यशवंतराव देसाई
Appearance
यशवंतराव देसाई हे गेटवे ऑफ इंडिया या भव्यदिव्य इमारतीचे अभियंता होते.जॉर्ज विटेट हे वास्तुविशारद होते.
| यशवंतराव देसाई | |
|---|---|
| जन्म |
११ डिसेंबर, इ.स. १८७६ मुंबई, महाराष्ट्र |
| मृत्यू |
१७ जुलै, इ.स. १९२७ पाचगणी, महाराष्ट्र |
| निवासस्थान | मुंबई, महाराष्ट्र |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
| पेशा | अभियंता |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. १९०२ ते इ.स. १९२७ |
| मूळ गाव | मुंबई |
| वडील | हरिश्चंद्रजी देसाई |
| पुरस्कार | रावसाहेब,रावबहादूर. |
जीवन व कारकीर्द
[संपादन]- यशवंतराव देसाई यांचा जन्म इसवी सन १८७६ मध्ये ११ डिसेंबर रोजी मुंबई येथे झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव हरिश्चंद्रजी होते.ते मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागात मानदसाहाय्यक अभियंता होते. यशवंतराव दोन वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले.
- यशवंतराव यांचे आजोबा सदाशिव कल्याणजी देसाई (वाघोळकर) हे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते.
- यशवंतराव देसाई यांच्या आईने त्यांची संपूर्ण जबाबदारी पार पाडली.
- यशवंतराव यांचे प्राथमिक शिक्षण जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शाळेत झाले.
- पुढील मँट्रिक पर्यंत इंग्रजी शिक्षण विल्सन हायस्कूल येथे झाले.
- स्थापत्यशास्त्र या विषयात अभ्यास करण्याचे नियोजन करून त्यांनी त्यांचे काका शाळीग्राम जगन्नाथजी यांच्याकडे बिनपगारी साहाय्यक म्हणून काम केले. पुढे त्यांच्या सोळाव्या वर्षी मानद साहाय्यक अभियंता वरून दरमहा दहा रुपये पगार याप्रमाणे त्यांना मिळू लागले.स्थापत्यशास्त्र विभागात काम करणारे त्यांच्या घराण्यातील ते तिसऱ्या पिढीतील व्यक्ती झाले.
- इसवी सन १९०२ मध्ये यशवंतराव सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून प्राथमिक वास्तुकला परीक्षेत उत्तीर्ण झाले.
- नंतर त्यांनी ओव्हरसीयर या पदावर काम केले.
- साहाय्यक अभियंता या पदावर काम करण्यापूर्वी त्यांनी ए एम आय इ ही पदवी मिळवली.
- ब्रिटिश सम्राट राजे पंचम जॉर्ज हे इसवी सन १९०५ मध्ये युवराज असताना मुंबईत पहिल्यांदा आले होते.त्यांच्या भेटीची स्मृती राहण्यासाठी इसवी सन १९१४ मध्ये मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले. त्या वास्तूचे साहाय्यक अभियंता यशवंतराव देसाई होते. इसवी सन १९११ साली पुन्हा ते दिल्ली दरबारासाठी आले.त्याची आठवण जपण्यासाठी इसवी सन १९२४ साली गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला.त्याचे वास्तुविशारद जॉर्ज विटेट होते तर साहाय्यक अभियंता यशवंतराव देसाई होते.
- गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम मालाड येथील बसॉल्ट दगड वापरून केले आहे.त्या दगडातून बनविलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या लहान प्रतिकृतीचा एक भाग गावदेवी येथे भेंडी गल्लीत यशवंतराव देसाई यांच्या सुंदर बंगल्याजवळ जपून ठेवला होता.आज जरी तो बंगला नसला तरी यशवंतराव यांच्या वंशजांनी ती प्रतिकृती यशवंत-सिद्धी सोसायटीच्या इमारतीच्या खाली सुरक्षित ठेवली आहे.
- यशवंतराव देसाई यांच्या स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रातील कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना इसवी सन १९१८ साली रावसाहेब आणि इसवी सन १९२२ साली रावबहादूर ह्या पदव्या देऊन गौरविण्यात आले होते.
रावबहादूर यशवंतराव देसाई चौक
[संपादन]गेट वे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेलच्या जवळ असलेल्या चौकाला रावबहादूर यशवंतराव देसाई चौक असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाव दिलेले आहे.
मृत्यू
[संपादन]इसवी सन १९२७ मध्ये जुलै महिन्याच्या १७ तारखेला वयाच्या ५१ व्या वर्षी पाचगणी येथे यशवंतराव देसाई यांना देवाज्ञा झाली.[२]