येर्बा माते
येर्बा माते हे अर्जेंटिना देशातील एक पेय आहे.
प्रास्ताविक
[संपादन]येर्बा माते हे पेय बनविण्यासाठी येर्बाची सुकवलेली पाने गरम पाण्यात भिजवतात.नंतर सुकलेल्या भोपळ्यापासून तयार केलेल्या एका भांड्यात ते गरम पाण्यात भिजवून केलेले येर्बाचे मिश्रण पिण्यासाठी देतात. येर्बा माते पिण्यासाठी धातूची कांडी वापरतात. त्या धातूच्या कांडीला बोम्बिला म्हणतात. येर्बा माते हे चवीला किंचित कडुसर, थोडेसे मातकट स्वाद असलेले कडक पेय असते. पेय थोडे प्यायल्यानंतर ते मनाला शांती देणारे वाटते.हे पेय एकट्याने पटापट पिण्याचे पेय नाही तर ते शांतपणे, चव घेत घेत, दुसऱ्यांना देत देत सामाजिक बंधनात जोडणारे पेय आहे.
परंपरा
[संपादन]हे पेय अर्जेंटिना देशात एवढे प्रिय आहे की तुम्हाला लिओनेल मेस्सी हा खेळाडूसुद्धा मुलाखत देताना, सामन्याच्या आधी, संघाबरोबर बस मधून जाताना हे येर्बा माते पेय पिताना आढळेल. येर्बा माते हे फक्त पिण्याचे पेय नसून ती एक अर्जेंटिना देशातील परंपरा आहे.अर्जेंटिनामध्ये बाग असो, विमानतळ असो, किंवा कुठलाही भाग असो तिथे तेथील स्थानिक लोक येर्बा माते हे पेय घोळक्याने पीत असतात आणि एकमेकांना देत असतात. अर्जेंटिना देशात एक अलिखित नियम आहे की येर्बा माते ह्या पेयाला नकार देत नाहीत. अर्जेंटिना देशात जर तुम्हाला येर्बा माते पेय दिले तर ते न नाकारता भांड्यातील पेयाचा एक घोट घेऊन ते भांड्यातील पेय पुढील माणसाला द्यायचे.अश्या प्रकारे तुम्ही तेथील लोकांच्यामध्ये सामील होऊन त्यांच्यातीलच एक भाग बनून जातात.म्हणून अर्जेंटिना येथील येर्बा माते हे पेय तेथील संस्कृतीचे एक गुणकारी वैशिष्ट्य आहे. [१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, रविवार पुरवणी,२४ ऑगस्ट २०२५