यास्काचार्य
यास्काचार्य - हे वेदांचे म्हणजे श्रुतिग्रंथांचे भाष्यकार म्हणून ओळखले जातात.
कार्य
[संपादन]यास्काचार्य यांच्या मते वेदांमध्ये तीन प्रकारचे ज्ञान आहे. आणि त्यामुळे वेदांतील प्रत्येक ऋचेचा अर्थ तीन प्रकारांनी लावता येतो असे ते म्हणतात. यज्ञयाग व कर्मकांडपर अर्थ, दुसरा प्रकार म्हणजे देवतांच्या संदर्भात किंवा पौराणिक दृष्टीने आणि तिसरा प्रकार म्हणजे वैश्विक चेतनेच्या संदर्भात आध्यात्मिक दृष्टीने - अशा तीन प्रकारे वेदांचा अर्थ लावता येतो. तपस्या आणि ध्यान या मार्गानीच वेदांचा खरा अर्थ आकलन होऊ शकतो असे ते म्हणतात. त्यांनी बाह्यसाधने, मानसिक चिंतन, विचार यांच्या सहाय्याने निरुक्त व वेदांगाच्या मदतीने सूक्तांचे अर्थ लावले. [१]
वैदिक मंत्रांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्ताचा उपयोग होतो. निरुक्त म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती. वैदिक शब्दांचा अर्थ दुर्बोध होऊ लागल्यावर एक समानार्थी शब्दांचा कोश तयार करण्यात आला होता त्याला निघण्टु असे म्हणत. याच निघण्टु वर यास्काचार्यांनी निरुक्त ही टीका लिहिली. यामध्ये शब्दांच्या व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. यास्कांनी व्युत्पत्ती देताना काही भाषाशास्त्रीय सिद्धांत सांगितलेले आहेत. यास्काचार्यांच्या निरुक्त ग्रंथांवर आज तीन टीका उपलब्ध आहेत. त्यापैकी एक दुर्गासिंह, दुसरी स्कंद-महेश्वर आणि तिसरी टीका नीळकंठ यांनी लिहिलेली आहे. [२]