रत्‍नवाडीचा रत्‍नेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नवाडीचा रत्नेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामधले रत्नवाडी किंवा रत्नापूर हे छोटेसे गांव. म्हणायला इतर चार खेड्यांसारखे पण या गावाचे वेगळेपण आहे ते इथल्या चालुक्यकालीन मंदिरात. रत्नेश्वराच्या ह्या मंदिरामुळेच गावाला नाव मिळाले रत्नवाडी.

रत्नगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि भंडारदरा धरणाच्या एका टोकाला रत्नवाडी वसले आहे. या गावाचे रत्नवाडी नाव कसे पडले याची एक दंतकथा इथे सांगितली जाते. त्यानुसार पुर्वी ह्या भागात घनघोर अरण्य होते. आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात हिरे आणि रत्न सापडायचे. या हिऱ्यांना पैलु पाडण्याचे कामही याच परिसरात केले जायचे. हे सर्व हिरे साठवले जायचे ते रत्नगड किल्ल्यामध्ये, आणि ह्या सर्वांचे संरक्षण करण्यासाठी साक्षात रत्नेश्वराची या परिसरात सत्ता होती. आज इथे रत्नं वगैरे सापडत नाही पण रत्नेश्वर मंदिराचे वैभव बघितले ही कथा खरी असावी असी खात्री पटते.

रत्नेश्वर मंदिरात जाण्यापूर्वी रात्री इथे जवळच असलेल्या पर्यटन विभागाच्या विश्रामगृहात मुक्काम करता येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बोटीने मंदिरात जाता येते. हे मंदिर ११ व्या शतकातले चालुक्य शैलीत बांधले गेले आहे. आजच्या दृष्टीने विचार करता दगडाचे हे मंदिर चुन्याचा वापर न करता उभारायचे झाले तर कित्येक कोटी रुपये खर्च करावे लागतील.

मंदिराभोवती दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर तसे बघितले तर खूप उंच आणि अवाढव्य असे आहे. पण ह्या शिखराचे बांधकाम करतांना अनेक उपशिखर आणि आकृत्या यांचा उत्तम मेळ घालण्यात आला आहे. यामुळे प्रकाश आणि सावलीच्या संगतीने शिखराला एक प्रकारे सुबकता प्राप्त झाली आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार नदीकडे आहे. यानंतर सर्वप्रथम येतो तो सभामंडप या सभामंडपात बसून भक्तांना स्नान संध्या आणि नित्यक्रम उरकता यावेत अशी त्याची रचना आहे. सभामंडपाच्या दारावर काही ठिकाणी मिथुन शिल्प कोरलेली आहेत. यानंतर अंतराळ आणि त्यानंतर येतो तो गाभारा. महादेवाच्या मंदिरामध्ये रुद्रपाठ नित्य होत असतात. त्यासाठी या मंदिरामध्ये ध्वनीपरावर्तनाची विचार करण्यात आला आहे. गर्भगृहाला असलेल्या एका प्रवेशद्वारामुळे इथे उत्पन्न होणारा ध्वनीलहरी फक्त दिर्घकाळ टिकतात असे नाही तर त्या लांबपर्यंत अत्यंत सुस्पष्ट ऐकू येतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असणाऱ्या खांबावरचे कोरीव काम सुबक आहे. छतालगत केलेले उठावदार कोरीवकामामुळे ते लाकडी आहे की काय असे वाटते. स्थापत्यशैली, कलाकुसर, ध्वनीव्यवस्था ह्या सर्वांचे उत्तम उदाहरण म्हणजे हे मंदिर होय.