना बजावले होते. पराभव निश्चित झाल्यावर तिने कारतलाब खानला शरण जाण्याचा आणि शिवाजी महाराजांशी युद्ध न करण्याचा सल्ला दिला. कर्तलाबने तिचा सल्ला ऐकला.[] कवींद्र परमानंद यांनी त्यांच्या 'श्री शिव भारत' या काव्यात या घटनेचे वर्णन केले आहे. त्यांनी तिचे वर्णन केले "जयामुदयरामस्य जगज्जीवनमातरम् । राजव्याघ्रिति यां प्राहुर्युधि व्याघ्रीमिवोधरामम् ll सापेन महता सांगप्रतिहतायुधा ll"[१५] अर्थ - एक स्त्री जी वाघिणीसारखी लढाईत निर्भय आहे, जी न थांबणारी आहे, उदाजी रामाची पत्नी आहे, जी जगन्याची आई आहे.[१६]

राय बागिनी म्हणाले, "शिवाजी नावाच्या सिंहाच्या आश्रयाखाली असलेल्या जंगलात प्रवेश करून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुमच्या अहंकारामुळे तुम्ही दिल्लीच्या शासक (औरंगजेब) च्या या सैन्याला सिंहाच्या जबड्यात आणले आहे हे पाहणे दुःखद आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा मूर्ख सेनापती शाहिस्तेखान याने तुमच्या सैन्यासह तुम्हाला शत्रूच्या शौर्यात आणले आहे हे पाहणे देखील दुःखद आहे."[][१७]

ऐतिहासिक नोंदींवरून असे दिसून येते की, राय बागन ही मुघल सैन्यात पूर्णवेळ योद्धा नव्हती. ती फक्त पुरुष वारस नसल्यामुळे निर्माण झालेली पोकळी कुटुंबात विवेकाने भरून काढत होती. तिचे पती महाराजा उदाजी राम यांच्या मृत्यूनंतर तिने प्रशासकाची भूमिका बजावली. तिचा मुलगा जगजीवन राव यांच्या मृत्यूनंतर, जगजीवनचा मुलगा बाबूराव सज्ञान होईपर्यंत तिने तिच्या सैन्याचा ताबा घेतला.

एप्रिल १६६३ मध्ये, शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्तेखान विश्अरांती घेत असलेल्या लाल महालावर छुपा हल्ला केला. खान मोठ्या मुश्किलीने तेथून निसटला. नंतर, औरंगजेबाच्या आदेशानुसार त्याला बंगालला पाठवण्यात आले. त्यानंतरही राय बागन पुण्याजवळ गस्त घालत होती.[१८] पुरंदरच्या लढाईत उदाजी रामच्या सैन्याचा उल्लेख असला तरी, तिचा कुठेही उल्लेख नाही. १६६० च्या दशकात राय बागनचा मृत्यू झाला असे मानल्या जाते.[१९][२०]

संदर्भ

[संपादन]
  1. "माहूरगड- रेणुकामातेचे शक्तीपीठ". २०२६-०२-०६ रोजी पाहिले.
  2. 1 2 3 "उंबरखिंडीची लढाई - कारतलबखानाची कोंडी". evivek.com. २०२५-०३-२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-०६ रोजी पाहिले.
  3. "पंडिता रायबाघन". अक्षरधारा. २०२६-०२-०६ रोजी पाहिले.
  4. "औरंगजेबसुद्धा जिच्या तलवारीचा सन्मान करायचा अशी मराठी रायबागन कोण होती?". दैनिक सकाळ. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-०६ रोजी पाहिले.
  5. Tuzuk-i-Jahangiri, Page 398-99.
  6. Shiv Charitra Sahitya Vol.4, Article no. 22.
  7. Shiv Charitra Sahitya Vol.4, Article no.21.
  8. Maasir ul Umar, Volume II, Page 967.
  9. Maasir ul Umar, Vol. II, Page 469.
  10. Tuzuk-i-Jahangiri, Page 398-99.
  11. "पुत्र प्रेमापोटी माहूरगडावर प्रकटलेली परशुरामाची जन्मदाती रेणुका आई!".
  12. Tuzuk-i-Jahangiri, Page 398-99.
  13. Shiv Charitra Sahitya Vol.4, Article no. 22.
  14. "Indian historical records commission". XIV. 1937. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  15. Tuzuk-i-Jahangiri, Page 398-99.
  16. Shiv Charitra Sahitya Vol.4, Article no. 22.
  17. Tuzuk-i-Jahangiri, Page 398-99.
  18. Tuzuk-i-Jahangiri, Page 398-99.
  19. "छत्रपती कशवाजी राजेव माहुरची 'रायबागन'" (PDF). २०२६-०२-०६ रोजी पाहिले.
  20. "Mahur Fort" (इंग्लिश भाषेत). २०२६-०२-०६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)