रघुनाथ जगन्नाथ सामंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रघुवीर सामंत (जन्म: २४ डिसेंबर, इ.स. १९०९, वाई - मृत्यू: १७ सप्टेंबर, इ.स. १९८५, दादर) हे मराठी लेखक, प्रकाशक व संपादक होते. यांचे मूळ नाव रघुनाथ जगन्नाथ सामंत. ‘रघुवीर सामंत’ या नावाने, तसेच ‘कुमार रघुवीर’ ह्या टोपण नावाने त्यांनी लेखन केले.[१]

जीवन व कार्य[संपादन]

रघुवीर सामंतांचे वडील जगन्नाथ सामंत सबजज्ज होते. वाई, भिवंडी, डहाणू, कल्याण, धुळे, पुणे, ठाणे याठीकाणी नोकरी करून शेवटी ते ठाणे येथे स्थायिक झाले. मुलगा रघुवीर याला शिक्षणासाठी त्यांनी वसतिगृहात ठेवले होते.

इ.स. १९३३ साली सामंतांनी 'पारिजात प्रकाशन' सुरु केले. त्यांची तीन वर्षांची मुलगी ज्योती अकाली निधन पावल्यामुळे तिच्या स्मृत्यर्थ सामंतांनी इ.स. १९४३ साली 'अमरज्योति वाङमय' ही प्रकाशनसंस्था सुरु केली. बालवाङमय प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. दोन्ही प्रकाशनसंस्थांतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, सांघिक अभिनयगीते, नाट्यात्मक कादंबरी, ग्रामीण जीवनावरील कादंबरी, नाटक, विद्यार्थ्यांसाठी माहितीपर छोटी पुस्तके आणि विज्ञानकोशाचे दोन खंड अशी वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तके इ.स. १९३३ ते १९६५ या कालावधीत सामंतांनी प्रकाशित केली.

इ.स. १९३४च्या जानेवारी महिन्यात सामंतांनी 'पारिजात' मासिक सुरु केले. जानेवारी, इ.स. १९३४ ते फेब्रुवारी, इ.स. १९३५ या वर्षभराच्या काळात त्यांनी 'पारिजात'चे चौदा अंक प्रसिद्ध केले. त्यानंतर इ.स. १९४० साली जानेवारी महिन्यात 'ज्योती' नावाचे मासिक सुरु करून फेब्रुवारी, इ.स. १९४१ पर्यंत त्याचेही चौदा अंक प्रकाशित केले.

कोल्हापूरच्या एस.एम.टी.टी. महाविद्यालयातून सामंतांनी अध्यापनक्षेत्रातील पदवी मिळवली होती. इ.स. १९३८ ते १९५० या काळात गिरगावातील 'चिकित्सक हायस्कूल' मध्ये शिक्षक म्हणून काम केले. इ.स. १९४१ साली त्यांनी 'चिरंजीव' या चित्रपटनिर्मितीतही भाग घेतला होता. 'चिकित्सक'मधील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी खंडाळ्याला 'घरकुल' हे लाॅजिंग बोर्डींग इ.स. १९५० ते १९५३ या काळात चालवले. इ.स. १९५७ साली रघुवीर सामंत पुन्हा अध्यापन व्यवसायाकडे वळाले. इ.स. १९५७-५८ ही दोन वर्षे पालघरजवळच्या सातपाटी येथील 'आदि जनता हायस्कूल'मध्ये मुख्याध्यापक, इ.स. १९५९ साली माहीमच्या लोकमान्य विद्यालयात फर्स्ट असिस्टंट, इ.स. १९६० साली मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यावर इ.स. १९६१च्या जानेवारी महिन्यात ठाकुरद्वारच्या मराठा मंदिर शाळेत त्यांची बदली करण्यात आली. इ.स. १९६१च्या जून महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन सामंत अध्यापन व्यवसायापासून दूर झाले.

लेखन[संपादन]

पस्तीस वर्षात सामंतांनी शब्दचित्रे, स्वभावचित्रे, लघुनिबंध, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, गीते, बालगीते, अभिनयगीते, शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तके असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. 'ज्ञानपारिजात' या विज्ञानकोशाची केलेली निर्मिती हे रघुवीर सामंतांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेले उल्लेखनीय काम होते.

रघुवीर सामंतांनी प्रकाशित केलेले साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष
वाळूतील पाउले कथाशब्दचित्रे मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९३४
सुरंगीची वेणी रूपांतरित रशियन कथा मराठी भारतगौरव ग्रंथमाला, मुंबई इ.स. १९३५
उपकारी माणसे (खंड १- प्रवासातील सोबती) पत्रात्मक कादंबरी मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९३८
उपकारी माणसे (खंड २- अभ्रपटल) कथात्मक कादंबरी मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९३८
उपकारी माणसे (खंड ३- आकाशगंगा) मिश्र कादंबरी मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९३८
पणत्या लघुनिबंध मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९३८
आजची गाणी सांघिक गेय गीते मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९३९
मसालेवाईक प्राणी - पहिले सात स्वभावचित्रे मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४०
मसालेवाईक प्राणी - दुसरे सात स्वभावचित्रे मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४०
तारांगण अभिनव चित्रबंध मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४०
रज:करण कथा-निबंध मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४१
उपकारी माणसे (खंड ४- घरोघरच्या देवी) नाट्यात्मक कादंबरी मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४४
गीतज्योती मुलांसाठी अभिनय गीते मराठी अमरज्योती वाङमय इ.स. १९४४
माणसाचे शेपूट मराठी इ.स. १९४४
आदर्श कृषीवल चरित्र मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४४
तांडा कथासंग्रह मराठी अमरज्योती वाङमय, मुंबई इ.स. १९४६
रक्त नि शाई कविता व सांघिक गीते मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४७
जीवनगंगा कादंबरी मराठी पारिजात प्रकाशन, मुंबई इ.स. १९४७
आम्ही खेडवळ माणसं ग्रामीण जीवनावरील कादंबरी मराठी अमरज्योती वाङमय, मुंबई इ.स. १९४८
आम्हाला जगायचंय कादंबरी मराठी अमरज्योती वाङमय, मुंबई इ.स. १९५४
मृगजळातील वादळे कथा-निबंध मराठी अमरज्योती वाङ्मय, मुंबई इ.स. १९५६
एम. व्हिटॅमिन दोन अंकी नाटक मराठी अमरज्योती वाङ्मय, मुंबई इ.स. १९५७
दिलजमाई कथा-निबंध मराठी अमरज्योती वाङ्मय, मुंबई इ.स. १९५९
जिवंत झरे कथासंग्रह मराठी अमरज्योती वाङ्मय, मुंबई इ.स. १९५९
आपले व्यक्तित्व मराठी अमरज्योती वाङ्मय, मुंबई इ.स. १९५९
व्यवहारचतुर कसे व्हावे? मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई इ.स. १९५९
ज्ञानपारिजात (परडी १ ली), मी अनंत विश्वाचा रहिवासी कोश मराठी अमरज्योती वाङ्मय, मुंबई इ.स. १९६२
ज्ञानपारिजात (परडी २ री), अथांग अंतराळात मायलेकरे कोश मराठी अमरज्योती वाङ्मय, मुंबई इ.स. १९६४

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ अ.र. कुलकर्णी. "सामंत, रघुवीर जगन्नाथ". महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. १५ जुलै २०१४ रोजी पाहिले.