युनायटेड गोवन्स पार्टी
युनायटेड गोअन्स पार्टी (यूजीपी) हा गोवा राज्यातील एक राजकीय पक्ष होता. कोंकणी भाषेच्या आंदोलनादरम्यान अनेक प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण झाल्यावर, १९६३ मध्ये पूर्वीच्या गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात जॅक डी सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची स्थापना १९६३ मध्ये झाली होती.
निर्मिती
[संपादन]१९६१ मध्ये गोव्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाल्यानंतर, गोवा स्वतःच्या विधानमंडळासह एक केंद्रशासित प्रदेश बनला. १९६३ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. गोवा आणि शेजारील महाराष्ट्र राज्यातील अनेक घटकांकडून या लहानशा राज्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याची मागणी होत होती. या मागणीचे नेतृत्व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने केले होते.
विलीनीकरणामुळे गोव्याची वेगळी ओळख आणि संस्कृती हळूहळू नाहीशी होईल हे लक्षात आल्यावर, सप्टेंबर १९६३ मध्ये चार पक्षांनी एकत्र येऊन युनायटेड गोअन्स पार्टीची स्थापना केली. हे चार पक्ष होते पार्टिडो इंडियनो, गोअन नॅशनल युनियन, युनायटेड फ्रंट ऑफ गोअन्स आणि गोआंचो पक्ष.[१] त्याचे पहिले अध्यक्ष जॅक डी सेक्वेरा होते. सेक्वेरा यांचा गोआंचो पक्ष, अल्वारो डी लोयोला फर्टाडो यांचा पार्टिडो इंडियनो, जे. एम. डिसोझा यांचा गोवा नॅशनल युनियन आणि युनायटेड फ्रंट्स ऑफ गोअन्स व डेमोक्रॅटिक पार्टी यांचे विलीनीकरण करून युनायटेड गोअन्स पार्टीची स्थापना झाली. या सर्वांचे एकच ध्येय होते, ते म्हणजे गोव्याची स्वतंत्र ओळख, आणि ते गोव्याच्या महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या विरोधात होते.[२] युनायटेड गोअन्स पार्टीचा वैचारिक आधारस्तंभ पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते लोयोला फर्टाडो होते, ज्यांना अनेकजण युनायटेड गोअन्स पार्टीमागील खरा सूत्रधार मानतात. युजीपीला मुख्य पाठिंबा गोव्यातील कॅथोलिक आणि उच्च-जातीय हिंदूंकडून मिळत होता.[३] जरी ते प्रामुख्याने ख्रिश्चनबहुल असले तरी, त्यांनी इतर गटांना वगळले नाही आणि हिंदू व मुस्लिम उमेदवारही नोवडणूकीत उभे केले.[१]
निवडणुकांमधील कामगिरी
[संपादन]१९६३ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने एकूण ३० पैकी १६ जागा मिळवल्या. युनायटेड गोअन्स पार्टीने २४ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आणि १२ जागा मिळवून विरोधी पक्ष स्थापन केला. दमण आणि दीवमधील प्रत्येकी एक अशा दोन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या. सेक्वेरा विरोधी पक्षनेते बनले. त्यांच्या जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दा होता, "गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाला विधानसभेत आणि संसदेत स्वतंत्र राज्याचा दर्जा". विद्यापीठाची स्थापना, औद्योगिकीकरण, जमीन सुधारणा आणि कोंकणीला प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता देणे ही त्यांच्या प्रमुख आश्वासनांपैकी होती. [१]
चर्चने कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील फ्रेंते पॉप्युलरच्या विरोधात कॅथोलिक-प्रभुत्व असलेल्या युनायटेड गोअन्स पार्टीला पाठिंबा दिला. [४]
गोवा जनमत चाचणीतील भूमिका
[संपादन]पहिल्या निवडणुकीतमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या विजयानंतर, त्यांनी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याची मागणी केली. प्रतिनिधिक लोकशाहीतील प्रथेप्रमाणे, हा मुद्दा गोवा विधानसभेत मतदानासाठी मांडला जावा, अशी त्यांची इच्छा होती. युजीपीचे मत होते की, असा महत्त्वाचा निर्णय त्यांच्या आमदारांवर सोपवू नये, तर तो गोव्याच्या जनतेसमोर निर्णयासाठी ठेवला पाहिजे.
गोव्यात सार्वमत घेण्यासाठी राजी करण्यासाठी यूजीपी आमदारांनी नवी दिल्लीला अनेक वेळा भेट दिली. सर्वप्रथम ते जवाहरलाल नेहरूंना भेटले; आणि त्यांच्या मृत्यूनंतर, सार्वमतासाठी दबाव आणण्याकरिता लाल बहादूर शास्त्रींना भेटले.[५]
मात्र, १९६६ मध्ये ताश्कंद येथे शास्त्री यांचे निधन झाले आणि हा निर्णय आता नव्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर सोपवण्यात आला. यूजीपीच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांची भेट घेतली आणि एक निवेदन सादर केले की, राज्याच्या भवितव्यावर परिणाम करणारा असा महत्त्वपूर्ण निर्णय केवळ आमदारांवर सोपवता येणार नाही, तर तो जनतेसमोर निर्णयासाठी ठेवला पाहिजे. अखेरीस केंद्र सरकारने गोव्यात सार्वमत घेण्यास सहमती दर्शवली.
यूजीपीने मागणी केली की, भारतात कुठेही राहत असले तरी, गोव्यातील सर्व लोकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा. गोव्याबाहेर राहणारे लोक पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकत होते. तथापि, ही विनंती नाकारण्यात आली. त्यांनी अशीही मागणी केली की, महाराष्ट्रातील सर्व प्रतिनियुक्तीधारकांना मतदानाचा हक्क देऊ नये आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी बांदोडकर सरकारने राजीनामा द्यावा. केंद्राने बांदोडकरांच्या राजीनाम्याची मागणी मान्य केली.
१६ जानेवारी १९६७ रोजी जनमत चाचणी घेण्यात आली. एकूण ३,१७,६३३ मते मोजण्यात आली. विलीनीकरण ३४,०२१ मतांनी फेटाळले गेले.[६]
पक्षांतर्गत विविध मतभेदांनंतर, १९६७ आणि १९७७ मध्ये पक्षाचे विविध गटांमध्ये विभाजन झाले. अखेरीस, तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला.
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Sakshena, R.N. Sakshena (2003). Goa: Into the Mainstream. Abhinav Publications. ISBN 978-81-7017-005-1. 2009-06-13 रोजी पाहिले.
- ↑ "The Navhind Times ePaper | Goa News".
- ↑ "GoaCentral.Com > History of Goa". 16 February 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-21 रोजी पाहिले.
- ↑ Seminar, Issues 65-76. 1965.
- ↑ "MERGER CONFLICT: Legislative or people ?". 2011-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "The Results & Post-Mortem". 2011-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-05-19 रोजी पाहिले.