Jump to content

राजपुत्र गुश्तास्प (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही पर्शियातील एक लोककथा आहे.

कथेचा आशय

[संपादन]

गुश्तास्प हा प्राचीन काळातील पर्शियन राजपुत्र होता. आपण राजपुत्र असूनही आपल्या वडिलांनी आपल्याला सिंहासनाचा वारसदार म्हणून नेमले नाही याचा त्याला खूप राग आला, म्हणून तो आपली जन्मभूमी सोडून भटकू लागला. आपले राज्य सोडून जेव्हा तो अशा रितीने फिरू लागला तेव्हा त्याला जाणवले की आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला काही काम करावे लागेल.

म्हणून तो दुसऱ्या एका देशाच्या सम्राटाकडे गेला आणि त्याला म्हणाला: "मी एक कुशल लेखक आहे आणि मला लेखनिक म्हणून नेमलेत तर मी माझे काम आनंदाने करेन." त्याला काही दिवस वाट पाहण्यास सांगण्यात आले, कारण तिथे कोणत्याही लेखनिकाची गरज नव्हती. पण त्याला वाट पाहात दिवस घालवायचे नव्हते. म्हणून तो उंट चालकांकडे काम मागण्यासाठी गेला. त्यांनाही कोणत्याही नवीन मदतनीसाची गरज नव्हती; तथापि, त्याची अवस्था पाहून त्यांनी त्याला खायला दिले. थोडे पुढे गेल्यावर, गुश्तास्प एका लोहाराकडे गेला. तेव्हा तो गुश्तास्पला म्हणाला, "तुम्ही मला या लोखंडाच्या तुकड्यावर हातोडा मारण्यास मदत करू शकता." आणि त्याने गुश्तास्पच्या हातात एक हातोडा ठेवला. राजकुमाराकडे प्रचंड ताकद होती. त्याने जड हातोडा उचलला, लोखंडाच्या तुकड्याऐवजी तो हातोडा ऐरणीवर बसला आणि पहिल्याच झटक्यात ती ऐरण तुटली. लोहार रागावला आणि लगेच त्याला हाकलून दिले. शेवटी गुश्तास्पला एका मक्याच्या शेतात काम करणारा शेतकरी भेटला. त्याने गुश्तास्पला अन्न आणि निवारा दिला.

एके दिवशी बातमी आली की रमच्या राजाची मुलगी स्वयंवरासाठी उभी आहे आणि राजघराण्यातील सर्व तरुणांना शाही मेजवानीसाठी आमंत्रित केले आहे. गुश्तास्पने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. तो इतर सर्वांसोबत टेबलावर बसला. राजकुमारी किताबनने त्याला पाहिले, तिने त्याला मनोमन वरले. तिच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून तिने त्याला गुलाबांचा गुच्छ दिला. राजकन्येने गरीब गुश्तास्पची निवड केली हे राजाला आवडले नाही पण त्याने आपल्या मुलीला त्याच्याशी लग्न करण्यास मनाई करण्याचे धाडस केले नाही. परंतु त्यांचे लग्न होताच त्याने त्यांना आपल्या राजवाड्यातून हाकलून लावले. म्हणून ते जंगलाच्या मध्यभागी राहायला गेले आणि नदीजवळ त्यांची झोपडी बांधली.

गुश्तास्प एक उत्तम शिकारी होता. तो दररोज नावेतून नदी ओलांडायचा, एखादे जंगली गाढव पकडायचा, अर्धे नाविकाला द्यायचा आणि उरलेले त्याच्या पत्नीला घरी घेऊन जायचा. गुश्तास्पला भेटण्यासाठी एके दिवशी नाविक माब्रिन नावाच्या एका तरुणाला घेऊन आला. माब्रिन त्याला म्हणाला, “मला राजाच्या दुसऱ्या मुलीशी, तुमच्या पत्नीच्या बहिणीशी लग्न करायचे आहे, पण मी राजाच्या जमिनींवर हल्ला करणाऱ्या लांडग्याला मारल्याशिवाय ते लग्न करू शकत नाही. आणि मला ते कसे करायचे हे माहित नाही.”

“काळजी करू नका, मी तुमच्यासाठी ते करेन,” गुश्तास्प म्हणाला. तो वाळवंटात गेला आणि जेव्हा त्याला तो लांडगा सापडला, तेव्हा त्याने त्याला दोन बाणांनी मारले आणि नंतर त्याच्या शिकारीच्या चाकूने त्याचे डोके कापले. राजाने त्या मृत लांडग्याला पाहिले आणि आनंदाने त्याने त्याची दुसरी मुलगी माब्रिनला दिली.

काही काळानंतर, नाविकाने गुश्तास्पला भेटण्यासाठी अहरून नावाच्या आणखी एका तरुणाला आणले. अहरुनला राजाच्या तिसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते, पण आधी त्याला एका अजगराला मारावे लागणार होते. गुश्तास्पने वचन दिले की तो हा पराक्रम करेल. त्याने काही चाकू घेतले आणि ते चाकू त्याने अशा रितीने खोचले की त्यांचा एक चेंडू तयार झाला. मग तो त्या अजगराच्या शोधात निघाला आणि त्याला तो अजगर सापडला. त्याने नेम धरून तो चेंडू अजगराच्या घशात फेकला. त्या चाकुंच्या वारामुळे तो अजगर मृत्युमुखी पडला. अशा प्रकारे अहरुनने राजाच्या तिसऱ्या मुलीशी लग्न केले.

आश्चर्याची गोष्ट ही की, कालांतराने शूर राजपुत्र गुश्तास्प हा त्याच्या वडिलांनंतर पर्शियाचा राजा झाला. त्याने आजवर केलेल्या कष्टाचे, निरपेक्ष मदतीचे चीज झाले होते.

अधिक माहितीसाठी

[संपादन]

राजा गुश्तास्प (इंग्रजी विकिपीडिया)

तात्पर्य

[संपादन]

अंगी कर्तृत्व असेल, स्वबळावर विजय मिळविण्याची हिम्मत असेल तर तुम्ही योग्य त्या स्थानी जाऊन पोहोचालच, हा संदेश या कथेमधून मिळतो.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.